Wednesday, February 19, 2014

सप्तर्षी मांजर

काल रात्री आमचे मित्र श्री गंगासागर पाटील यांनी स(शा)काळ(ल) नामक वृत्तपत्रातील एक लेख आवर्जून वाचणे असा निरोप व त्या लेखाची लिंक पाठवली. पाटलांनी पाठवलंय, म्हणजे काहीतरी चांगलं असावं हा आमचा अंदाज योग्य ठरला. पुणे Today या पुरवणीत छापल्या जाणाऱ्या मुक्तपीठमधील मागच्या आठवड्यात प्रसिद्ध झालेला “करमणूक मांजराची” हा तो जगत्मान्य लेख होय. तो वाचला आणि थक्कच झालो. माझ्या शरीरातील मेंदू, हृदय, फुफुसं, मूत्रपिंड, यकृत, मज्जातंतू, आणि इतर जे काही अवयव असतात, त्यांना मुंग्या आल्या. माफ करा, मांजरी आल्या. पुढे इतक्या उच्च दर्जाचा लेख एका वृत्तपत्रात काय करतो आहे असा प्रश्न “मनी येणं” साहजिकच होतं. हा शालेय अभ्यासक्रमात तातडीने शिकवायला हवा. त्याशिवाय मुलं मराठी शिकणार कशी? त्याची शिफारस करावी तरी किती! एवढ्यावरच या लेखाचे कौतुक थांबवून कसं काय पुरेल! या लेखासाठी लेखिका सप्तर्षी म्याडम यांना साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार आणि इतर तत्सम सर्व पुरस्कार दिले पाहिजेत. एवढंच काय, पद्मश्री देखील दिलं पाहिजे! 

आमचा आणि मुक्तपीठचा संबंध तसा जुना आहे. आगदी आवडीने किंवा चवीने आम्ही त्याचे सेवन करीत नसलो, तरी त्यात आज नेमकं काय वाढून ठेवलं आहे याचा वास घेण्यास आम्ही उत्साही असतो, कारण या भोजनानंतर येणाऱ्या ढेकरा(प्रतिक्रिया) जबर असतात.. कधीकधी अध्यात्मिक बैठकीची पुरणपोळी मिळते (जी पटकन खायची). पण जवळपास रोज तीच शिळी पिठलं-भाकरी. कधीतरी लुनाधर भ्रममे सारखे विद्वान दुर्बुद्धीने पछाडून या पिठल्यात ज्यादा चव येण्यासाठी मसाला समजून जमालगोटा घालतात. त्यामुळे पुढचे ३-४ दिवस हास्याचे जुलाब अबाधित सुरु राहतात. काहीही असो, जेवणात सगळ्यात सुखाची गोष्ट जशी ढेकर आहे, तशीच मुक्तपिठात सगळ्यात सुखाची गोष्ट म्हणजे वाचकांच्या प्रतिक्रिया. त्या वाचण्यासाठीच अनेक दळभद्री लेख पचवण्याची क्षमता आता आम्ही हस्तगत केली आहे.

सकाळ हे वृत्तपत्र एक खेडेगाव असले, तर त्यांच्या पुरवणीतील मुक्तपीठ ही गावाची पिठाची गिरणी आहे. मुक्तछंदी लेखकांच्या शब्दांना या चक्कित टाकले की क्वचित कधीतरी डायरेक्ट भाजणी मिळते, (अर्थात त्यासाठी आत टाकण्यात येणारे धान्य चांगले पाहिजे), आणि बहुतांश वेळा हाती पडतो तो उरलेला कोंडा. बहुदा गिरणीमालक पीठ स्वतः गट्टम करून वाचकांना मुक्त”भुसा” चरायला भाग पाडतात. 

हीच ती किटी सप्तर्षी

करमणूक मांजराची” हा याच भुसा ढंगाचा एक लेख. इतका अप्रतीम लेख आणि तितक्याच प्रतिभेची लेखिका मराठी साहित्याला मिळणे हे आपले परमभाग्याच! लेखिकेचा शनिवार वाड्यावर, भारत इतिहास संशोधक मंडळात अथवा लकडी पुलावर जाहीर सत्कार करावा आणि तो झाल्यानंतर मराठी साहित्यासाठी एक शोकसभा आयोजित करावी असे आम्ही पुणे महानगरपालिका व सकाळचे संपादक यांना आवाहन करतो. आजकाल मराठी साहित्यिकांचा इतका तुटवडा आहे की सप्तर्षी म्याडम, लुनाधर ब्रम्हे(त्यांना मी भ्रममे म्हणतो) येरवड्याचे पावसकर, इ कांतीशहा लौकिकाच्या नव कथाकारांचा “सत्कार” करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असला पाहिजे. एखादा सत्कार सोडा हो, असल्या सत्कारांचा सुळसुळाट झाला पाहिजे!

या मांजरीच्या करमणुकीत सप्तर्षी म्याडम केवढे विविध विषय हाताळतात! बाणभट्टाने देखील आपल्या कादंबरीत एवढे विषय हाताळले नसतील जेवढे सप्तर्षी बाईंनी या लघु-कादंबरीत हाताळले आहेत! म्हणजे बघा हं- त्यांच्याकडे एक कार, एक स्कूटर आणि नगरला एक मोठं घर आहे हे सांगायचय, त्यांच्याकडे कॅमेरावाले स्मार्टफोन आहेत ज्यांनी ते मंजरींचे फोटो काढतात, किंवा वरद कसा पैजा लाऊन जिंकतो, किंवा डॉक्टरकडे पत्रा हलवायला जायचय, किंवा वरद स्कूटर घेऊन अभ्यासाला जातो.(कोणा एका खवचट वाचकाने बाईंना कमला नेहरू उद्यानात वरदचा “अभ्यास” बघायचं आमंत्रण पण दिलं आहे!) असे कितीतरी विषय आहेत. मला तर अजूनही हे समजत नाहीये की इतका सर्वसंपन्न सर्वविषयव्यापक लेख एका वृत्तपत्रात काय करतो आहे. किमान दिवाळी अंकात तरी छापला पाहिजे. एका वाचकाच्या मते या लेखाला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे! (व्याकरण बिकरणाचे नियम मोडत नव वाङ्ग्मय प्रकार शोधून काढला म्हणून.) 

बाकी काहीही असो, लेखातल्या काही गोष्टी मात्र कळत नाहीत- कुलकर्णी आजोबांना उन्हात का बसवलत? ते काय कावळा आहेत का? चिऊचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं तसच माऊचं घर वाहनांचं का? सुझुकीच्या शोरूममध्ये सेल्समन सोडून मेकॅनिक कसा आला? या गूढ प्रश्नांची उत्तरं मात्र कुठेच सापडत नाहीत, किंवा काकू सांगत पण नाहीत. (बहुदा सेल्समन सोडून मेकॅनिक ठेवले म्हणूनच मारुती ८०० खपत नसावी. प्रोडक्शन बंद केलंय म्हणे या गाडीचं! बिचारी गाडी.)

एकूण काय तर मुक्तपीठाच्या “ब्रम्हें”डात मुक्तछंदात सप्तर्षी म्याडम यांनी मुक्ताफळांची केलेली शाब्दिक उधळण आणि मांजरी, स्कूटर, कार, सुझुकी, वरद, आभ्यास, नगर चे मोठे घर, पत्रे, आणि एकूणच व्याकरण आणि (“अ/बे”)शुद्धलेखन बघून आम्ही पोट धरून खो खो हसलो. आर्धा लेख वाचून झाल्यावर कोणीतरी म्हणाल्याप्रमाणे प्रतिक्रियांचा महापूर येणार याची खात्रीच पटली. दुसऱ्या प्रतिक्रियेत प्रकट केलेली भावना “सप्तर्षी काकू आकाशामध्ये असणाऱ्या सप्तर्षी ना साक्षी ठेवून आपला शनिवार वाड्या वर जाहीर सत्कार करावा हि शिफारस आम्ही करतो” या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत!

एका प्रतिक्रियेत म्हणल्याप्रमाणे लेखिका साहित्याचा एव्हरेस्टचा तुकडा पोष्टाने अकादमीवाल्यांना पाठवताना चुकून सकाळच्या मुक्तपीठ वाल्यांना पाठवला. आता बाईंना ज्ञानपीठ आणि मुक्तपीठ यात काहीतरी साम्य आहे असे वाटले असल्यास आपण तरी काय करणार! वास्तविक ज्ञानपीठ असो वा मुक्तपीठ, या लेखामुळे साहित्याची कणिक झाली आहे यात काही वाद नाही!

आज मराठीला अशा थोर लेखांची खरंच गरज आहे. काय आहे, आत्तापर्यंत महाराष्ट्रात साखरेचे उत्पन्न खूप झाले आहे. पण उसातून साखर काढल्यानंतर आणि उरलेल्या मळीची दारू केल्यानंतर जो चोथा उरतो तो कुठे दिसत नाही, त्यामुळे “वरती” बसलेल्या पंजेवाल्यांच्या हाताची झाकली मुठ होते, आणि मराठी साहित्याच्या नावानी बोंबाबोंब (नाही शिमगा) सुरु होते! त्या चोथ्याचा दृष्टांत असा देत सगळा हिशेब ब्यालन्स करावा ही कल्पना मात्र उत्तम आहे. असो. 

आम्हा वाचकांची मात्र ७ जन्माची चैन आहे. मांजरीला ९ जन्म असतात असे मानतात. या भाकडकथेत तथ्य असल्यास आमची आमच्या ७ जन्मांपूर्ती का होईना, या सप्तर्षी मांजारीमुळे करमणुकीची सोय झाली आहे. पुढचे २ जन्म ही मांजर सप्तर्षी तारकासमुहात विलीन होवो, नाहीतर गाडीच्या इंजिनमध्ये जाऊन मारो, आम्हाला काय घेणंदेणं त्याचाशी!  (या ठिकाणी पु.लंचे मी आणि माझा शत्रुपक्ष आठवला- आणि जालिम शत्रूंमध्ये मुक्तपिठात लिहिणारे हे विनोदी बाळबोध लेखक आपसूकच टाकण्यात आले. त्या नंतर लगेचच तो ऑटोमेटिक ग्राईंडर पण आठवला. २ मिनिटात कसलेही पीठ!!) पण आपल्या मनीच्या गोष्टी आपल्याकडेच...
अखेरीस या मनीचे त्या मनीला जे न कळायचे ते कळले नाहीच! मांजराची करमणूक करता करता मात्र वाचकांची पिळवणूक केली. 
सप्तर्षी मांजर 
निखळ मनोरंजन करणारा लेख पाठवल्याबद्दल आम्ही गंगासागर पाटलांचे आभारी आहोत!

No comments:

Post a Comment