Pages

Tuesday, 11 December 2012

२७ वर्षांचा रणसंग्राम-प्रस्तावना

मराठ्यांचा इतिहास म्हणला, की प्रत्येक मराठी माणसाचे रक्त सळसळून उठते. हा इतिहास आहेच असा. अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध, सांस्कृतिक आक्रमणाविरुद्ध लढून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समाजातल्या प्रत्येक घटकांनी, प्राणाची परवा न करता हातात शस्त्रास्त उचलून रक्ताचे पाणी करून निर्माण केलेला हा इतिहास आहे. याचे पवाड गायला किंवा ऐकायला सुरुवात झाली, की अभिमानानी मान कशी वर नाही होणार? का रक्त नाही सळसळणार? आज आम्ही या हिंदुधर्माचे पालन करतो आहोत, ते याच आमच्या पूर्वजांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच! याचं मोठं श्रेय शिवाजी महाराजांना जातं. धर्मवेड्या औरंग्याविरुद्ध लढून आपला धर्म व संस्कृती या माणसाने एकहाती टिकवली व जपली. याची अनेक उदाहरणे समकालीन ग्रंथांमधून व कवितांमधून मिळतात , पण कवी भूषण यांच्यापेक्षा योग्य वर्णन सापडत नाही. कवी भूषण त्याच्या एका छंदात म्हणतात- 

“देवल गिराविते , फिराविते निसान अली । ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी । 
गौर गणपती आप , औरनको देत ताप ।आपनी ही बार सब , मारी गये दबकी । 
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत ।सिद्ध की सिद्धाई गई , रही बात रब की । 
कासी की कला गई, मथुरा मसिद भई ।गर सिवाजी न होत तो , सुन्नत होती सबकी ॥” 

या छंदातून भूषणजी त्या काळातली सामाजिक परिस्थिती सांगायचा प्रयत्न कारातात. कवी म्हणतो “हिंदूंची मंदिरे फोडून, अली चे झेंडे सर्वत्र फिरवले, मिरवले जात आहेत. मंदिरांचं रक्षण करणं ज्या राव राणे व इतर सरदारांचे कर्तव्य आहे, ते सगळे या हरित वादळापुढे बुडाले, हरले. खुद्द तो विघ्नहर्ता गणपतीतो सुद्धा स्वतःवर विघ्न आलेलं पाहून घाबरून लपून बसला आहे. जिकडे एकेकाळी भक्ती चाले, तिकडे आता पीर आणि पैगंबर माजले आहेत आणि फक्त त्यांचीच चलती आहे, सिद्धांचे सिद्धपण नाहीसे होऊ लागले आहे आणि सर्वत्र आता फक्त “रब”ची चर्चा सुरु झाली आहे. अहो एवढंच काय- आपल्या सर्वात पूजनीय श्रद्धास्थानी विराजमान असलेल्या त्या विश्वेश्वराच्या कशीला सुद्धा ग्रहण लागलं आहे, अवकळा आली आहे, श्रीकृष्णाची जन्मभूमी असणाऱ्या त्या मथुरेची मशीद झालीये- परिस्थिती गंभीर असली तरी या वेळी शिवाजी राजे आहेत म्हणून ठीक, नाहीतर सर्व हिंदुधार्मियांची सुंता झाली असती.” यातून कवीला काय सांगायचं आहे, हे जो तो आपापल्यापरीने आत्मसाद करू शकेलंच- मी फार काही लिहिणार नाही. पण वरील काव्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, कारण हा समकालीन पुरावा आहे. त्यामुळे आपण आज ज्या धर्मात वाढतो आहोत, त्याचा जीर्णोद्धार करून भक्कम पाया महाराजांनी घातला आहे, हे म्हणायला हरकत नाही व हे कोणीही विसरता कामा नाही. 

मराठयांचे राज्य मुळात जन्माला येण्यामागची भूमिका म्लेंछ आक्रमकांविरुद्ध युद्ध पुकारून धार्मिक, राजकीय, वैचारिक व सांस्कृतिक स्वातंत्र्याची होती. महाराजांनी अथक परिश्रम घेऊन इथल्या जनतेच्या मनामध्ये एकी निर्माण केली होती. स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्र महत्त्वाचे ही शिकवणी दिली. म्हणूनच या आपल्या महाराष्ट्र देशामध्ये बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, बाजी पासलकर, प्रतापराव गुजर, रामचंद्रपंत अमात्य, पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, असे कित्येक स्वामिनिष्ठ सेनानी होऊन गेले, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देताना पुढेमागे काहीही विचार केला नाही. या सर्वजणांच्या मनात पहिला मान राजाचा आणि स्वराज्याचा होता. स्वतःचा मान दुय्यम स्थानी होता. याच्या स्वामीनिष्ठेमुळेच हिंदवी स्वराज्य साकार होऊ शकले. या सर्व वीरांची गुणसुमने गाणं म्हणूनच योग्य आहे. याच मजबूत पायावर उभारणी करत पुढे नानासाहेब पेशव्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अवघा भारत देश जिंकला होता. 

अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला शिवाजी महाराजांच्या आयुष्याची माहिती असते. अगदी कोणत्या दिवशी कोणता किल्ला जिंकला इतकी माहिती जरी नसली, तरी साधारणपणे महाराजांच्या आयुष्यात आलेले सर्व महत्त्वाचे प्रसंग नक्कीच माहिती असतात. परंतु, शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर मराठे मुघालांविरुद्ध तब्बल २७ वर्ष झुंज देत होते, याची फारशी जाणीव कोणाला नसते. शाळेच्या इतिहासात दुर्दैवाने दुर्लक्षित केल्या गेलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींमधलीच ही एक गोष्ट. त्या काळच्या सर्वात बलाढ्य सैन्याविरुद्ध त्याच्या १/५ ताकदीच्या मराठ्यांनी २७ वर्ष कडवी झुंज दिली व ती झुंज जिंकली. मुघलशाही पाताळी धाडली. दक्षिण काबीज करू पाहणाऱ्या औरंगझेबाची सर्व स्वप्न धुळीला तर मिळवलीच, पण नंतर कावेरी तीरापासून अटकेपर्यंतचा सर्व प्रदेश भगव्या झेंड्याखाली आणला. हा २७ वर्षाचा लढा  भारताच्या इतिहासातला एक दुर्लक्षित खंड आहे. 


मी पुढील काही पोस्ट्स मधे हे २७ वर्षांचे युद्ध नेमके कसे झाले, यावर थोडं लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.  श्री केदार सोमण यांनी त्यांच्या ब्लॉग वर या विषयावर सुंदर लेख लिहिला आहे, जो इंग्रजी मधे आहे. पुढील काही दिवसांमध्ये केदार्जीनी लिहिलेल्या लेखाचे भाषांतर करून हा लेख मराठी मधे लिहिण्याचा, व त्यातून आपण काय शिकू शकतो, कशी प्रेरणा घेऊ शकतो, याचबरोबर माझे काही विचार आपल्यासमोर माझ्या या ब्लॉगद्वारे मांडण्याचा एक छोटा प्रयत्न करतो आहे. 

बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या लिखाणातून म्हणतात, “इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचा. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास निर्माण करतात.” खरोखर मराठी मनामनात आपला हा इतिहास मुरला आहे. इथल्या मातीच्या कणाकणात तो दडला आहे. सह्याद्रीचा प्रत्येक डोंगर इतिहासाचे एक-एक पुरण-उपनिषदच आहे जणू. फक्त जगाच्या वाढत्या वेगासोबत मनातल्या  इतिहासाच्या या पानांवर धूळ व जळमटे साचू लागली आहेत. ती झटकून मनातला इतिहास ताजा करायचा हा एक प्रयत्न. झपाटून, वेडे होऊन स्वातंत्र्याची दिशा दाखवून गेलेल्या त्या अगणित वीरांना माझं हे लेखन अर्पण करतो व त्या छत्रपतीला प्रथम नमन करतो. आज गार पडलेली आपली मराठी मनं सळसळून उठतील व या इतिहासाला प्रेरणास्थळी मानून माझ्यासकट सगळ्यांकडून चांगले समाजकार्य घडवातील अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 


No comments:

Post a Comment