सोशल मिडियावर गेले काही दिवसात सुंदर नेत्रसुखद
मुलींच्या फोटोंचा(दिवाळी निमित्त) फार जास्त सुळसुळाट झाला होता. बाकी काही असो,
हे फोटो काढणारे फोटोग्राफर्स खरोखर
महान कलावंत आहेत. भारतात जसजसे हे कॅमेराधारी वाढत आहेत, त्याच प्रमाणात प्रत्येक कॅमेराधाऱ्याकरवी किमान ७-८
मुलींचे फोटो-सेशन होतातच. हजारोंच्या संख्येने फोटोग्राफर्स आणि दहाहजारांच्या
संख्येने त्यांचे मॉडेल्स झाले असले, तरी या दशसहस्र मॉडेल्सच्या मात्र, दुर्दैवाने काही ठराविक १५-२० पोज सोशल
मिडीयावर बघायला मिळतात(या मॉडेल्सच्या प्रोफाईली म्हणजे सोशल मिडिया-सोसल पब्लिक
अशाच शब्दात मांडाव्या लागतात... असो...). साथप्रसिद्धी (virality) मिळायला या जगावेगळ्या आणि विचित्र
हवभावांमध्ये नक्की काय ठेवलं आहे, ते मला मात्र आजतागायत कळलं नाहीये. या हावभावांना नक्की म्हणायचं तरी
काय असा प्रश्न कायम पडतो.
गेल्या काही दिवसात तर instagram नावाच्या सुंदर चेहऱ्यांचे विहंगम
दृश्य दाखवणाऱ्या app मुळे
डोकं फिरायची वेळ आली आहे. एरवी वाट्टेल ते कपडे घालून स्वतःची टिमकी मिरवणाऱ्या
खुळबुळजनक प्रोफाईलींमध्ये ऐन दिवाळीत साड्यांचा धो धो पाऊस पडला. खरं तर डोळ्यांना बरं वाटण्यासारखी
परिस्थिती निर्माण झाली होती म्हणायची वेळ आली होती.चांगले फोटो बघण्याची अपेक्षा वाढली होती....
पण... दुष्काळात १३वा महिना येऊन जसा छळतो , त्याच तीव्रतेने insta ने अपेक्षेला तडा दिलाच... भरजरी साडी नेसून
चांगले हावभाव न देता त्याच विचित्र हावभावांचा महापूर आला होता. आविर्भावाच्या
महापुरात सापडलेला माणूस शाब्दिक गटांगळ्या खाण स्वाभाविक आहे, म्हणून अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून
आम्ही प्रचलित भाववक्तव्याचे विशेषणयुक्त वर्गीकरण प्रात्यक्षिकासह(पिडा सहन करा) पुढे सादर करत आहोत..
प्रत्येक मुलगी या वर्गीकरणात बसेलच असे नाही. बहुतांश मुली सेन्सिबल असतात आणि असल्या आचरटपणा पासून दूरही राहतात- त्यामुळे
कशातच बसत नाहीत. त्यांना या ब्लोगमध्ये अजिबात टार्गेट करत नाहीये. खाली दिलेली
यादी देखील सर्वव्यापी नाही. बऱ्याच मुली यातील दोन किंवा अधिक भाव एकत्रही करतात. काही
मुली Gaussian Outliers असतात, आणि या यादीपलीकडले हावभाव व्यक्त करतात. तरी, बहुतांश जणी(आणि
काही जण) पुढील
वर्गांमध्ये बसतातच.
१. चंबूमुखी: सोशल मिडियावर सगळ्यात खळबळजनक आणि प्रचलित अशी
ही पोज. आपल्या ओठांचा विचित्र असा काहीतरी चंबू करून बदकासारखं तोंड करत, गाल आत ओढून
खोट्या खळ्या पाडण्याचा फालतू प्रयत्न करून फोटो काढणाऱ्या मुली या "चंबूमुखी" वर्गात
गणल्या जातात. मला अनेकदा वाटतं की अशी तोंडं केली की त्यासमोर बेडूक
ठेवावा. कोण जाणे, एखाद्या शापित
बेडकाचा या चंबूमुखीमुळे भाग्योदय व्हायचा...
२. त्रस्तललाटी: या गटात
मोडणाऱ्या मुली कायम चेहऱ्यावर एक त्रस्त भावना ठेऊन फोटो काढतात. “दामू नेन्या”
सारख्या यांच्या कपाळावर पण कायम आठ्या असतात. ढगळ कपडे घालून भल्या मोठ्या
कॉफीच्या कप मागे अर्धा चेहरा लपवून त्रस्तललाटी होण्यात यांना काय धन्यता वाटते
काय माहित!. यांच्या फोटोकडे बघून शेवटी आपल्यालाच वैताग येतो. देवाने सुंदर चेहरा
असे फालतू भाव दाखवायला दिला नाहीये असं ओरडून सांगावसं वाटतं यांना.
३. वक्रभिवई: शायनिंग
मारणाऱ्या काही मुली असतात त्यांची ही खासियत आहे. उगीचच एक भिवई वर घ्यायची आणि
दुसरा डोळा छोटा करून एकाक्ष नजरेने जगाकडे बघायचं. माणसाला सतत आश्चर्य वाटलं
किंवा सतत संशय आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक भिवई सेफ्टीपिन ने कपाळात अडकवून
ठेवले आहे असा काहीतरी भास होतो. फुटबॉलमध्ये कार्लो अंचेलोत्ती चा चेहरा
निसर्गतःच असा आहे, त्यामुळे तो
मिश्कील वाटतो. पण त्याची कॉपी करणाऱ्या मुली मांजर जसं झोपता झोपता एका डोळ्याने
जग बघतं, तशा काहीशा दिसतात. पण मांजरी निदान असे डोळे करून कान टवकारून बसल्या की
गोड तरी दिसतात. असो..
४. ऊर्ध्वनयन
अधरांगुली: या वर्गातल्या मुली कायम तंद्री लाऊन वर बघत असतात. कायम. वर.
भर दिवसा आकाशातले तारे मोजत असतात आणि त्यांचा हा दिवसाढवळ्या सप्तर्षी बघण्याचा वेडेपणा
सांगणाऱ्याला करायला ओठावर बोट ठेवतात.(सुदैवाने स्वतःच्या). मला अजून खात्री पटली
नाहीये की नक्की हाच विचार असतो, का कोणतातरी
जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण गहन विचार करत तंद्रीत आहोत असं दाखवायचा खटाटोप
असतो. पण, त्यांच्या दुर्दैवाने त्या साक्षात मंद वाटतात. कारण काहीही असो- आम्ही
किती हुशार, माझे डोळे किती छान
कोणताही विचार करून फोटो काढला तरी, बरेच वेळा
चष्म्याची जाहिरात करत आहेत असंच वाटतं. तुमचं माहित नाही, पण अशा मुली बघितल्या की त्यांच्या डोळ्यात लेझर मारावासा
वाटतो- तो १० रुपयांचा कुत्र्या मांजराना वेड लावणारा...अगदी डोळ्यासमोर तरळलं हे
दृश्य!
५. चंबुंगली: “तू गप्प
बस/आय अॅम द बेस्ट” पोज. ओठांचा चंबू करून त्याच्यावर बोट. हे फोटो बघून तर साक्षात हिज हायनेस श्री श्री षट्बिस्कीटी ख्रिस्तियानो
रोनाल्डो देखील लाजेल. या पुढे काय बोलावं आपण?
६. एधितनेत्रा: उगीचच डोळे
मोठ्ठे करून बघायचं. जितके डोळे वटारता येतात, तेव्हड्या तुम्ही ग्रेट. काय सांगू आता...घुबडाचे डोळे यांच्यापुढे लहान असतात...
नाही, म्हणजे कधी कधी मुली
बर्यापण दिसतात यात...पण... बंगाली मुलीं एधीतनेत्रा झाल्या की कमालीचं भ्यायला
होतं. आत्ता मोठ्ठे डोळे करून बघतायत, काय माहिती
काही क्षणात “आमी मोंजोलिका” करत अंगावर धावून यायच्या. लांबच राहिलेलं बरं...अजून एक... इनामदाराचं "डोळे बघ डोळे" ते पण आठवतं...
७. वक्रकटी
हस्तकटिका: या गटातल्या मुलींना आयुष्यात सरळ उभं राहता येत नाही. NCC नापास. १०० टक्के. सावधान सांगितलं की नक्की प्रोब्लेम येत
असणार यांना. काय ते विचित्र उभं राहणं, कुल्ले काय बाहेर काढायचे, कंबरच एका बाजूनी बाहेर काढायची.. आणि हात कंबरेवर
ठेवायचे.. काय कौतुक आहे या पोज च कळतच नाही. हा-हातात पाण्याचा घडा असता ही पोज तर
समजू शकतो, पण इथे तर काहीच नसतं. या
मुली बहुदा तीन ठिकाणी वाकडा असणाऱ्या इष्टुर फाकड्याच्या घराण्यातल्या असाव्यात.
८. आदंशति: या
वर्गातल्या मुलींना (सुदैवाने) स्वतःचे ओठ चावण्यात धन्यता वाटते. वास्तविकता
यांचे दात कुबड्याखवीस आणि तात्याविंचूच्या कवळ्यांचा साचा सुवर्णलक्ष ठेवून बनवले
आहेत की काय असंच वाटतं. ओठ काय चावायचेत फोतोंमध्ये? ओठ नाही चावले तर नख किंवा बोट चावतात. आणि सगळ्यात कहर
म्हणजे नाडी. दामले मास्तरांच्या वर्गातली नाडी खाणाऱ्या पोराची बहिण असणार ही
आदंशति. बाप उपाशी ठेवत असणार.
दिसलं काही की चावलं त्याला... तुम्ही काय लुईझ
स्वारेझ आहात का? काहीही करायचं!
९. अर्धानासिका
कृष्णोपनेत्रा: या स्वतःला लेडीज जेम्स बॉंड समजतात. आपण गॉगल घातल्यावर
जरा बरे दिसतो हे त्यांना माहिती असत, आणि त्यावर हवा करायला तो गॉगल तर्जनीने
नाकावर अर्ध्यापर्यंत खाली आणून बेक्कार खुन्नस देतात. यांना मी घाबरून असतो.
त्यामुळे जास्त बोलणार नाही.
१०. अधरचुश्चुषा: ओठांना गांधीरमाशी
चावल्यावर ओठ सुजल्यावर जे होईल तसं काहीसं करून त्यावर लाल भडक लिपस्टिकचा थर
लाऊन याचं स्वपाप्या देणं आणि घेणं सुरु असत. यांचा पसार सर्वत्र असतो. स्टिल फोटो,
gif,boomerang, ग्रुप फोटो, वगैरे काहीही असो. ग्रुप फोटो असला की तर अस्वलांच्या टोळीने मधमाशांच पोळं
पडल्याचाच भास होतो. च्विंगम वरचे ओठ पण
एवढे मोठे नसतात. असो..
(फोटो उपलब्ध नाही)
१२.
द्विशर्याश्मीलिता: या वर्गातल्या पोरी भारी असतात. प्रत्येक फोटोत उभ्या
आडव्या “V” च्या खुणा करतात. त्याचा (अन)अर्थ
मला अजून कळलेला नाहीये. V च्या जोडीला प्रत्येक
फोटोत डोळा मारतात. खऱ्या आयुष्यात एखाद्या पोरीने असे डोळे मारले ना, तर माणूस आयुष्यातून उठेल... यांना आयुष्यात योयो
हन्निसिंह चालवलाय की काय अशी भीती वाटते. नाही, कारण खरच तसं काही असलं, तर वेळेत इंजेक्शन घेतलेली बरी.. सेल्फी मैने ले ली
आज हे आपलं ब्रीदवाक्य करून या वर्गातल्या पोरी हा संसर्गजन्य हावभाव सगळीकडे
पसरवतात.
१३. प्लवबटीका: या मुलींचे
प्रत्येक फोटो मध्ये केस किंवा केसांची बट हवेत उडताना आपल्याला दिसते. “उडे जब जब
जुल्फे तेरी.. कवारियो का दिल मचले” या गाण्याला फार महत्वाचं मानुन या मुली आपलं
आयुष्य जगात असतात. हा- हा तसा प्रवेशास अवघड वर्ग मानवा लागेल, कारण मुळात यातल्या मुलींचे केस लांब असण्याची गरज असते-
हो, आणि गंगावन लाऊन इथे
प्रवेश निषिद्ध असतो. पण मला खरच कळत नाही... घरातला पंखा लावला तरी कशी यांची बट
उडते! म्हणजे काय केसांना anti-gravity non-neutonian फ्लुइड बनवलंय का? निसर्गतः केस उडत नसले, तर स्वतःच फुंकर मारून आपली बट उडवताना या दिसतात. असे फोटो बघितले की मोह
आवरत नाही... एकदा खरच करणारे... तोंडापुढे धूर फोटोशॉप करून मागे “कॉलर को थोडासा
उपर चढाके” गाणं लाऊन तो व्हिडियो बनवून यांच्या घरी पाठवायचा.. बघू काय होईल ते
होईल...(मला लांब केस नाहीत, म्हणून आकाशकंदिलाने काम केलं आहे- त्याचे विशेष आभार).
१४. ह्रिनमुखा: या वर्गातल्या
मुलींना खोटं लाजण्याची भयानक खोड असते. म्हणजे, फोटो बघून कळतं हो आम्हाला, की खोटारडेपणा
करताय.. उगीचच स्वतःचे बूट(ट च आहे) बघत बसतात...जाऊदे, गैरसमज नको. चपला बघत बसतात. किंवा गालावर हात ठेवून उगाच
लाजायचा अभिनय करतात. काही नाही हो, खाली मुंडी अन
पातळ धुंडी... आपण न बोललेलंच बर...
असो... तर आमच्या सहनशक्तीत एवढ्याचीच वर्णनं
बसतात. आमचे केस लांब नाहीत, त्या मुळे
यातल्या काही गोष्टी आम्ही करू शकत नाही... त्यामुळे जाहीर माफी मागतो. मी
असले फोटो काढून टाकायचं धाडस करतोय खरं...मला खात्री आहे की काळं कुत्र लाईक करणार
नाही.
मुलांनो-- अशा पोरींच कसलं आलंय फुकटचं कौतुक??? कशाला अशा फोटोंना हजार लाईक्स करता? आवरा अरे. त्रेता युगात
आणि द्वापार युगात ध्यानस्त ऋषीमुनींना विचलित करायला उर्वशी रंभा मेनका यांना
भरतनात्याम वगैरे करायला लागायचं इकडे तुम्ही विचित्र हवभावांना काय बळी पडताय? लायकी वाढवा की जरा.
मुलींनो- माझे हे फोटो बघून किळस आली असेल, तर तुमचे असले फोटो बघून मला आणि माझ्यासारख्या अनेक विश्वामित्रांनाही तशीच किळस येते. त्यामुळे फोटो टाकताना १००दा विचार करा... आज मी अनेक वर्ष साचलेला वचपा काढून घेतला एकदाचा.
एकूणच पब्लिकला.. असला फालतूपणा सहन करण्यापेक्षा आणि वायरल करण्यापेक्षा चांगल्या गोष्टी तरी शेअर आणि अपलोड करा.
जाऊदे... झाला माझा आजचा राग व्यक्त करून...
तळटीप: वरील ब्लॉग सर्व मुलींना उद्देशून लिहिलेला नाही. हुशार मुलानी नोंद घ्यावी नोंद घ्यवी आणि वरील प्रकाराला फक्त विनोद मानावे.,मूर्ख मुलींनी फेमिनिसमच्या नावाखाली माझ्यावर फालतूची टीका करू नये.
-हुकुमावरून(फक्त मूर्ख मुलींसाठी(आणि मुलांसाठी))