Pages

Sunday, 16 December 2012

२७ वर्षांचा रणसंग्राम-२संभाजी राजे:


१६८० मध्ये शिवरायांचा मृत्य झाला, त्या नंतर रायगडावर काही काळ सत्तेसाठीचे राजकारण सुरु होते. सोयराबाई व संभाजी या दोघांमध्ये वाद निर्माण झाला की पुढचा छत्रपती संभाजी का राजाराम. अखेर सोयराबाईचा सख्खा भाऊ- सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पाठींबा मिळाल्यावर शंभू राजांचे वर्चस्व ठरले व ते महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले. संभाजी राजांनी सोयराबाईना भिंतीत चिणून(?) व त्यांना साथ देणाऱ्या काही सरदारांना(उदा. अण्णाजी दत्तो) हत्तीच्या पायी देऊन ठार केले. त्यांच्या ह्या गैरकृत्याबद्दल खडसावीत समर्थ रामदासांनी राजांना एक पत्र लिहिलं. या पत्रात एका राजानी काय केले पाहिजे हे दिले आहे, त्याचप्रमाणे शिवरायांना आदरस्थानी मानून सभाजीराजनी राज्यकारभार कसा केला पाहिजे असे पत्रात दिले आहे.समर्थ म्हणतात:

अखंड सावधान असावें| दुश्चित कदापि नासावें|
तजवीज करीत बसावें| एकांत स्थळी||१||
कांही उग्र स्थिती सोडावी| कांही सौम्यता धरावी|
चिंता परी लागावी| अंतर्यामीं||२||
मागील अपराध क्षमा करावे| कारभारी हाती धरावे|
सुखी करुनी सोडावे| कामाकडे||३|||
पाणवठी तुंब निघेना| तरी मग पाणी चालेना|
तैसें जनाच्या मना| कळलें पाहिजें||४||
जनाचा प्रवाह चालीला|म्हणजे कार्यभाग आटोपला| 
जन ठाई ठाई तुंबला| म्हणिजेतें खोटें||५||
श्रेष्ठीं जें जें मिळविलें| त्यासाठी भांडत बैसलें|
तरी मग जाणावें फावलें| गळीमासी||६||
ऐसें सहसा करू नयें| दोघे भांडे तिसऱ्यासी जाये|
धीर धरुनी म्हत्कार्ये| समजुनी करावें||७||
आधीच पडिली धास्ती| मग कार्यभाग होत नास्ती|
या कारणे समस्तीं| बुद्धी शोधावी||८||
राजीं राखता जग| मग कार्यभाराची लगबग|
ऐसें जाणुनियां सांग| समाधान करावें||९||
सकळ लोक एक करावे| गनीम नीपटूनि काढावे|
येणें करिता कीर्ती धावे| दिगंतरी||१०||
आधीं गाजवावें तडाके| तरी मग भूमंडळ धाके|
ऐसे न करिता धक्के| राज्यास होती||११||
समयप्रसंग ओळखावा| राग निपटूनि काढावा|
आला तरी कळो न द्यावा| जागामाजी||१२||
राज्यामधे सकळ लोक| सलगी देऊन करावे सेवक|
लोकांचे मनामधे धाक| उपजो चि नयें||१३||
बहुत लोक मिळवावे|एकविचारें करावें|
कष्ट करुनी घासारावें| म्लेंच्छावारी||१४||
आहे जितुके जतन करावें|पुढें आणिक मिळवावें|
महाराष्ट्र राज्य करावें| जिकडें तिकडें||१५||
लोकीं हिम्मत धरावी| शर्तीची तरवार करावी|
चढती वाढती पदवी| पावाल तेणें||१६||
शिवरायास आठवावें| जीवित तृणवत मानावे|
इहलोकी परलोकी राहावे| कीर्तिरूपे||१७||
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||१८||
शिवरायाचे कैसे बोलणे| शिवरायाचे कैसे चालणे|
शिवरायाची सलगी देणें|कैसी असे||१९||
सकळ सुखाचा त्याग| करूनि साधिजे तो योग|
राज्यसाधानेची लगबग| कैसी केली||२०||
त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणवावे पुरुष|
या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१||

हे पत्र वाचून शंभू राजे प्रेरित होऊन "महाराजांनी जे केले, तेच आम्हाला करायचे" असं म्हणून औरंगजेबाविरुद्ध पुढची ९ वर्ष धुमाकूळ मांडला. या पुढे या "धुमाकुळाचे" वर्णन करायचा एक प्रयत्न.  

१६८१ साली सिद्द्यांचा धोका कायमचा काढून टाकण्यासाठी शंभूराजांनी जंजिरा किल्ल्यावर हल्ला केला, पण फितुरी मुळे तो अयशस्वी ठरला. याच काळात औरंगजेबाचा सरदार हुसैन अली खान हा उत्तर कोकणात उतरला होता. संभाजी जंजिरा सोडून हुसैन अली च्या मागे गेला व त्याला कोकणातून उठवून पार अहमदनगर पर्यंत मागे ढकलला. ही मोहीम संपेपर्यंत १६८२ चा पावसाला सुरु झाला होता. पावसामुळे दोनही आघाड्या युद्धाच्या बाबतीत शांतच होत्या. पण औरंगजेब राजनीती खेळत होता. त्याने पोर्तुगीजांशी हातमिळवणी करून गोव्यामध्ये मोगली आरमाराला उतरता यावं यासाठी करार केला. हे झाल्यास मुघलांना एक नवीन रसदपुरवठामार्ग मिळेल व ते मराठी मुलुखात खोलवर वर करू शकतील हे जाणून शंभूराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम काढली. त्यांनी जवळपास गोवा काबीज केला होता-पण तेवढ्यात उत्तरेकडे पुन्हा मोगली हल्ले सुरु झाल्यामुळे त्यांना मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. परंतु त्यांनी पोर्तुगीजांना कायमची धास्ती दिली व त्यांच्याबरोबर करार करून त्यांना या युद्धामधून बाहेर केले. 

१६८३मधे औरंगजेबाने आपला मुक्काम अहमदनगरला हलविला, त्याच्या सेनेचे दोन तुकड्यांमधे विभाजन केले. एका तुकडीचा सेनापती होता शहजादा शहा आलम, तर दुसऱ्या तुकडीचा सेनापती होता शहजादा आझम शहा. पहिल्या तुकडीची मोहीम होती ती म्हणजे उत्तर कर्नाटकातून गोव्यामार्गे दक्षिण कोकणात प्रवेश करणे, तर दुसऱ्या तुकडीची मोहीम होती- खानदेशातून मराठ्यांना हाकलून उत्तर कोकणात प्रवेश करणे. दोनही तुकड्या कोकणात एकत्र येऊन मराठ्यांभोवती विळखा घालून त्यांना एकांगी करणार असा बेत होता. या मोहिमेची सुरुवात तर चांगली झाली. शहा अलमच्या हाताखालची तुकडी कृष्ण नदी ओलांडून बेळगावात प्रवेशली व तिथून गोवा मार्गे दक्षिण कोकणात. परंतु कोकणात शिरताच ते मराठ्यांच्या तावडीत सापडले. मराठे गनिमी काव्याचा अचूक वापर करून या तुकडीला छळायला लागले. त्यांच्या रसदपुरवठामार्गावर छापे टाकून सर्व रसद जप्त केली. मोगली सैन्याचे खायचे हाल होऊ लागले. माघारी फिरणे कठीण आणि पुढे जाने अशक्य अशा अवस्थेत मुघलांना शरणागती पत्करावी लागली व शहा अलमला पुन्हा अहमदनगर गाठावे लागले. मुघलांचा पहिला विलाख्याचा चा डाव धुळीला मिळाला.

१६८४च्य पावसाळ्यानंतर औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीनखान यांनी थेट रायगडावरच हल्ला केला. परंतु रायगडाच्या किल्लेदाराने हा हल्ला फोडून काढला. औरंगजेबाने शहबुद्धीनखानच्या मदतीला खान जेहान ला रवाना केले. परंतु सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्याचा प्रचंड पराभव केला. याचवेळी मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने शहाबुद्दीनखानावर पाचाड येथे हल्ला करून मुघलांचा पूर्ण पराभव केला. १६८५मधे शहा अलम पुन्हा एकदा गोकाक मार्गे दक्षिण कोकणात उतरला. या वेळी सुद्धा त्याच्या सैन्यावर मराठ्यांचे छापे सुरूच राहिले व तो जेरीस येऊन पुन्हा माघारी फिरला. औरंग्जेबाजा मराठ्यांभोवती विळखा टाकण्याचा हा दुसरा प्रयत्न देखील फसला.

एप्रिल १६८५मधे औरंगजेबाने दक्षिणेत मुघल साम्राज्याचा विस्तार करायचे ठरवले, व काही काळ मराठ्यांकडे दुर्लक्ष करून आदिलशाही व कुतुबशाही वर चाल केली. ही दोनही घराणी मुसलमान असली तरी शिया मुसलमान होती, व सुन्नी औरंगजेबाला त्यांचा रागच होता. त्यांनी दोनही राज्यांबारोबारचा आपला करार रद्द करून त्यांच्यावर हल्ला केला. मराठी मुलुखात थोडी शांतता आली होती. याचा फायदा घेत मराठ्यांनी उत्तरेकडे मुसंडी मारून नर्मदेच्या मुखाशी असलेल्या भडोच शहरावर छापा मारून खूप संपत्ती जिंकून आणली. त्यांना गाठायला जे मुघल सैन्य आले होते, त्याला चकवून कमीतकमी नुकसानात मराठे स्वराज्यात दाखल झाले, व गरज असलेला खजिना स्वराज्यात आणला गेला.

औरंगजेबाची दक्षिणेतली स्वारी चांगलीच सुरु होती. सप्टेंम्बर १६८६ साली मुघलांनी विजापूर जिंकले व विजापुरी राजा सिकंदर आदिलशहा मोगली कैदेत पडला. गोलकोंड्यावर हल्ला केल्यानंतर युद्धात फारसा रस नसलेल्या कुतुबशहाने मोगलांना खंडणी द्यायचे स्वीकारले.परंतु ही खंडणी मिळाल्या मिळाल्या औरंगजेबाने आपले खरे रंग दाखवीत कुतुबशाहीवर चाल केली. कुतुबशाही राजा अबू हुसैन मुघलांच्या हाती सापडला व मुघलांनी त्याला कैद केले. मुघलांच्या या आदिलशाही व कुतुबशाही विरुद्ध च्या लढाया सुरु असताना मराठ्यांनी मैसुरच्या राजाला आपल्या बाजूने फिरवायचा प्रयत्न केला. पेशवे मोरोपंत यांची बंधू केसोपंत हे बोलणी करत होते. परंतु विजापूरच्या पराभवानंतर चित्र पालटले व मैसुरनी मराठ्यांबरोबर यायला नकार दिला. हा धक्का बसला असला तरी शंभू राजांनी अनेक विजापुरी सरदार आपल्या सेनेमध्ये भरती करून आपली सेना वाढवली.

विजापूर व गोलकोंडा विरुद्धच्या मोहिमा उरकून औरंगजेबाने आपले लक्ष पुन्हा एकदा मराठ्यांवर रोखले. संपूर्ण दख्खन काबीज करायला आता फक्त मराठ्यांना हरवायचं होतं. औरंगजेबाला शंभूराजांविरुद्ध निर्णायक विजय कधीच मिळाला नव्हता. परंतु १६८८च्य डिसेंबरमध्ये त्याला प्रचंड यश मिळाले. खुद्द शंभूराजे संगमेश्वर जवळ पकडले गेले. मराठ्यांच्या छत्रपतीलाच मुघलांनी पकडलंय म्हणल्यावर या विजयाने औरंगजेब पराकोटीचा खुश झाला. त्यांनी शंभूराजांना इस्लाम मधे धर्मांतर करायला सांगितले. पण शंभूराजे एका सिंहाचे पुत्र होते. या बादशाहला मुजरा करायला हा काही आमचा बाप नाही! लायकी तरी आहे का त्याची की त्याला मुजरा करावा! कोणालाही न जुमानणाऱ्या शंभूराजांनी औरंगजेबाचे काहीही ऐकले नाही- उलट त्याचाच अपमान केला. त्यांचा मृत्यु आता अटळ झाला होता. पण औरंगजेबाने त्यांना सोपं मरण मिळू दिलं नाही. हाल हाल करून शंभू राजांना मारले. डोळ्यामध्ये गरम सळया घालून त्यांचे डोळे काढण्यात आले. जीभ कापली व खूप छळ केला. डिसेंबर मध्ये पकडले गेल्यानंतर साधारण मार्च-एप्रिल पर्यंत त्यांचे हे हाल सुरु होते. औरंगजेबाने राजांना मारायचा दिवस ठरवला होता. त्या प्रमाणे फाल्गुन वाद्य अमावास्येला शंभूराजांना वाढू-कोरेगावच्या छावणीत आणण्यात आले. मारेकरी टपलेच होते. औरंगजेबाने इशारा केल्याकेल्या त्यांच्या तलवारी शाभूराजांच्या देहावर कोसळल्या. त्याचं मस्तक मारण्यात आले. देहाचे तुकडे करून कोल्ह्यांना व कुत्र्यांना खायला देण्यात आले. दुसऱ्या दिवशी असतो गुढी पाडवा. आपण घराघरात गुढ्या उभारून नव्या वर्षाचे स्वागत करतो. औरंगजेबाने राजांना ठार करून मराठी जनतेला जणू सांगितलं- उद्या गुढ्या उभारता ना? मग तुमच्या राजाच्या मस्तकाच्याच गुढ्या उभारा! असा क्रूर होता हा औरंगजेब! या असुरा विरुद्ध शंभूराजांनी ९ वर्ष कडवी झुंज दिली हे आपण कोणीही विसरता कामा नये. धर्मांतर करून जगणे शक्य असताना राजांनी मृत्युला पसंती दिली व बेडर पणाने मृत्युला जणू आलिंगनच दिले! राजे धर्मवीर म्हणूनच आहेत!

संभाजी राजांचे एक कौतुक करावेसे वाटते. त्यांनी औरंगजेबाचा एक मंडलिक राजा व्हायचे नाकारले. मृत्यला सामोरे गेले, म्हणून पुढे १८ वर्ष औरंगजेबाला दक्षिणेत थांबावे लागले. याचाच फायदा घेत उत्तरेत राजस्थान, पंजाब व बुंदेलखंड इथे राजपूत, सिख व महाराजा छत्रसाल यांनी मुघलांविरुद्ध बंड पुकारून नवीन स्वधर्माची राज्ये निर्माण केली. संभाजी राजांच्या मृत्युमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर पूर्ण भारतात हिंदुत्त्वाची ज्योत पेटवली गेली. 

संभाजी राजांचे पूर्ण आयुष्य असेच आहे- त्यांना कधीही कोणताही निर्णायक विजय मिळवता आला नाही. बरेच मराठे त्यामुळे राजांना फार मानीत नसे. किंबहुना राजांच्या आधीच्या काही कृत्यांमुळे काही मराठी सरदार मुघलांच्या बाजूनीच होते! पण आपल्या राजाला अशा प्रकारे मारलेला पाहून इकडची जनता चौताळली. गार पडलेय धोंड्यांवर शाभूराजांच्या रक्ताचे कण उडाले व या गार पडलेल्या धोंड्याचे लाव्हा रसातच जणू रूपांतर झाले. या वेळी मुघलांविरुद्ध खड्ग उचलेले नाही, तर आपल्या पदरी पण हाच मृत्यु हे लोकांना कळून चुकले. एकेका घरातून एक एक तलवार स्वराज्याच्या बचावासाठी बाहेर आली. रामचंद्रपंत अमात्य, संताजी, धनाजी, शंकराजी नारायण व इतर कित्येक शूर एकत्र येऊन मुघलांशी झुंज सुरु ठेवायचा निर्णय कायम ठेवला. सर्व तहाच्या चर्चा माघारी घेतल्या. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली पुढे ११ वर्ष औरंगजेबाशी सातत्याने लढले. याला कारणीभूत होते ते म्हणजे शंभूराजे. त्यांना जिवंतपणी जरी यश मिळाले नाही, तरी त्यांच्या मृत्य्ने त्यांना जे यश दिले, त्याची धन्यता एका खऱ्या योद्ध्यालाच कळू शकेल! शत्रूशी झुंजायला जिद्द व हेतू मिळाला. 

शाहीर योगेश यांनी शाभूराजांवर रचलेले एक काव्य सांगून आजचा भाग थांबवतो.


देश धरम पर मिटनेवाला
शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परमप्रतापी,
एक ही शंभू राजा था ।।

तेज:पुंज तेजस्वी आँखे,
निकल गयी पर झुका नही ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का,
दिव्य स्वप्न तो मिटा नही ।।

दोनो पैर कटे शंभूके,
ध्येयमार्ग से हटा नही ।
हाथ कटे तो क्या हुआ,
सत्कर्म कभी भी छुटा नही ।।

जिव्हा काटी खून बहाया,
धरम का सौदा किया नही ।
शिवाजी का ही बेटा था वह,
गलत राह पर चला नही ।।

रामकृष्ण, शालिवाहन के,
पथसे विचलित हुआ नही ।।
गर्व से हिंदू कहने मे,
कभी किसी से डरा नही ।।

वर्ष तीन सौ बीत गये अब,
शंभू के बलिदान को ।
कौन जिता कौन हारा,
पूछ लो संसार को ।।

मातृभूमी के चरण कमल पर,
जीवन पुष्प चढाया था ।
है दूजा दुनिया में कोई,
जैसा शंभूराजा राजा था ।।

No comments:

Post a Comment