Pages

Saturday, 15 December 2012

२७ वर्षांचा रणसंग्राम-१

(प्रस्तावना)

आजकाल शाळांमधून विद्यार्थ्यांना एक विशिष्ठ इतिहास शिकवला जातोय. हा इतिहास अगदीच पुचाट व अपौरुष्य आहे. इतिहास निर्माण होण्यामागची कारणे, त्या वेळी असणारी राजकीय परिस्थिती, याचा काहीही विचार व उल्लेख न करता इतिहास म्हणजे तारखांचे दुकान या पद्धतीने तो शिकवला जात आहे. भारतासारख्या एका पुरातन संस्कृतीचा इतिहास तितकाच प्राचीन असणं स्वाभाविक आहे. परंतु शालेय अभ्यासक्रमातून इतिहास शिकायचा झाला की तो इंग्रजांविरुद्धच्या लढ्याचा इतक्यावरच सीमित राहतो. यातसुद्धा विशेष करून कॉंग्रेस आणि गांधी-नेहरू यांच्या किमयेचे भारगोच्च वर्णन असते- परंतु इतर हजारो क्रांतिकारकांचा साधा ओझरता उल्लेख देखील नसतो. नेहरू आणि गांधी हे महान पुढारी होते व भारतातील सर्वांनी त्यांची कार्य शिकलीच पाहिजेत- स्वातंत्र्य मिळवून देण्यात शेवटी त्यांचा मोठा हातभार होता- पण, त्यांच्या विचारांचा व जीवनाचा या अभ्यासक्रमातून अतिरेक होतो. ५वि,८वि व १०वि ही ३ वर्ष आपण याच नेत्यांबद्दल शिकतो, आणि यामुळे मुलांना गांधी आणि नेहरू यांच्या विचारांचा एक असंतुलित डोस मिळतो ज्यामुळे एकतर्फी विचार केला जातो. शाळेतल्या मुलांना भारताच्या इतिहासातील कितीतरी सोनेरी क्षण शिकण्यापासून वंचित ठेऊन त्यांचा एकांगी विकास करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांच्या मनात देशभक्तीची प्रखर ज्योत पेटू न द्यायचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे की काय असा प्रश्न पडतो. 

या दुर्लक्षित इतिहासातील एक अतिशय महत्त्वाची कथा म्हणजे महाराष्ट्रानी मुघलांविरुद्ध दिलेल्या २७ वर्षाच्या लढ्याची. पोकळ अहिंसावाद शिकवणाऱ्या केंद्र सरकारला सशत्र उठाव करून राज्य निर्माण करता येते व शत्रूला हरवता येते, हा विचार मुलांच्या मनात येण्या अगोदरच मुळासकट उपटून आधीच नष्ट करायचाय म्हणल्यावर हीच अवस्था होणार. असो. हे २७ वर्षांचे युद्ध म्हणजे काही सामान्य युद्ध नाही. हे एक महायुद्धच होते. ज्या काळात सामान्यतः एखाद्या व्यक्तीचे वय जास्तीतजास्त ३०-३५ असायचे, अशा काळात २७ वर्ष युद्ध म्हणजे एक पूर्ण पिढी या कार्यास खर्ची पडली असे म्हणायला हरकत नाही. शिवरायांच्या मृत्यू नंतर महाराष्ट्रानी मुघली आक्रमणाविरुद्ध एक पिढी गमावली, एक राजा गमावला, एक राजधानी गमावली- पण राज्य व स्वातंत्र्य गमावलं नाही. आज भारतातल्या ५ मोठ्या राज्यांमध्ये- महाराष्ट्र, कर्नाटका, मध्य प्रदेश, गुजरात व तामिळनाडू या प्रचंड मोठ्या भूभागावर असंख्य रणांगणातून हे युद्ध रंगले होते. युद्धाचा span, आणि सर्व खर्च(माणूस आणि युद्धसामग्री धरून) व आवाका पाहता या युद्धाएवढे मोठे युद्ध भारताच्या लेखी इतिहासात दुसरे नसेल. महाराजांच्या मृत्युनंतर १६८१मधे औरंगजेब दक्षिणेत आला तेव्हा हे युद्ध भडकले ते १७०७मध्ये तो मरण पावल्यावरच मिटले. त्या दिल्लीपती औरंगजेबाने त्याच्याजवळ असलेले सर्व काही मराठ्यांविरुद्धच्या या लढाईमध्ये पणाला लावले आणि सर्वकाही गमावले. 

एका मराठी माणसाच्या नजरेतून पाहता त्या यावनाधामाला सर्व हरताना पाहून आनंदच होतो. मराठी शौर्याचे गीत गायल्याशिवाय राहवत नाही. पण वरवर कौतुक गाण्यापेक्षा या युद्धामागाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन विश्लेषण केल्यास या युद्धाचा निकाल जास्त सुखद व गोड वाटतो. प्रत्येक युद्धामागे काही राजकारण दडलेले असते. किंबहुना युद्ध हे राजकारणातील एक दुधारी अस्त्रच आहे. हे युध्द देखील इतर युद्धांप्रमाणेच एक संपूर्ण भारतीय पातळीचे राजकारण होतं. 

समर्थ रामदासांच्या वाक्यांमधून सांगायचं तर शिवरायांनी त्याचं उभं आयुष्य जी “राज्यासाधानेची लगबग” केली होती, त्याचं फळ १७व्य शतकाच्या अखेरच्या २ दशकांमध्ये महाराष्ट्राला मिळालं. महाराजांनी या “महाराष्ट्रराज्याला” व हिंदुत्त्वाला दख्खन मध्ये मूळ धरू दिलं होतं. त्यांच्या “futuristic vision” मधून सह्याद्रीच्या रांगेमध्ये बगलाणापासून कोकणापर्यंत सर्व मुलखात असंख्य गड-कोट बांधले व जुने कोट अजून बलशाली केले. एक भक्कम बचावात्मक कणा निर्माण केला-जो या युद्धामध्ये खूप महत्त्वाचा ठरला. महाराजांनी मराठी आरमार शून्यापासून निर्माण केले. या आरमाराच्या जोरावर महाराज कल्याण पासून कारवारपर्यंतचा सर्व प्रदेश आपल्या सत्तेखाली आणू शकले होते. पश्चिम किनाऱ्यावर मराठ्यांचं वर्चस्व निर्माण केले. मराठी आरमार त्या काळी अंजदीव पासून मस्कत पर्यंत भगवे फडकावत गेल्याचे उल्लेख आहेत. याच आरमारामुळे पश्चिम किनार्यावरची जवळपास सर्व महत्त्वाची ठाणी व बंदरे मराठ्यांच्या ताब्यात आली होती. यामुळे दक्षिणेत असलेल्या बादशाह्याना अरबांकडून घोडे व फिरांग्यांकडून तोफा-दारुगोळे आयात करणे कठीण होऊ लागले होते, व बादशाह्याचा व्यापार ठप्प होऊ लागला होता. शिवाजी महाराज कोकणात उतरल्यानंतर आदिलशाहीने त्याचाविरुद्ध अनेक अयशस्वी मोहिमा काढल्या होत्या- त्या सर्व मोहिमांचा एक मुख्य हेतू होता तो म्हणजे मराठ्यांना या सागरी किनाऱ्यावरून बाहेर काढणे. परंतु या सर्व स्वाऱ्या होऊनदेखील मराठ्यांचं स्वराज्य कमी न होता वाढतंच गेलं. 

उत्तरेकडे मुघली सत्तेला सर्वात मोठा धोका होता तो म्हणजे राजपुतांचा. अनेक शूर राव-राणे यांनी मुघालांविरुद्ध लढा दिला होता. महाराणाप्रताप त्याच शूर परंपरेतील एक तेजस्वी योद्धा. परंतु अकबर पासून मुघलांनी राजपुतांना उच्च पदव्या द्यायला सुरुवात केली व त्यांना आपल्या बाजूने करून घेतले. म्हणा राणाप्रतापांसारखे काही अपवाद होतेच. परंतु शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी संपूर्ण राजस्थान मधील राजपुतांनी मुघलांचे स्वामित्व पत्करले होते. औरंगजेबाने आपल्या वृद्ध बापाला कैदेत टाकून व स्वतःच्या थोरल्या भावाला ठार करून सिंहासन प्राप्त केले होते. कवी भूषण या सर्व प्रकारचं वर्णन करताना म्हणतात: 

“किबले की थोर बाप बादशाह शाहजहाँ टाको कैद कियो मान मक्के आग लाई है 
बड़ोभाई दाराको पकरी के मार डार्यो मेहरहो नहीं माँ को नहीं सगा भाई है
बंधू तो मुरादबक्ष बादी चुग करिबे को बीचले कुरान खुदा की कसम खाई है
भूषण सुकवि कहे सुनो नवरंगजेब एतो काम किन्हें तेऊ पादशाही पाई है |” 

औरंगजेबाच्या सत्तेखाली राजपूत जवळपास पूर्णतः शांत झाले होते. उत्तर भारतातील हिंदुंच शेवटचं आश्रयस्थळ मुघलांनी काबीज केलं होतं. त्या धर्मवेड्या औरंगजेबाला आता आड येत होते ते फक्त सीख, मराठे व बुंदेलखंड. औरंगजेब आयुष्यभर धर्मवेडाच होता. हुंदुंची असंख्य मंदिरे उद्ध्वस्त करण्यात त्याचा हात होता. काशीविश्वेश्वर, मथुरा, सोमनाथ ही प्रमुख मंदिरे. त्याचा सत्तेमध्ये हिंदूंना जिझिया कर भरायला लागतसे. त्याचप्रमाणे त्यांनी इस्लामी शरीयाची सक्ती लादण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सीखांचे धर्मगुरू गुरु तेघबहादूर यांना इस्लाम मध्ये धर्मांतर करण्यात अपयश आल्यावर औरंगजेबाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली व सीखांविरुद्ध कायमचं वैर निर्माण केले. त्याच्या या दुर्बुद्धीमुळे सिख व राजपूत हे मुघली सत्तेपासून दुरावले गेले व दख्खनेत जे य्द्ध झालं त्यात त्याला या दोघांचा पाठींबा मिळाला नाही. 

शिवाजी राजांच्या मृत्युच्यावेळी मराठी राज्याने महाराष्ट्रात भक्कम मूळ धरले होते व महाराष्ट्र, कर्नाटका आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पसरले होते. असे असले तरी हिंदवी स्वराज्य चारही बाजूंनी शत्रूच्या विळख्यातच होते. दक्षिणेला आदिलशाही,कोकणात सिद्दी, गोव्यात व बार्देशात पोर्तुगीज, मुंबईत इंग्रज व पूर्वेला गोलकोंडा ही सर्व संकटस्थळच होती. पण सगळ्यात मोठं संकट उत्तरेकडे असलेल्या मुघलांपासून होतं. १६८१ मध्ये मेवार मधील त्याचा कारभार आटोपून औरंगजेब मराठ्यांविरुद्ध चाल करून आला. त्याचाबरोबर ५०,००,००० सैन्य, तोफखाना, हत्ती, घोडदळ, उंट, सगळं होतं. मराठी सैन्य सर्वमिळून १५,००,००० असेल. त्याचबरोबर मुघलांकडे युद्ध सुरु ठेवण्यासाठी मुबलख खजिना होता. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाह व कुतुबशहा यांची मदत घेऊन औरंगजेबाने मराठ्यांना सर्व बाजूंनी कोंडलं होतं. परंतु २७ वर्ष झुंजून देखील तो त्यांना हरवण्यात अपयशी ठरला. 

शिवाजी महाराजांचं एका बखरीमध्ये वाक्य आहे. हे बेडेकरांच्या cassette मध्ये सांगितले आहे. राजे म्हणतात “आज हजरतीस साडेतीनशे दुर्ग आहेत. एक दिवस खासा आलमगीर दख्खनेत उतरेल. मी माझा एक एक दुर्ग त्या आलमगीराविरुद्ध एक एक वर्ष लढवीन. त्या आलमगीरास अवघी दख्खन काबीज करावयास साडेतीनशे वर्षांचे आयुष्य लागेल!” हा स्वातंत्र्य मंत्र महाराजांनी इथल्या जनतेच्या मनात रुजवला होता. या स्वतान्त्र्यप्रेरक मंत्रामुळेच महाराष्ट्र स्वतंत्र राहू शकला. याचं एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे औरंगजेबाने नाशिक जवळ असलेल्या “रामसेज” या किल्ल्यावरचे आक्रमण. रामसेज हा छोटा दुर्ग व त्यावरील जास्तीतजास्त ५०० सैनिक औरंगजेबाच्या ५००००च्या फौजेविरुद्ध साडेपाच वर्ष झुंजले. एक छोटा किल्ला घ्यायला ज्याला इतका वेळ लागला, तो ३५० वर्षात दख्खन कशी काय काबीज करू शकला असता!! 

थोडक्यात सांगायचं झालं तर १६८१ साली औरंगजेब दक्षिणेत उतरला. त्याच्या अगमनापासूनच या युद्धाची सुरवात झाली. दख्खनेत अतुल्य जीवहानी व आर्थिक नुकसान झाले. पूर्ण जगाला अस्चार्याचे धक्के देत मराठे फक्त या वादळाला सामोरेच नाही गेले, तर त्यातून सुखरूप बाहेर देखील आले. आपलं स्वातंत्र्य टिकण्याची फुटक्या कवडी एवढा योग असताना सर्व जगाला चकित करेल असा निर्णायक निकाल या युद्धाच्या अंती लागला. सर्व बाजूंनी कमकुवत असलेल्या मराठ्यांनी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जिद्दीने लढा दिला व जिंकला. युद्ध संपल्यानंतर मराठे भारत जिंकायला मोकळे झाले व नंतर अटकेपर्यंत भगवा फडकला. भारताच्या इतिहासातील एक निर्णायक युद्धाच्या “details” चे यापुढे काही भागात वर्णन करण्याचा प्रयत्न.

(भाग २- संभाजी राजे वाचायला क्क्लिक करा.)

2 comments:

 1. खरच...ही दुर्दैवी गोष्ट आहे......आपल्याला आपलाच इतिहास नेमका माहीत नसतो....
  खूप छान चिन्मय....!!! हे मांडल्या बद्दल !!!

  सौरभ

  ReplyDelete
 2. योग्य इतिहास मुलांना शिकवला गेलाच पाहिजे. नाहीतर अतिशय पुचाट, दुर्बल, आत्मविश्वासशून्य आणि किंकर्तव्यमूढ पिढी तयार होईल ज्यांना भारतीय इतिहासाचे कमालीचे अज्ञान असेल. खूप चांगला आणि महत्वाचा विषय तू हाती लिहायला घेतला आहेस. तुझे खूप अभिनंदन आणि खूप आभार!
  आकाश

  ReplyDelete