Pages

Thursday, 6 December 2012

प्रिय सचिन...


(फोटो क्रेडिट्स: आमचे मित्रवर्य वैभव कापडी)


प्रिय सचिन,

मला माहिती आहे की तू मला एक कणभर सुद्धा ओळखत नाहीस, माझं नाव पण ऐकलं नसशील-ओझरत्या उल्लेखात पण नाही. माझं नाव चिन्मय दातार(चुकून टेबल टेनिस विजेता म्हणून वाचलं असलंस, तर तो मी नाहीये). पुण्याचा आहे. तुझा एक भक्त आहे. भारतातल्या प्रत्येक महानगरातल्या प्रत्येक पोरासारखा मी पण क्रिकेट बघत, खेळत आणि तुला श्रद्धास्थानी मानत मोठा झालो आहे. आज खास तुला लिहिण्याचं कारण म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचं आहे- नाही, जास्ती टेन्शन घेऊ नकोस, पुणेकर असलो, तरी मी तुझ्यापुढे माझं कोणतंही मत मांडणार नाहीये, आणि कोणताही सल्ला देणार नाहीये.[पुणेकरांना मतप्रदर्शन न करू द्यायची ताकद ज्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांमधे आहे, त्यात तू आहेस.] मला फक्त तुला आज खरंच खूप thank you म्हणायचं आहे, म्हणून या पत्राद्वारे थोडं लिहितो आहे.
आजकाल बरेच जण तुला रिटायर हो, असं सांगत आहेत- त्यात काही क्रिकेट मधले विद्वान आहेत तर काही चाहते. पण या रिटायर हो म्हणणाऱ्या लोकांबरोबरच माझ्यासारखे अनेक चाहते आहेत, जे तुला म्हणतील तू कधीच रिटायर होऊ नकोस. तू आयुष्यभर फक्त आणि फक्त क्रिकेटच खेळावंस- किंबहुना तुझं वय कसं तरी करून "फ्रीझ" करावं, व तुला कायमचं २५-३३ या वयात जखडून ठेवावं असं देखील वाटतं. पण ते शक्य नाही हे चांगलंच माहिती आहे. वय वाढणं शेवटी एक नैसर्गिक प्रोसेस आहे, आणि तिच्याशी खेळणारे आम्ही कोण-अगदी स्वप्नात सुद्धा!

आता तू जवळपास ४० वर्षांचा होत आला आहेस, आणि तरी देखील तुला बघून, तुझ्या क्रिकेट ला बघून आमच्या बघण्यापेक्षा कितीतरी जास्त उत्साहाने तू खेळताना दिसतोस. तुला मी खरं सांगतो- तू खेळायला आलास की इथे सिंगापूर मध्ये मी लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु करतो- अगदी हातातलं काम सोडून. मात्र तू आउट झालास की लगेच बंद करतो. या मागे एकच कारण आहे. तू जोवर खेळतो आहेस, तोवर माझ्यासारख्या चाहत्याला फक्त तू मिडल ऑफ दि Bat नी मारलेले फटके पहायचे आहेत आणि त्याचा "टक्क" जो आवाज येतो त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तू कधी न कधीतरी रिटायर होणार आहेस, हे आम्ही पण चांगलंच जाणतो. फक्त तू जोवर खेळतो आहेस, तोवर डोळे भरून तुझं क्रिकेट पहायचंय भाग्य आम्हाला मिळो एवढंच मनात असतं.

खरं तर आता तुझ्याकडून अजून काहीही एक्स्पेक्ट करणं चुकीचंच आहे. तू किती किती दिलं आहेस आम्हाला. क्रिकेटचा प्रत्येक सामना आपणच जिंकू, हे आशावादी स्वप्न पाहू दिलं आहेस. कित्येक सामने एकहाती जिंकून दिले आहेस. माझ्यासकट कित्येक लोकांना खेळाची गोडी लावली आहेस. मला तर अजून आठवतं की शाळेतून घरी आलो, की मी आणि माझा मित्र टीव्ही वर तुझे पाहिलेले straight drives आणि cover drives तू कसे मारतोस- तुझं फुटवर्क कसं असतं, bat खाली कशी आणतोस यावर वाड्याच्या अंगणातल्या भिंतीवर बॉल मारून एकमेकांना दाखवायचा आणि सांगायचा प्रयत्न करायचो. खरंच सांगतो, तुला बघत, तुला "worship" करत, तुझ्या प्रत्येक चौकाराचा व षटकार, तसेच प्रत्येक ५० व १०० चा आनंद घेत आम्ही लहानाचे मोठे झालो. तुझ्या प्रत्येक शतकानंतर आम्ही वेड्यासारखे नाचलो आहोत. तुझ्या २०० नंतर फटाके पण उडवले होते. त्युझ्या १००व्या शतकानंतर मी चक्क रडलो होतो. टीव्ही पाहताना तुझ्याएवढा आनंद आम्हाला कोणीही दिला नाहीये. किंबहुना तू सोडून इतर कोणीही टीव्ही पाहताना डोळ्यात आनंदाश्रू आणले नाहीत. तू फक्त या प्रकारचा आनंदच नाही दिलास, तर चक्क शाळा, कॉलेजला दांडी मारायचं कारण पण दिलं आहेस. टेस्ट मध्ये "सचिन batting करतोय हो" असं कारण देऊन मी कितीदा कॉलेजला दांडी मारलीये हे माझं मलाच माहित्ये. आता या पेक्षा जास्ती काही मागणं बरोबरच दिसत नाही.

असो. तू खरंच तुला हवं तितकं खेळ. तुला "रिटायर हो", असं म्हणणारे आम्ही कोण ना!! तू ज्या दिवशी पर्यंत खेळशील, त्या दिवशीपर्यंतच काय तर आयुष्यभर मी कायम तुझा चाहता राहीन. फक्त रिटायर होशील त्या दिवशी एक गोष्ट खूपच खटकेल. या पुढे ब्रेट ली ला जो काही straight drive मारला होतास, किंवा कित्येक bowlers ला कवर्स मधून सणसणीत हाणून काढलं होतेस, किंवा मिड विकेट वरून फ्लिक्स मारले होतेस, नाहीतर तुझे paddle sweeps- हे सगळे आता परत लाईव्ह कधीच पाहता येणार नाहीत.(किंबहुना तसे शॉट्स परत कधीच इतर कोणाही कडून पाहता येणार नाहीत.)
तू अजून किती दिवस/महिने/वर्ष खेळणार आहेस, हे मला माहिती नाही. पण तू जितके दिवस खेळणार आहेस, तितके दिवस मला डोळे भरून तुझं स्ट्रोक-मेकिंग पहायचं आहे. तू आजपासून रिटायर होईस्तोपर्यंत प्रत्येक इनिंग मधे ० वर जरी बाद झालास, पण त्या ० मध्ये एक कडक cover drive, straight drive असला तरी सुद्धा तो मलाच काय तर तुझ्या सर्व चाहत्यांना किती आनंद देऊन जाईल याचं मी वर्णनच करू शकत नाही. आता फक्त आणि फक्त तुझ्यातल्या त्या जीनियस स्ट्रोक-मेकरला पहायचं आहे. सचिन अगदी मनापासून सांगतो, तू रिटायर झालास की मी पुन्हा त्याच उत्साहाने क्रिकेट बघीन का नाही असा पण कितीदा प्रश्न पडतो. नाही, क्रिकेट कितीही आवडत असलं, तरी सुद्धा तू गेल्यावर ते पाहण्यात मजा नाही. कुसुमाग्रज त्यांच्या एका कवितेत(पृथ्वी चे प्रेमगीत) म्हणलेच आहेत ना... "परी भव्य ते तेज पुजून पाहून, घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे"." तुला खेळताना बघून क्रिकेटच्या बाबतीत माझं थोडं कुसुमाग्रजांच्या या कवितेसारखंच झालं आहे.

मला माहित्ये तुला अनेक लोक म्हणत आहेत की आता तुझी वेळ संपत आलीये- मला त्या लोकांना सांगायचं आहे- थोडा हावरटपणा करू देत ना आम्हाला पण. अजून थोडे दिवस शक्य आहे, तर बघू देत ना सचिनला खेळताना. "शॉट" असा उद्गार काढायच्या खूप कमी संध्या आमच्याकडे राहिल्या आहेत. निदान थोडे दिवस तरी का होईना भरभरून ही दाद द्यायची संधी हवी आहे आम्हाला! एका सदाशिव पेठी पुणेकराकडून एखाद्या कलाकाराला, खेळाडूला , वास्तविक कोणालाही दाद "कमवावी" लागते- ती कारण नसताना उगाच वरवर मिळत नाही. सचिन विरोधकांनो- तुम्ही प्रयत्न करून पहा, मग कळेल हे किती अवघड आहे!(हर्क्युलेस ला सुद्धा दाद मिळवायला नेहमीपेक्षा एक परीक्षा जास्ती द्यायला लागेल). हा माणूस ती सहज मिळवून जातो! शेवटी कायेना, क्रिकेट ही एक कला आहे. गाण्याच्या क्षेत्रात कसं १००० उच्चकोटीच्या गायाकांमधून एकच भीमसेन होतो, किंवा एकच लता येते, तसच क्रिकेटच्या विश्वात १००० खेळाडूंमधून एक सचिन येतो. भीमसेन अण्णा, लता दीदी आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांना "तुम्ही आता गाऊ नका किंवा तुम्ही आता अभिनय करू नका" हे म्हणायचं धाडस कधीच कोणी करणार नाही, तसच तुझ्या बाबतीतही झालं पाहिजे, कारण शेवटी तू एक "कलाकार" आहेस. तुझा कॅनवास इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, एवढाच तुझ्यातला आणि इतर कलाकारांमधला फरक. तुला आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काही बोलणं, कसलाही सल्ला देणं म्हणजे काजव्याने सूर्याला गिळंकृत करायचा फाजील प्रयत्नच म्हणावा लागेल!

सचिन, तू तुझ्या रिटायरमेंट पर्यंत असंच आमच्यासारख्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवावस एवढी एकच विनंती आहे. तू कायम आमचा हिरोच राहशील. देव करो की तू कीर्तीने कायमच "वाढता वाढता वाढे" होवो आणि वयाने "लहानपण देगा देवा" या दिशेने जावो... वाढत्या कीर्ती आणि कमी होणाऱ्या वयाबरोबरच आम्हा चाह्त्याच्या मनावर अजून २२ वर्ष अधिराज्य गाजवाशील एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना...

तुझा भक्त,
चिन्मय अनिल दातार.

1 comment: