Pages

Tuesday, 9 April 2013

२७ वर्षांचा रणसंग्राम. भाग ३.

मध्यंतरी या विषयापासून जरा भरकटलो होतो, पण थोडा अभ्यास केल्याशिवाय लिहिणे बरोबर वाटले नाही.

ही २७ वर्षांची शृंखला आजच पुन्हा सुरु करायला पण एक खास कारण आहे. उद्या फाल्गुन अमावस्या आहे. ३२४ वर्षांपूर्वी या तिथीला आपल्या छत्रपतीची दिल्लीपती औरंग्जेबानी छळून छळून हत्या केली होती. आधी म्हणल्याप्रमाणेच शंभू राजांच्या मृत्यूचा प्रभाव अवघ्या हिंदुस्थानावर झाला. केवळ त्यांनी इस्लामच नाकारला नाही, तर औरंगजेबाचा मांडलिक राजा व्हायचे पण नाकारले. त्यांचा मृत्यू झाला हे महाराष्ट्रासाठी खरोखर दुर्दैवाच, पण आपल्या प्राणाची आहुती देताना शंभूराजांनी एक नक्की केले- औरंगझेबाला दक्षिणेत थांबणे भाग पाडले. पुढे १८ वर्ष तो व्यर्थपणे मराठ्यांशी झुंजत राहिला, ज्या मुळे तो पूर्णतः बुडाला व अवघा हिंदुस्थान मराठी साम्राज्यात आणावयास मोकळा झाला. तो कालखंड जरी वेगळा असला, तरी तो आला, याचे श्रेय फक्त आणि फक्त संभाजी राजांना त्यांच्या बेडर मृत्युमुळेच!

युद्धात भावनांना जसे स्थान नाही, तसेच आपल्या शत्रूची ताकद आपल्यापेक्षा कमी असली की तो संपला, या फाजील आत्मविश्वासाला  देखील कोणतेही स्थान नाही. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानाने हीच चूक केली होती. पुढे गर्विष्ठ मोगली सरदारांनी अनेकदा याची प्रात्यक्षिके दाखवली. प्रतापगडला काय झाले हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण संभाजी राजांच्या मृत्यू नंतर खुद्द औरंगजेबाने हीच चूक केली. मराठा छत्रपतीची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, ती पाहून मराठ्यांचा धीर खचेल असे औरंगजेबास वाटले. परंतु, संभाजी राजांच्या मृत्यूमुळे गडबडून न जाता मराठे अजूनच अधिक त्वेषाने त्या म्लेंच्छासुरावर तुटून पडले. हेच त्या २७ वर्षाच्या युद्धाचे पुढचे धगधगते सुवर्णकळस!

राजांच्या मृत्युनंतर रायगडावर येसूबाई यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठी सेनानींची एक बैठक झाली ज्यामध्ये संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे,हणमंते,  प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ चिटणीस, रामचंद्रपंत अमात्य ही पुढे गाजलेली मात्तबर नावे एकत्र आली. एकच निर्णय घेण्यात आला. मुघलांविरुद्धचे युद्ध कायम ठेवायचे! पुढच्या छात्रापातीचा जेव्हा प्रश्न उत्पन्न झाला तेव्हा शिवाजी राजांचे धाकटे चिरंजीव राजारामराजे, यांनी राज्यासाठी स्वतः सिंहासनावर बसण्यास नकार दिला, व शाम्भूराजांचा पुत्र, शिवाजी(शाहू) यांस छत्रपती बनवून आपण स्वतः त्या राज्याचे एक सेनानी झाले!

औरंगजेबाने असद खान या आपल्या सरदाराला दारूगोळ्यासकट रायगड वर हल्ला करायला धाडले. याचा सामना करायला संताजी व रामचंद्रपंत यांनी एक विलाक्ष्ण युक्ती काढली. धनाजी आपल्या फौजेनिशी फलटणला तळ ठोकून मुघलांना  गनिमी काव्याची झुंज देत स्वतःकडे ओढणार. त्यादरम्यान संताजी, विठोजी चव्हाण व इतर २००० स्वार खुद्द त्या आलमगीराच्या छावणीवरच छापा मारणार शक्य झाल्यास त्या यावनाधमाला कैद करणार! काय ते धाडस! ठरल्याप्रमाणे संताजीची तुकडी तुळापुरला असलेल्या मोगली छावणीवर तुटून पडली. औरंगझेबाच्या स्वतःच्या तंबूचे सोन्याचे कळस मराठ्यांनी उपटले व लुटले. त्याची बरीच खाजगी सेना व अंगरक्षक कापले गेले. त्या बादशाहच्या सुदैवाने तो त्याच्या नेहमीच्या तंबूत नव्हता, नाहीतर संताजीच्या हाती मारला गेला असता! आपल्या राजाचा सूड घ्यायला हे खरंच फार चांगले झाले असते, पण आपल्याहती विधात्याने या दैत्याचा आणखी छळ लिहिला होता म्हणूनच तो वाचला! दरम्यान धनाजीने असद खानाला स्वतःकडे ओढले व त्याचा पूर्ण पराभव करून दारुगोळा व इतर सामग्री जप्त केली!

मराठ्यांसाठी हा छापा फार निर्णायक होता. आपण खुद्द बादशाहला पण पळवून लाऊ शकतो हे सिद्ध करणारा होता. परंतु या सकारात्मक प्रसंगाबरोबरच एक फार वाईट घटना घडली. सूर्याजी पिसाळ- या रायगडावरच्या किल्लेदारणी फितुरी करून किल्ला मुघलांच्या हवाली केला! महाराणी येसूबाई व शाहू राजे मोगलांच्या कैदेत पडले! काय ही फितुरी! महाराष्ट्राला खरोखर काही मागे खेचत असेल, तर ति अशाप्रकारची फितुरी! आज देखील ३५० वर्षानंतर आपले नेते हेच करतात!(असो! न बोललेलेच बरे!)

रायगड जेव्हा पडला त्या वेळी राजाराम महाराज पन्हाळ्यावर होते. लवकरच रायगड जिंकणाऱ्या मोगली सरदारचे झुलफिकर खानचे पन्हाळगडाला मोर्चे लागले.तिथून निसटून राजे विशालगडास गेले. पन्हाळगड मात्र मोगलांना सर करता येत नाही हे पाहून खुद्द औरंगझेब तिथे दाखल झाला. कडवी झुंज दिल्यावर पन्हाळा शरण आला. मराठी सरदारांना मुघलांचा पुढचा मोर्चा विशालगडाला लागणार हे स्पष्ट झाल्यावर राजाराम महाराजांना त्यांनी जिंजी गाठण्यास सल्ला दिला. जिंजी हा तामिळनाडू मधला बलाढ्य किल्ला पुढची ७ वर्ष महाराष्ट्राची राजधानी होता! राजाराम महाराज विशालगडाहून वेषांतर करून बिदनूर, बंगळूर, या मार्गे जिंजीस पोहोचले. जाताना रामचंद्रपंत यांना हुकुमत पान्हा ही पदवी देऊन दख्खनचा कारभार सांभाळायला सांगितला. खंडो बल्लाळ व हरिजी महाडिक यांच्या सहाय्याने राजांनी सेना, सेनानी व राजकारणी गोळा केले व मोगलांविरुद्ध एक नवी आघाडी उघडली, जी मागे वळून पाहता मोगलांना चांगलीच महागाची ठरली.

राजाराम महाराज पळून गेल्याने औरंगजेब भयानक वैतागला, कारण तो एका गोत्यात सापडला. स्वतः उठून जिंजीवर चाल करायची म्हणजे दख्खन मराठ्यांना धुमाकूळ घालायला मोकळी, आणि गेलो नाही, तर दक्षिणेतून दुसरी मराठी आघाडी उभी राहत्ये! यातून सुटण्यासाठी औरंगजेबाने बरीच फौज आपल्याबरोबर दख्खनेत ठेऊन एक छोटी फौज  जिंजीला रवाना केली. परंतु संताजी घोरपडे व धनाजी जाधव या सेनेस पुरून उरले. आधी त्यांनी जिंजीस जाणाऱ्या मोगली फौजेचा पराभव केला व नंतर रामचंद्रपंत, व इतर सरदारांना दख्खनेत येऊन मिळाले. 

रामचंद्रपंत, प्रल्हाद निराजी, संताजी आणि धनाजी यांनी पुढच्या मोहिमा आखल्या. औरंगजेबानी दख्खनचे चार महत्त्वाचे दुर्ग जिंकले होते- रायगड, पन्हाळा, विशालगड व राजगड यांचा त्यात समावेश होता. तसेच तो झुल्फिकर खान याला जिंजीला वेढा घालायला पाठवत होता. मराठी योजने प्रमाणे संताजी व धनाजी पूर्वेकडे मोगलांना विस्कळीत करणार. बाकी सरदारांनी दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात जितके किल्ले शक्क्य असतील तितके जिंकायचे. याने मोगली राज्याचे २ भाग होणार होते, व त्यांचे काम अधिकच अवघड होणार होते. शिवाजी राजांच्या दूरदृष्टीमुळे कल्याण ते कारवर ही संपूर्ण किनारपट्टी मराठी नाविकांकडे होती. त्यामुळे जमिनीवरचे रसदपुरवठ्याचे मार्ग एकदा जिंकले की दक्षिणेत मोगलांची कोंडी होणार होती.

ठरल्याप्रमाणे १६९२च्या सुरुवातीला हे अंमलात आणण्यात आले. शंकराजी नारायण व परशुराम त्र्यंबक यांनी राजगड व पन्हाळा जिंकला. १६९३ मध्ये शंकर नारायण व विठोजी भोसले यांनी रोहिडा जिंकला. सिधोजी गुजर यांनी विजयदुर्ग काबीज केला. परशुराम त्र्यंबक यांनी विशालगड जिंकला व कान्होजी आंग्रे यांनी कोलाबाचा किल्ला काबीज केला. हे सगळं सुरु असताना संताजी आणि धनाजी मोगली मुलुखात धुमाकूळ घालीत होते. उत्तरेकडे खानदेश, नगर या मोगली प्रदेशापासून दक्षिणेकडे विजापूर व कोकण सगळीकडे या दोन सरदारांचे छापे पडत होते व त्यांची चांगलीच दहशत पसरली होती. दरम्यान जिंजीच्या किल्ल्याला झुल्फिकर खानाचा वेढा पडला होता. संताजी आणि धनाजी आपल्या विजयांमुळे प्रेरित होऊन मोगलांवर जिंजी येथे छापा टाकला! धनाजी यांनी इस्मैल खान याला कोकर जवळ पराभूत केले. संताजीने आली मर्दान खान या मोगली सरदाराला जिंजीच्या पायथ्याशी कैद केला! आपल्या बाजू मोकळ्या करून दोघे सरदार एकत्र आले व जिंजीच्या मोगली वेढ्याभोवती दुसरा वेढा पडला!

 औरंगजेबाच्या आज्ञेनुसार झुल्फिकर खानाने जिंजीचा वेढा उठवला व पुन्हा अहमदनगरकडे निघाला. संताजी ने त्याचा पाठलाग केला, परंतु त्याला यश आले नाही. त्यानंतर संताजीने आपल्या फौजा विजापूरकडे वळविल्या. त्याला शह देण्यासाठी औरंगजेबाने कासीम खान या सरदाराला रवाना केले. परंतु जबरदस्त युद्धनीती वापरात व गनिमी काव्याचा वापर करून संताजीने त्याला चितळदुर्ग येथे कोंडीत टाकून दुन्डेरी किल्ल्यात माघार घ्यायला लावली. गडाला संताजीचा वेढा पडला, तो इतका जबरदस्त होता, की मोगलांना वर काही खाणेही मिळेना. खाण्यासारखे सर्व काही संपल्यावर मोगल शरण आले,पण पराभूत झालेल्या कासीम खानाने विषप्राशन करून आत्महत्या केली. कासीमखानच्या मदतीला औरंगजेबाने हिम्मत खान नावाच्या सरदाराला पाठवले होते. महाराष्ट्राच्या डोंगरांची सवय व ज्ञान दोनही नसलेल्या त्या खानाने आपल्याजवळ भरपूर दारुगोळा ठेवला होता. संताजीने त्यावर खोटे छापे घालून त्याला दुन्डेरीच्या जंगलात आणले व असा काही हल्ला केला, की मोगली फौजांचा पूर्ण पराभव झाला! हिम्मत खान याच्या डोक्यात गोळी लागून तो स्वतः या युद्धात मरण पावला. प्रचंड युद्धसामग्री व संपत्ती या युद्धात मराठ्यांना मिळाली.

आता मात्र औरंगजेबाला कळून चुकले की आपण एका ण जिंकू शकणाऱ्या युद्धात अडकलो आहोत. त्याने झुल्फिकर खानास जिंजी लवकरात लवकर काबीज करायला सांगितली. त्याप्रमाणे वेढा घट्ट करण्यात आला. परंतु हारजी महाडिकांच्या मुलाकडे जिंजी देऊन राजाराम महाराज शिर्के बंधू व धनाजी यांच्या मदतीने तिथून निसटले. अखेर १६९८ साली मोगलांनी जिंजी जिकून घेतली. ७ वर्ष हा किल्ला मोगलांविरुद्ध जिंकला. किल्ला जिंकल्याने जितका फायदा झाला तू किल्ला घेण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीपेक्षा फारच कमी होती. एका जिंजीमुळे मोगली खजान्याला कायमचे भोक पडले, ज्यातून त्यांची संपत्ती वाहतच होती. फक्त जिंजीचीच नव्ह, तर सर्वत्र हीच अवस्था झाली होती, व शाही खजिन्यावर फारच भार पडू लागला होता.

परंतु या सर्व घटना घडत असतानाच मराठी सैन्यात स्वकृत समस्येला सामोरे जावे लागले. संताजी व धनाजी यांच्यात कायम चढाओढ होती. ती प्रल्हाद निराजी यांच्यामुळे कधी उसळायची नाही. पण, प्रल्हाद निराजींच्या मृत्यु नंतर मात्र दोघांमध्ये उघड वैर निर्माण झाले. धनाजी संताजीवर चाल करून गेला, व धनाजीचा एक सरदार, नागोजी माने, ज्याचे संताजीशी वैर होते, त्याने संताजीचा शिरच्छेद केला! संताजी चे मारलेले मुंडके औरंगजेबाकडे धाडण्यात आले, ज्यामुळे मोगली सैन्याला नवा जोश मिळाला. साताजीची दहशत आता संपली होती. हे झाले, तरी आता मराठी मुलखात मोगली फौजेला कोणीही भीत नव्हते. ती फौज तितकी कमकुवत देखील झाली होती. अनेक सरदार, शिपाई व सैनिक युद्धाला कंटाळून मोगली सेना सोडून देत होते. परंतु आपल्या सल्लागारांचे मत ण ऐकता औरंगजेबाने युद्ध कायमच ठेवले.

राजाच्या आगमनाने मराठे पुन्हा एकदा नव्या जोमाने एकत्र येऊन मोगलांवर प्रतिहल्ला करू लागले. धनाजीला सरसेनापती करून १/३ सेना त्यांच्या हाताखाली, तसेच बाकी सेना शंकराजी नारायण व परशुराम त्र्यंबक यांच्या हाताखाली देण्यात आली. धनाजीने पंढरपूर जवळ मोगलांना धूळ खायला लावली. शंकराजीनी पुण्याजवळ सर्जे खान याचा पराभव केला. खंडेराव दाभाडे यांनी बागलाण व नाशिक जिंकले, नेमाजी शिंदे यांनी नंदुरबार येथे एक मोठा विजय मिळवला.

या सर्व घटनांना चिडून औरंगजेब स्वतः चाल करून आला. पन्हाळ्याला त्यांनी वेढा घातला व साताऱ्याच्या किल्ल्यावर हल्ला केला. परंतु किल्लेदार प्रयागजी प्रभू यांनी कुशल नेतृत्व करीत २ महिन्यांचा पुरवठा असताना ६ महिने झुंज दिली. एक गोष्ट बरेचदा ऐकायला मिळते. सातार्याची मोहीम सुरु असताना औरंगजेबाने एक भुयार खणून बुरुजाखाली २ सुरुंग पेरले व बुरुज उडवला. पहिल्या सुरुंगामुळे बुरुज व त्यावरचे मराठे उडाले. किल्ल्याच्या भिंतीत खिंडार पडले. परंतु दुसरा सुरुंग उडाला त्याची दिशा चुकली, व खिंडारावर चाल करत येणाऱ्या मोगली सैन्यावरच त्या सुरुंगाने उडलेल्या धोंड्यांचा वर्षाव सुरु झाला. एक दगड तर चक्क औरंगजेबाच्या शेजारी येऊन पडला. अगदी काही इंचांच्या अंतराने बादशहा वाचला!

दरम्यान राजाराम महाराज स्वतः जालना शहरावर चाल करून गेले व अगणित संपत्ती तिथे गोळा केली. वाटेवर मोगली सैन्याने त्यांना गाठले प्पापरंतु आपले नेतृत्व सिद्ध करत राजे सिंहगडावर सुखरूप पोहोचले. परंतु या सर्व धाकाधाकीमुळे फुफुसाचा आजार होऊन मार्च १७०० साली सिंहगडावर राजाराम महाराजांचे निधन झाले. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर त्यांची पत्नी, महाराणी ताराबाई यांनी मराठी सेनेचे नेतृत्त्व पत्करले. आपल्या सेनेबरोबर राहणारी ती महाराणी खरंच धन्य! 

धान्यसाठा संपत आलेल्या साताऱ्याच्या किल्लयात पावसाळ्याच्या आधी प्रयागजी प्रभू यांनीबोलणी करून मोगलांना   कल्ला  दिला. परंतु अनेक महिने झुंज देऊन ऐन पावसाळ्याच्या अगोदर मोगलांना किल्ला देऊन त्यांचे झालेले छळ पाहून सर्वच किल्लेदार हे अनुकरू लागले. गड पावसाळ्याच्या अगोदर पर्यंत लढवायचा, खाली नद्यांना पूर यायला लागले की मोगलांशी बोलणी करून पैसे घेऊन त्यांना रिकामा किल्ला देऊन टाकायचा. नंतर मोगल त्यावर धान्य, दारुगोळा चढवत, किल्ल्याची डागडुजी करीन, आणि एकदा काय असा किल्ला सगळा सजला, नटला, की कोणत्यातरी कड्यावरून काळ्या कभिन्न रात्री मराठे मर्कटाप्रमाणे छापा घालून किल्ला जिंकून घेत. महाराष्ट्रात मोगली खजिना अशाप्रकारे लुटायचा एक धंदाच सुरु झाला!

मराठी डावपेचांचा हा सुवर्ण कालखंड होता. प्रत्येक जन झटत होता तो राज्य वाचवण्यासाठी. राजधानी पडली, राजा दूर कोंडीत अडकला होता. अशा परिस्थितीत न डगमगता संताजी, धनाजी, रामचंद्रपंत, प्रल्हाद निराजी, शंकरजी यांसारख्या इतर हजारो साध्या सामान्य माणसांनी स्वराज्यासाठी लढा दिला. एक संघटीत नेतृत्व नसले, तरी एका विचारासाठी संघटीत झालेली माणसे काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. आज आपल्याला खरंच या सर्व वीरांना स्मरून   

1 comment:

  1. हे तुझं लेखन म्हणजे एक समाजकार्यच आहे. चालू ठेव. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू दे हे..कणा झुकत चाललेल्या भारतीय समाजाला गरज आहे या औषधाची..आणि कणा झुकवणे म्हणजेच वैश्विकरण अश्या निर्बुद्ध विचारांच्या लोकांना यातून प्रेरणा मिळो हीच सदिच्छा ~ आकाश चौकसे

    ReplyDelete