Pages

Wednesday, 8 November 2017

व्यंगचित्र

(इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर वारंवार येणाऱ्या फोटोंना लक्षात ठेऊन:)


डोळे होते वटारलेले
तोंडाचा चंबू झालेलाच,
सुजलेल्याशा ओठांवरती
बहुदा पानाचा रंग चढलेला

फिल्टर नक्की पांढरा होता
का पावडर जास्त लागलेली
भुताटकीला भिऊन किंवा
चेहऱ्याची लाली लपलेली

ग्रीष्मातही डोक्यावरती
फुलांचा मुकुट घातलेला,
त्याच्यावरती रेबॅनचा गॉगल
हेअरबॅन्ड म्हणून लावलेला

सोनेरी रंगाची एकच बट
बोटावर होती कुरवाळलेली
दुसऱ्या हातात ग्लासामध्ये
बिअर होती फेसाळलेली

लाल भडक वन-पीस नेसून
हाय चेअर वरती बसलेली
आठ इंची हाय हील मात्र
लपवायची तेवढी राहिलेली

दीड-दोन हजार लाईक्स होते
कमेंट्सचं दव पडलेलं
तरुणाईचं टेस्टोस्टेरॉन
नको तेवढं वाढलेलं

स्वतःमध्येच रमून तिला
कधीच ना हे कळले होते,
फोटोमध्ये व्यक्ती नसून
एक व्यंगचित्र बसले होते

Sunday, 29 October 2017

मी गप्पा मारायला बसलो की

(तेव्हा)

मी गप्पा मारायला बसलो की
तासंतास बोलायचो,

डोकं बधीर होईपर्यंत
आवाज पोळून पडेपर्यंत
घसा आवळून निघेपर्यंत
जबडा निखळून येईपर्यंत
अन स्वरतंतूची कंपने 
नाईलाजाने थांबेपर्यंत.

(आज)

मी गप्पा मारायला बसलो की
तासंतास बोलतो

डोकं बधीर होईपर्यंत,
डोळे पोळून निघेपर्यंत,
अंगठ्यांची हाडं दुखेपर्यंत,
वाय-फायचं कव्हरेज असेपर्यंत,
अन मोबाईलची बॅटरी
नाईलाजाने संपेपर्यंत.

Thursday, 26 October 2017

खरं सांगू का...

खरं सांगू का- मला अशा मैत्रीचा कंटाळाच आलाय

"बैठकीतून" क्वचित कधी भेटणारी
तेलकट चकण्यावर अडलेली
दारू पुरती बांधलेली अन
चिअर्स चा जयघोष करणारी
मला अशा मैत्रीचा कंटाळाच आलाय.

खरं सांगू का- मला अशा मैत्रीचा कंटाळाच आलाय

जिव्हेवरती शिव्यांची पुडी जपणारी
त्याची मुक्त उधळण करणारी
भाषा मलीन करणारी अन
त्यातच धन्यता मानणारी
मला अशा मैत्रीचा कंटाळाच आलाय.

खरं सांगू का- मला अशा मैत्रीचा कंटाळाच आलाय.

संभोगाच्या वायफळ चर्चा करणारी
फॉरवर्ड मधल्या नग्न बायका बघणारी
त्यांच्या स्तनांच्या दरेत कोंडणारी
अन मनाला योनीत घालणारी
मला अशा मैत्रीचा कंटाळाच आलाय.

खरं सांगू का- कधी तरी भेटत माणसं जगाच्या कोपर्यात कुठेतरी

संभोगाच्या पलीकडे बोलणारी 
दारूच्या बाटल्यात न बुडणारी
भाषा निर्मळ असणारी
क्षितिजाची कवाडं खोडणारी
पण-मला अशांना शोधायचाच कंटाळा आलाय.

खरं सांगू का- मला मैत्रीचा कंटाळाच आलाय.

Wednesday, 18 October 2017

एक भाऊबीज...अशीही...

आजोबांचा नव्वदावा वाढदिवस होता. वाढत्या वयानुसार, तसं त्या पिढीचं एकमेकांना भेटणं कमीच झालं होतं.. आता ८ भावंडांपैकी पैकी दोघेच होते- आजोबा, आणि त्यांची बहिण.. 

अनेक वर्षांनी त्या दिवशी त्यांचा वाढदिवस आणि दिवाळी म्हणून आमच्या घरी सगळे जमणार होतो. 

"माझ्या बहिणीला पण नक्की बोलाव.. हल्ली बरेच वर्षात भाऊबीज झाली नाहीये. या निमित्ताने ती पण होईल." -आजोबा आनंदाने म्हणाले होते. 

बेत ठरला. सगळंच ठरलं! आजोबांचं ओवाळणीचं पाकीट देखील भरून झालं...
दिवाळी आली... आणि तिच्याबरोबर एक विपरीत निरोप...

आजोबा त्यांच्या बहिणीला एकदा शेवटचं भेटायला निघाले. 
बाकीचे जग दिवाळीचे दिवे लावण्यात मग्न असताना मृत्यूने त्यांच्या हक्काच्या शेवटच्या दिव्यावरच फुंकर मारली होती...

भाऊबीज झालीच नाही...त्यानंतर कधीच..

Friday, 6 October 2017

मी आणि तो...

श्री रागाच्या तीव्र स्वरांच्या गांभीर्यात
संवेदनांवर होणारा आघात सोसत
क्षीण अस्तित्वात गुरफटत, फरफटत.
मी आणि तो घट्ट मिठी घालून बसलोत

उदासीन तिन्हीसांजेचा तोच कंटाळवाणा सूर्यास्त,
तेच भडक उदासीन रंग आकाशात भिरकावून
पंचमावरून रिषभावार येणाऱ्या मींडीसारखा
घसरत आहे पुढे– दोघांना एकाच काळोखात ढकलत

सूर्य गिळणाऱ्या डोहावर गर्द विषण्णतेची सावली
गुदमरायला थोडी देखील जागा न सोडणारी
पसरलेल्या खिन्न अस्वस्थ स्तब्धतेत बुडवणारी
बुडवणारी की...जागीच गटांगळ्या खाऊ घालणारी...  

आमचे संवादही तेसेच- कधीतरी पुढे सरकणारे
चुकीच्या लईत अडकलेल्या आंदोलनांसारखे,
कोमल धैवताला तीव्र मध्यमाचा चटका देत
षड्जावर येता येता पुन्हा शून्यात विलीन होणारे

अंधार कापत बसलो आहोत आता दोघेच-
उद्याच्या सूर्याची वाट बघत;
संध्याकाळी ग्रासलेल्या मिठीत-तसेच..
एकमेकांना घट्ट कवटाळून
जन्मभराची जरी नसली तरी
एका रात्रीची सोबत करत...

मी आणि माझा एकटेपणा..

(चित्रकार: अलोक मेहता.)