Pages

Sunday, 3 March 2013

कॉलेजमधले कन्फेशन्स का किस्से?

सध्या फेसबुकवर "सी.ओ.ई.पी. कन्फेशन्स" नामक एक पेज सुरु करण्यात आलं आहे. २ दिवस सुरु आहे आणि साधारण १०० एक कन्फेशन आले असतील त्यावर. माझी पण २-४ आली होती. (पण आता ते पेज गायब झालंय, आणि त्या जागी सी.ओ.ई.पी कन्फेशन्स- या adminला गोट्या आहेत हे पेज सुरु केले आहे.) अशी अफवा आहे की त्या admin ला कोणीतरी जीवे मारण्याची धमकी दिली(आणि तो घाबरला!- आवरा!) असो, होतं असं कधी कधी(प्राची हंडेचा हे वाक्य म्हणायचा टोन आठवला एकदम!) तर सांगायचं झालं म्हणजे या पेज वर आपले कन्फेशन अनोनिमसली टाकता यायचे. कोणी नक्की काय टाकलं आहे हे कळण्याचा काही मार्ग नाही. पण एक पाहिलं, कन्फेशन पेक्षा किस्से जास्त शेअर होत होते. मनात विचार आला की माझे किस्से, माझे म्हणजे मी ज्यात डिरेक्टली इंव्होल्व्ड आहे असे, इतर कोणी स्वतःचे म्हणून खपवायच्या आत आधीच माझ्या ब्लॉगवर जाहीर पणे सांगून टाकतो! त्या निमित्ताने कॉलेज मधल्या काही आठवणींचा पुन्हा उजाळा होईल!

या पोस्टमध्ये एक पण कन्फेशन नसेल. त्यासाठी फेसबुक पेज आहेच ना! इथे फक्त किस्से टाकतोय! कॉलेजमधले २ किस्से आधीच ब्लॉगवर पोस्ट केले आहेत. ते म्हणजे फ्रिजची किल्ली ढापली होती तो, आणि गंधालीची गाडी लपवली होती तो. या पोस्टमधून तितक्या डिटेलमध्ये जाता येणार नाही माहिती आहे. म्हणूनच अगदी थोडक्यात सांगतोय. हा पोस्ट "सी.ओ.ई.पी. किस्से" या लेबल खाली असणाऱ्या पोस्ट्स चा बेस पोस्ट असेल. (आधीचे २ पण लिंक्ड असतील.)  आमच्या कोणत्याही इतर मित्र-मैत्रिणीला किंवा कोणत्याही शिक्षकाला आमच्या वेडेपणाचा त्रास झाला असेल, तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. त्यांनी झालं-गेलं विसरून जाऊन या किस्स्याचा भाग व्हावे हीच त्यांना विनंती. असो, जास्त टाईमपास न करता आमचे (माझे आणि माझ्या मित्र-मैत्रिणींचे )काही किस्से.

प्रथम वर्षातले:

१) राव आणि रोहिणीचे भांडण: आमचे सगळे वर्ग २३ नंबरच्या खोलीत भरायचे. प्रथम वर्ष असल्यामुळे मुला-मुलींच्यात अजून तितकी एकी नव्हती. मुलं वेगळी बसायची आणि मुली. एकदा रोहिणीने एका बेंचवर तिची बॅग ठेवली होती. राव जेव्हा वर्गात आला, तेव्हा रोहिणीनी धरलेल्या जागेशेजारी एक जागा होती. राव तिथे जाऊन बसला. रोहिणी वर्गात आल्यावर दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं म्हणायला काहीही हरकत नाही! काय भांडले होते!! अशक्य म्हणजे!! त्या नंतर राव आणि रोहिणी ही कॉलेजची ऑल टाईम हिट जोडी! (हा किस्सा सांगितला की किस्से सांगण्याचा श्रीगणेशा होतो. कॉलेजचे किस्से आठवताना याचा नंबर कायम पहिला असतो!)

२) आर.आर. जोशी सरांचा मोलाचा सल्ला: लेक्चर नंतर बोट क्लब वर आउटिंगला जायचं होतं म्हणून वर्गात (अप्लाईड मेकॅनिक्स ) शॉर्ट घालून बसलो होतो. तास संपल्यानंतर आमचे सर आर.आर जोशी यांनी बाजूला घेतलं आणि सांगितलं "तुला खेळायला जायचं असेल कदाचित, पण आपण वर्गात शक्यतो ट्राऊझर घालून बसतो." संपलो होतो मी तर यानंतर! म्हणजे सरांसमोर हसावं का नाही असा प्रश्न पडला होता!

३) खळदकर मॅडमचा केमिस्ट्री वर्ग: हा वर्ग मेटलर्जी डिपार्टमेंटच्या ११ नंबरच्या खोलीत व्हायचा. एकदा खळदकर मॅडमनी आम्हाला प्रेसेंटेशन करायला सांगितलं होतं. एक एक विषय ५ जणांचा एक ग्रुप १० मिनिटात कव्हर करायचा. एका ग्रुप चे प्रेसेनटेशन सुरु असताना खळदकर मॅडमनाच डुलकी लागली. यात त्यांचा काहीच दोष नव्हता. रामराया जन्माला ती तळतळती दुपारची वेळ होती, नुकतंच सगळ्यांचं जेवण झालं होतं, आणि या वेळी झोप येणं अनिवार्य! आम्ही पुणेकर म्हणून आम्ही बिनधास्त सगळ्या तासांमध्ये झोपायचो, पण एखाद्या शिक्षिका मुलं प्रेसेनटेशन देताना झोपल्याचे मला तरी इतर किस्से आठवत नाहीयेत! सोलिड होतं ते. (मॅडमनी नंतर एक जेली स्वीट खाऊन त्यांची झोप घालविली होती.)

५) इलेक्ट्रीकलच्या सरांचा फोनवाला किस्सा: मुळात हे असे होऊ शकते हे कळल्यावरच मी हादरलो होतो. आम्ही परीक्षा संपली होती, सुट्टी सुरु होती, म्हणून मी, माझ्या २ मैत्रिणी आणि १ मित्र(२ मैत्रिणींपैकी एक वर्गातली होती.) सगळे सी.सी.डीत कॉफी प्यायला बसलो होतो. साधारणतः दुपारचे ३-४ वाजले असतील. या विचित्र वेळी आम्ही बाहेर काय करत होतो देव जाणे! पण काहीतरी खबर हाती आली होती म्हणून बहुदा डिस्कस करायला बसलो होतो. असो, तर त्या सेमेस्टरला आम्हाला इलेक्ट्रीकल हा विषय होता. त्याचे सर बरे होते.(नाव आठवत नाहीये आता.) पण अहो त्या दिवशी त्यांनी फारच डांबिसपणा केला हो! आमच्या वर्गातल्या त्या ललनेला फोन करून तिचे मार्क सांगितले हो चक्क! म्हणजे तिला बरे मार्क मिळाले होते, म्हणून काय रीसल्ट डिक्लेअर व्हायच्या आधी असेच सांगायचे का! बर फक्त तिलाच सांगितले! बाकी कोणालाच नाही! "आवरा" ज्याला म्हणता येईल असाच हा किस्सा होता!

६) पंटमधून डीबार होणे: हा खरंतर लाजीरवाणा किस्सा आहे, पण या कारणासाठी बोटक्लब वर कोणीही डीबर झालं नसेल. आम्ही पहिल्या वर्षात बोटक्लब वर पडीक असायचो. १०-१२ जण. एकदा पंट काढल्या होत्या, म्हणून २ पंट घेऊन आम्ही १० लोकं बुरुझाजवळ गेलो होतो. तिथे पाणसाप दिसत होते, म्हणून तात्या पंटमध्ये उभा राहिला. नंतर त्या बोटींमध्ये आम्ही नाचत होतो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होतो, वाट्टेल ते करत होतो.व्हार्फवर परत आल्यावर बोटीत असताना नियमांचे उल्लंघन केले म्हणून आम्हा सगळ्यांना १० दिवस डीबार करण्यात आले होते. हा खरंच एक कमाल किस्सा आहे, कारण बहुदा त्या नंतर कोणीही या कारणासाठी डीबर झाला नसणारे.(मी, सुमेध, वीरेंद्र, अनंत, अभिषेक, तेजस, सागर गंभीर, रियाझ , माटे आणि अजून एक कोण होता आठवत नाहीये.)

७) बोटक्लब वरचे अनेक किस्से: बोटक्लब वर रिगाटाच्या वेळी असंख्य किस्से केले होते. त्यातला एक सांगतो. रात्री कामं करत बसलो होतो, दुसऱ्या दिवशी शिनिवार असल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. रात्री १२ ला काम संपवल्यावर इतक्या रात्री कुठे घरी जायचं म्हणून कॉलेजमधेच थांबलो. मी, रोहन, श्रद्धा, निळ्या, संजीव, बिड्या, पुंड्या, सानिका, गीता, मयूर, कुणाल- नेहमीचा बोटक्लब ग्रुप. बोटक्लबचे ऑफिस बाळूशेठनी बंद केले होते म्हणून आम्ही बाजूलाच असलेल्या जिम मध्ये बसलो होतो. रात्रभर पत्ते, माफिया असे प्रकार सुरु होते, नंतर ४-५ ला तिथेच बेंच प्रेस वर झोपलो! सकाळी ६.३० ला जे.व्ही.के होता, म्हणून तसाच उठून क्लासला गेलो, आणि तिकडून घरी! घरी होणार ती हजामत झालीच, पण नंतर लगेच २ वाजता परत काम करायला गेलो होतो! मजेचे दिवस होते ते बोटक्लब वाले खरोखर!

८) गांधालीची गाडी लपवणे: या किस्स्यावर मी आधीच एक ब्लॉगपोस्ट लिहिला आहे. तो जरूर वाचवा. पण वाढीव किस्स्यांमध्ये तो नक्कीच आहे!! इथे वाचू शकता.

९) माइंडस्पार्क नंतरचा डिच: माईंडस्पार्कच्या एका प्रोग्रॅम नंतर आम्ही एका मित्राला जबरदस्त डिच दिला होता, पण त्या बद्दल काही न लिहिलेलेच बरे! :P

असो, तर पहिल्या वर्षातले एवढेच किस्से आठवतायत आत्ता तरी. नंतर काही आठवले तर टाकीन.

दुसऱ्या वर्षातले:

सेकंड इयर मधे वर्ग बदलले होते. आता इलेक्ट्रोनिक्सचे सगळेजण एकत्र होतो. (पहिल्या वर्षी ३-४ ब्रांच एकत्र होते.) त्यामुळे शक्क्यातो किस्से वर्गातच असायचे, नाहीतर बोटक्लब वर. त्यात काही आठवणारे खालील पैकी:

१०) मधुरा आमच्या वर्गात येऊन बसली होती: मधुरा(मॅड-बी) मेक मध्ये होती, पण एक दिवस कोण जाणे का, पण अंगात खाज म्हणून ती आमच्या एका लेक्चरला येऊन बसली होती. सायकोलोजीचे लेक्चर होते. बर टाईमपास करायला म्हणून आली तर ठीक, पण ही बया वर्गात उत्तरं देत होती! आवरा म्हणजे! काहीही वाढीवपणा होता तो! नंतर वर्ग संपल्यावर तिला जोरदार ठेच लागली होती, (पायरी वरून सटकली होती बहुदा!) असो- पण एक मेमोरेबल किस्सा होता तो!

११) प्रतीमानंद महाराजांची चप्पल: बोटक्लब वर घडलेला एक कमाल किस्सा आहे हा. बोटक्लब वर एक भलं मोठं चिंचेचं झाड आहे. संध्याकाळी आउटिंग करून नुकतेच सगळेजण परत आलो होतो. प्रतिमच्या डोक्यात कुठून किडे वळवळले देव जाणे, पण तो त्याच्या गाडीची किल्ली हवेत उडवायला लागला. किल्ली जाऊन चिंचेच्या झाडत अडकली. साधारण कुठे अडकलीये याचा अंदाज आल्यावर प्रतीमने त्याची चप्पल काढून किल्ली काढायला झाडत टाकली. १-२ द नेम चुकला, पण तिसर्यांदा टाकल्यावर किल्ली खाली यायच्या ऐवजी चप्पलपण झाडत अडकली. नंतर दुसऱ्या चपलेचे पण तेच झाले! मूर्खपणाचा कळस होता हा म्हणजे! पण सॉलिड धमाल आली होती. नंतर त्याच्या चपला आणि किल्ल्या काढायला आम्ही वरती badminton कोर्ट च्या इथे गेलो, आणि तिकडून झाड हलवून खाली पाडल्या. पण खरं, असा किस्सा पुन्हा न होणे!

१२) प्रतीम आणि श्रीकृष्ण ज्यूस सेंटर: रोइंग करून झालं की आम्ही सगळे या ठिकाणी कलिंगडाचा ज्यूस प्यायला जायचो. डेक्कनचे naturals आहे त्याच्यामागे हा आमचा अड्डा होता, कॉलेजची चारही वर्ष. तिकडचा मालक भयानक खडूस माणूस होता, आणि कायम आरडाओरडी करायचा. एक फाटलेला आवाज होता त्याचा.(फाटलेला व्हूफर) एकदा असंच ग्लास घेऊन खाली बसलो होतो, आणि कल्ला करत होतो, म्हणून तो ओरडला. दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा तो नव्हता. आत काम करणारे लोक ढिलाईने काम करत होते, म्हणून प्रतीम त्याच्यासारखा आवाज काढून आरडा-ओरडी करायला लागला, तेवढ्यात तो आला, आणि ऐकलं. संपलं! येडा झाला होता! या वर्षात प्रतीम चे असंख्य किडे होते. त्याच्या घरी एकदा रात्री नाईट-आउट टाकला होता. (त्याच्या समोरच्या flatमध्ये ८-१० पोरी राहायच्या म्हणून फक्त! संजीव आणि निळ्या ON होते त्या दिवशी. प्रतीम कायमच ON असायचा!)

१३) रावला पाठवलेले spam मेल्स: मी, मधुर, प्रांजली आणि रोहन एक प्रोजेक्ट करत होतो, एका competition साठी. प्रांजलीच्या घरी काम करत होतो. अंगात खाज ना, काहीतरी किडे सुचले! रोहिणीला तेव्हा आम्ही म्हैस म्हणायचो.का ते परमेश्वरास ठाऊक. आणि तिचा आणि राव चा तो पहिल्या वर्षी झालेला वाद- त्यानंतर रावला तीचावरून सॉलिड चिडवायचो. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण आम्ही एका म्हशीचा फोटो डाउनलोड करून तो रावला ई-मेल केला होता! खरंच आवरा!!

१४) गर्ल इन दि रेड साडी: हा किस्सा ईमेल कॉलेजच्या id वर आला होता. traditional day च्या दिवशी कोणीतरी मुलगी लाल साडी नेसून आली होती, ती कोणत्या तरी शेवटच्या वर्षातल्या मुलाला आवडली, ती कोण होती हे त्याला माहिती नाही, परत कधी भेटेल का माहिती नाही, दिसली तरी ओळखता येईल का ते सुद्धा माहिती नाही( कोणजाणे का, पण असल्या दिवशी पोरी नेहमीपेक्षा वेगळ्याच दिसतात. त्या अजिबात सुंदर दिसत नाहीत पण- सी.ओ.इ.पी मधल्या तर नाहीच नाही! काकू दिसतात सगळ्या!) ती नक्की कोण होती हे कळण्यासाठी तिनी घातलेले कपडे आणि साधारण तिचे वर्णन अशी ईमेल या माणसाने student@coep या कॉमन id वर पाठवली होती. त्यानंतर जो काही कल्ला झाला होता ना! आई गं! कमाल!! यात आम्ही कोणीही प्रत्यक्षपणे involved नाही, पण इतका कमाल किस्सा आहे, की तो सांगितलाच पाहिजे!

१५) रिगाटा नंतरची मारामारी: सिद्धी आणि प्राची यांना कॉलेजमध्ये असताना वेगळं करणे impossible असायचे. ८१व रिगाटा झाल्यानंतर आम्ही सगळेजण- मी, रोहन, संजीव, निळ्या, प्रतीम, श्रद्धा, सिद्धी, प्राची, करंदीकर, बिड्या, सगळे स्टेज वर रात्री २ वाजता लुख्खेगिरी करत होतो. त्यात मजेत सिद्धी आणि प्राचीत निल्यानी काड्या लाऊन दिल्या. प्राचीच्या केसांची क्लिप ढापली होती, आणि ती सिद्धीने घेतलीये असं सांगितलं. दोघींमध्ये ज्याला "cat-fight" म्हणतात ती सुरु झाली होती. केस ओढणे, कपडे ओढणे, नखं मारणे असे प्रकार. हे सगळं रेकॉर्डेड आहे! यात प्रतीम महाराजांचे उद्गर जे आहेत "आईचा!!! आईचा!! असं दृश्य मी आयुष्यात कधीही पाहिलं नाहीये!" ते बिनतोड आहे! अर्थात, हा व्हिडीओ कधीच पब्लिक होणार नाहीये. तो फक्त बोटक्लबच्या आमच्या ग्रुप मध्ये राहणारे, पण हा किस्सा अविस्मरणीय किस्स्यांपैकी एक नक्कीच म्हणता येईल.

१६) ACS ची बुडलेली परीक्षा: एकदा रिगाटाची practice करायला मी आणि तेजस आमची बोट घेऊन HT-होळकर या दरम्यान कुठेतरी होतो.(बहुदा सी.वय.जी. ची तयारी सुरु होती. होळकर पूल ते बी.ई.जी. बोट चालवली होती!) मोज्यात फोन टाकून आणला होता. नदीच्या मध्यभागात त्या निमुळत्या बोट मध्ये, कॉलेजपासून कमीतकमी ५ किमी लांब आलो असू. 2nd Steps साधारण तितके लांब होतेच! आम्ही सगळेचजण काहीतरी करत होतो, पण एक मित्र वर्गात होता, त्याचा फोन आला, की अरे कुठे आहात, आत्ता सर्प्राईज़ क्विझ आहे! बोंबला! होतो तिकडून बोटक्लबला पोहोचायला २० मिनिटं लागली असती. अगदी तसाच घामाघूम अवस्थेत वर्गात गेलो असतो, तरी जाईपर्यंत टेस्ट संपली असती! जाऊदे म्हणलं, करू काहीतरी. नंतर madamना भेटून वेगळी टेस्ट देऊन आलो होतो. अर्थात योग्य कारण होतंच! पण तो नदीच्या मधोमध वाजलेला फोन कधीच विसरणार नाही.

१७) एच.बी.के. चे म्हशी हाकणे: आम्ही ८-१० जण सुट्टीमध्ये बरेच ट्रेक्स करत होतो. राजगड, लोहगड, तोरणा, राजमाची, भीमाशंकर असे झाले होते. त्यानंतर नागफणीला जायचं ठरलं. जे नागफणीला गेलेत त्यांना माहिती असेल की वाटेत खंडाळ्यानंतर एक भले मोठे पठार लागते, जिकडून रस्ता पुढे नागफणीवर जातो. त्या पठारावर होतो. एच.बी.के एका तळ्यात डुंबायला गेला, आणि येताना चायला दोन म्हशींना हाकत आला! काय म्हणावं याला! म्हशी मागे लागल्या होत्या आमच्या. जबरदस्त फाटली होती! टेन्शनची गोष्ट म्हणजे एक म्हैस साधारण ८-१० फुट उंचीचा एक छोटासा कडा चढून मागे लागली होती. आई शप्पत! बेक्कार टरकली होती तेव्हा! कसाबसा तिचा पिच्छा सोडवला आणि वर गेलो! मध्ये तो २०-३० फुटी उंच रॉक नसता तर संपलो होतो आम्ही!(हा कॉलेज कॅम्पस मधला नसला, तरी वर्थ रिमेंमबरिंग होता म्हणून लिहिला आहे!)

१८) सुमेधने केलेले लेक्चरचे झोल: सुमेध आमचा सी.आर. होता. एक फार मस्त ट्रिक केली होती त्याने तेव्हा. व्यास मॅडम आम्हाला सिग्नल्स-सिस्टिम्स हा विषय शिकवायच्या. सुमेध त्यांचे प्रत्येक लेक्चर पोस्टपोन करायचा, आणि लेक्चर चा ओरिजिनल दिवस झाला की पोस्टपोन केलेले लेक्चर प्रीपोन करायचा! शेवटी या विषयाची फारच कमी लेक्चर्स झाली. प्रचंड ऑफ पिरियड्स मिळाले, आणि या सगळ्याचे श्रेय फक्त आणि फक्त ढबूलाच जाते या बद्दल काही शंकाच नाही!

आत्ता तरी दुसऱ्या वर्षातले इतकेच आठवत आहेत! २nd इयर आणि 3rd इयर आणि बी.टेक, फार किस्से कोण जाणे आठवतंच नाहीयेत!! असो, आता जेवढे आठवतायत तेवढे तरी लिहितो.

तिसऱ्या वर्षातले:

३र्ड इयर मध्ये मी पहिल्या सेमेस्टरला माईंड-स्पार्क मध्ये बरंच काम केलं होतं. त्या वर्षी बोटक्लबचा ग्रुप सगळा पासआउट झाला होता, त्यामुळे तिकडे कमी झालं होतं. किस्से झाले ते सगळे ऑडीच्या बाजूला, किंवा वर्गात!

१९) रात्री ३ वाजता गावभर भटकणे: रात्री जेवायला विसरलो होतो काम करताना, आणी २ ला भूक लागली, ८-१० जण उठून स्टेशनवर जेवायला गेलो, तिथे भयानक गर्दी.(तेवढी एकाच जागा रात्री २-३ ला उघडी असते पुण्यात!) काही कळेना काय करावे ते, शेवटी रात्री २.३० ला रोहिणीच्या घरी गेलो. तिथे भल्या रात्री कांदा बटाटा, टाकून खिचडी केली आणि maggi बनवली. रोहिणीला स्वतःच्या घरी कांदा कुठे असतो ते माहिती नव्हते! आवरा खरंच! असो. त्या दिवशी रात्री जेवायला जी काही मजा आली ना, अफाट! मी, Mad-B, आकाश, रोहिणी, दिव्या, राव, प्रांजली, गौतम असे किडे होतो! काही का असेना, प्रचंड मजा आली होती!

२०) डी.एस.पी ची ऑनलाईन लेक्चर्स- आठवड्यातून ३ दिवस आय.आय.टी.तून थेट प्रक्षेपित होणारी डी.एस.पी ची लेक्चर्स आम्हाला होती. झोल असा होता की ती सकाळी असायची. ८.३० ला. मुलं जाऊद्या, आमचे सर पण यायचे नाहीत! (मी लांब राहतो फार हे कारण होतं!) एक एम.टेक वाला असायचा. आशिष म्हणून जबर होता! त्यांनीच आमचे पेपर्स तपासले होते, आणि मार्कांची खिरापत वाटली होती! पण ओव्हरऑलच वर्गातलं झोपणं, परीक्षेच्या आधी आय.आय.टी मधल्या मित्रांकडून ती लेक्चर्स घेऊन येणं, कधीही न केलेले practical या सर्व गोष्टींसाठी हे कायम लक्षात राहील!

२१) मामा-मामा!: ५व्या सेमिस्टरमध्ये आम्ही वर्गात अंग्रेज नावाचा एक पिक्चर पहिला होता. भयानक आहे तो! हसून हसून वेड लागतं! हैद्राबादी स्टाईल मधला आहे. त्यात एक टाकला गुंड स्क्रीनवर आला की "मामा-मामा" असं म्हणायचे. आमचे मोहोनी सर वर्गात आले, की आम्ही पण त्याच टोन मध्ये "मामा-मामा" ओरडायची. वर्गाच्या शेवटच्या बाकावरून ओरडणं सुरु व्हायचं ते एक एक करत पुढे सरकायचं! सर चक्क हसायचे! लिहिताना किंवा बोलताना आम्ही असं काही ओरडायला लागलो की ते चक्क hang व्हायचे! काय करावं सुधरायचं नाही त्यांना! म्हणाला मोहोनी सर आमचे सगळ्यात आवडते सर होते. त्यामुळे फार जास्त त्रास नाही द्यायचो, पण ऑफ लेक्चर पाहिजे असलं की नक्की ओरडायचो! नंतर मामा-गेंमा- कॉमा वाट्टेल ते ओरडायचो!

२२) रोहिणीचे सपकाळ सरांशी झालेले वाद: इंजिनियरिंगच्या चारही वर्षात एकच चित्र constant राहिलं- रोहिणी परीक्षेचे तपासलेले पेपर्स दिले, की मार्क वाढवायला जायची ते. तिने एका सेममध्ये स्वतःचे मार्क जेवढे वाढवून घेतले असतील, त्यात ४ मुलं एखाद्या विषयात DD ग्रेडने पास झाली असती! असो, तर पॉवर इलेक्ट्रोनिक्स विषय शिकवायला सपकाळ सर होते. त्यांनी परीक्षेचे तपासलेले पेपर वर्गात वाटले होते, तेव्हा रोहिणी नेहेमीप्रमाणे भांडायला गेली होती. सरांनी तिला सांगितलं की तिचं उत्तर चुकलंय! तेव्हा ती म्हणाली होती, की मला या उत्तराला मार्क दिले नसले तर बाकी कोणाला पण दिले नाही पाहिजेत!(मला मिळाले होते, त्यामुळे मी भयंकर संतापलो होतो तीचावर!) अशक्क्य गोष्टींपैकी एक होती ती! कॉलेजमधली रोहिणी आठवते ती अशीच!

२३) वाणी सरांना मिस्ड कॉल्स देणे:  वाणी सर आम्हाला ई.एम हा विषय शिकवायचे. त्यांचा एक टिपिकल रिंगटोन होता- आणि वर्गात नेहमी फोन वाजायचा. फोन वाजला की १० मिनिटं ते फोन घेण्यात घालवायचे. एकदा पोरांना कुठून तरी त्यांचा नंबर मिळाला. संपलं! एका तासात किमान ८ वेळा त्यांना पोरं मिस्डकॉल्स द्यायची! म्हणा त्यांची लेक्चर्स अटेंड करायला मजा यायची. कायम काहीतरी हजरजबाबी जोक्स मारायचे ते. मुलं हसत हसत शिकायची! पण मिस्डकॉल्स द्यायची वेगळीच मजा! (एकदा वाणी सरांच्या लेक्चरला सगळी पोरं ठरवून हाफ-चड्डी घालून गेलो होतो, त्यात दुधाणेचे चड्डी जगावेगळी होती! फोटो टाकतो इथे. वाणी सरांचे त्या दिवशीचे टोमणे खास होते!)

२४) फ्रीजची किल्ली लपवणे: हा फार गाजलेला किस्सा होता. मी आणि कृष्णने मिळून एका lab मधल्या फ्रीजला कुलूप लाऊन किल्ली ढापली होती. त्याबद्दल आधी एक ब्लॉग लिहिला आहे. तो तुम्ही इथे वाचू शकता.

२५) माझ्या वाढदिवसाच्या दिवशी झालेले मराठे सरांचे लेक्चर: माझ्या मित्रांनी फळ्यावर माझ्यासाठी शुभेच्छा देणारा एक फ्लेक्स तयार केला होता! राजकारण्यांचे करतात तसला. अर्थात फेल्क नव्हता. खडूने फळ्यावर लिहिले होते. जबरदस्त होता तो प्रकार. कधीही न विसरू शक्नार्यांपैकी एक. नक्कीच. मराठे सर पण भारीतले. त्यांनी तो शुभेच्छा संदेश लेक्चरभर पुसला नाही! कमाल होते खरंच!२६) तात्याचा कुबड्यांचा किस्सा: हा नक्की २ऱ्या का ३ऱ्या वर्षात झाला होता ते आठवत नाहीये, पण हेमलचा पाय मोडला होता, म्हणून तो क्रचेस वापरात होता. एकदा जेवताना तात्याने त्या कुबड्या उचलल्या आणि बोटक्लब भर फेर्या मारत होता. जाताना एक पाय लंगडत होता, येताना दुसरा! अम्हीये खुळ्यासारखे हसत होतो. IT डिपार्टमेंटचे एक सर खरच वेडे झाले होते! ५ मिनिटं तात्याकडेच बघत बसले होते! कमाल होता हा किस्सा!

२७) डिजिटल lab मधला किस्सा: मी जर्नल लिहित बसलो होतो. सुमेध, अनंत विरू होते बरोबर. डिजिटल lab मध्ये स्टूल आहेत. अगदी छोटी सीट असणारे. त्यावर होतो. काहीही कळायच्या आत या तिघा नागांनी माझे हातपाय पकडले होते, आणि त्या बारक्या स्टुलावर अडवा केला होता. मी अक्षरशः तडफडत होतो, कारण काहीही सुधरत नव्हतं! हे सगळं सुरु असताना रचना गोगटे नावाची एक मुलगी lab मध्ये आली, आणि तिला नेमका काय प्रकार सुरु आहे तेच कळेना! आम्ही नंतर सगळे जाम वेड्या सारखे हसत बसलो होतो, पण ज्या क्षणी मला धरलं होतं ना, खरं सांगतो तुम्हाला heart attack येणं बाकी होतं!

२८) ओंकार शाळीग्राम झीएसमध्ये प्लेस झाला वाला किस्सा: याहून मोठा किस्सा आम्ही ४ वर्षात कधीही केला नाहीये. शाळीग्राम आमचा एक वर्ष सिनियर होता. एकदा कॅम्पस इंटरव्यू साठी झी.एस(ZS) ही कंपनी कॉलेजमध्ये आली होती. शाळीग्राम याला बसला पण नव्हता. फक्त बोटक्लब वर आम्हाला भेटला होता त्या दिवशी. मी आणि सुमेधनी गाव भर अफवा पसरवली होती की शाळीग्राम झी.एस मध्ये प्लेस झालाय, आणि त्याला ८.५लाखाचे पॅकेज मिळाले आहे. त्या नंतर पुढचे ६ महिने शाळीग्रामला जो काय त्रास झालाय- सगळ्यांना उत्तर देणं की नाही मिळालाय तिथे जॉब, ईटन जॉईन करताना झीएस का नाही घेतेस विचारणारे इत्यादी इत्यादी! त्यांनी धरून बडवला आम्हाला तर तो वेडेपणा वाटणार नाही. आमच्या किड्यांमुळे बरेच लोकांना त्रास झालाय, पण ओंकार एकटा आहे ज्याला आम्ही सॉरी म्हणू शकतो! म्हणा तो आमचा चांगला मित्र आहे, म्हणून त्याची गरज नाही! (या किस्स्यावर एक वेगळा ब्लॉग! नक्की! शाळीग्राम... होऊन जाऊदे का रे!!)


बी.टेक मधले किस्से.

बी.टेक मध्ये फार जास्त किस्से झाले नाहीत, याचं कारण म्हणजे कॉलेजला फारच कमी गेलो. प्रोजेक्ट सुरु होतं त्यामुळे जवळपास सगळा वेळ ते करण्यातच घालवला. आणि किस्से करण्यापेक्षा फालतूपणा करण्यात जास्त वेळ गेलाय. जोड्या लावा, प्लेसमेंट, यात वेळ जात होता बराच!

२९) प्लेसमेंटच्या सरांविरुद्ध पुकारलेले बंड: नाव लिहित नाही, पण हे सर फक्त मेकच्याच कंपन्या आणताहेत असा आमचा ठाम विश्वास होता, आणि त्यांच्या विरोधात जबर नारेबाजी झाली होती. काहीकाही कंपन्यांना बहिष्कार टाकला. कोणी बसलेच नाहीत! इंडियन नेव्ही जेव्हा प्लेसमेंटसाठी आली, तेव्हा तर त्यांच्या समोर यांच्या विरोधात हंगामा सुरु होता. खरंच "काय रे देवा हा प्रकार!" असेच म्हणायला हरकत नाही. प्लेसमेंटची पहिली फेस जेव्हा झाली होती, तेव्हा वर्गातले ८० पैकी १७ जण प्लेस झाले होते. त्यानंतर लवकरच मला आणि अजून काही जणांना नोकरी लागली होती.(आकडा २१ होता- फेब्रुवारीत) ज्या दिवशी टी.सी.एस आले, त्या दिवशी मात्र, जवळपास सगळ्यांना नोकरी मिळाली, आणि तो बंड मागे घेण्यात आला!

३०) टी-शर्ट चा किस्सा: हा म्हणजे निव्वळ माज होता. मी आणि काही मित्र-मैत्रिणींनी एका टी-शर्ट वर फोटो प्रिंट केले होते, आणि कॉलेजला घालून गेलो होतो. जबरदस्त माज असणारे जे ५ जण होतो, त्यांनी हा पब्लिसिटी स्टंट केला होता. सॉलिड शिव्या खाल्ल्या लोकांच्या. पण मुळात माजुरडे, काय फरक पडणार!!

च्यायला, मला शेवटच्या वर्षातले काहीही किस्से आठवत नाहीयेत! आत्ता एवढंच लिहून थांबवतो. तुम्ही हे वाचा. मला सुचले, की मी सांगीन तुम्हाला!! तोपर्यंत केलेत ते कांड पुरेसे आहेत, तुमचे पोट भरण्यासाठी!
उल्लेख केलेल्या व्यक्तींनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये ही विनंती!

4 comments:

 1. Dont forget i introduced you to The Angrez! :-D changla ahe post..

  ReplyDelete
  Replies
  1. tuza vachun pan zala?! :-o kamaal speed hai! :P

   Delete
 2. Tuji idea choraycha v4 aahe.. :P
  Lihin bahutek mi pan asech kisse.. Athvat nahit pn sagale athvatil.

  Punt madhe ubharle barech jan, pan Dibaar honyachi vel nahi aali kunavar. :D

  ReplyDelete
  Replies
  1. lihi re lihi!!!

   are amhi wharf samor punt madhe nachat vagere hoto re... ani ing gen punt ek mekanwar apatanasuru hota..

   Delete