Pages

Wednesday 18 March 2015

पोपट-पुराण

मधे कधीतरी पोपट या विषयावर चर्चा सुरु असताना पु.लंची आठवण आली आणि एकदम नखशीकांत हिरव्या रंगात बुडालेले "दामले मास्तर" डोळ्यासमोर आले.(चिन्या दामले नाही. नाना दामले तर मुळीच नाही.) तसे दामले मास्तर आधीच हरणटोळ आहेत म्हणतात, त्यातून पोपट म्हणजे "डेडली" काहीतरी होणार म्हणून तो विचार तिथेच बंद पाडला.

पुढे शाळेत शिकवलेला "पिंजर्यातला पोपट" हा धडा आठवला. म्हणजे धडा नाही आठवला, पण धड्यातल्या एकूण पोपटांची संख्या आठवायचा प्रयत्न झाला. त्यात एक पिंजर्यातला पोपट होता, एक लाकडी पोपट होता, एक पोपट नावाचा मुलगा होता. हा पोपट तो पोपत, सगळ्या पोपटांचे पोपट- सगळीकडे पोपटच पोपट. डोक्याची पार मंडई करून ठेवली.  नंतर अतुल कुलकर्णीला  सिनेमात झालेला पोपट आठवला आणि आपण पोपटापासून लांब राहिलेलंच बरं हा निष्कर्ष काढला. पण डोक्यात किर्र किर्र करणारा तो कीर काही डोक्यातून उडत नव्हता. त्यामुळे त्यावर थोडे फालतू विचारमंथन करायचे ठरवले.

पोपट हा बहुदा औरंगझेबाचा वंशज असावा. नाहीतर तो एवढा हिरवा नसताच.  हा विचार ज्या क्षणी माझ्या मनात आला, त्याच्या बरोब्बर पाचव्या मिनिटाला डिस्कव्हरीवर एक लाल रंगाचा पोपट बघितला. त्यामुळे हा पक्षी फक्त औरंगझेबच नव्हे, तर स्टालिनचा देखील वंशज असेल हा विचार सहज चाटून गेला. मुळात असा कोणी पोपटी इसम अस्तित्वात असता तर त्याने सर्व जगाला तरी ठार मारले असते नाहीतर २ विरुद्ध विचारसारणीच्या जळमटात अडकून स्वतः मेला असता. सुदैवाने पोपट अशातला नाही. त्याच्या कृत्यावरूनतरी त्याच्यात या दोघांचे गुण अजिबात उतरलेले दिसत नाहीत. आहो पोपटाच्या हाती(चोचीने- पोपटाला हात नसतात) कोणाचा मुडदा पडलाय हे कधीच ऐकले नाहीये! त्यामुळे तो रंगांनी औरंगझेब आणि स्टालिनसारखा वाटला, तरी विचारांनी तो गांधीवादी वाटतो. माणसाने त्याला कितीही छळो, तुरुंगात टाको, उगाच मिरच्या बिरच्या खायला देवो, हा कोणताही हिंसक मार्ग न अवलंबता निमूटपणे सगळं सहन करतो. त्यामुळे तो खरा गांधीवादी असावा हे माझे मत ठाम झाले आहे. एवढा संयम बाकी कोणाला! 

औरंगझेब, स्टालिन आणि माहात्मा गांधी यांच्याशी पोपटाचा उगीचच संबध जोडणाऱ्या डोक्यातून पुढे "पोपटाचा धर्म नक्की कोणता?" हा विचार येणं स्वाभाविक होतं. वास्तविकतः पोपट कोणत्याही एका धर्मात बसत नाही. त्याला बसवणं शक्क्यच नाही. कारण माणसासारखा तो देखील सगळ्या धर्मांच्या रंगांमधे दिसतो. हिरवा, लाल, निळा, पिवळा, गुलाबी, पांढरा, करडा आणि काळा अशा वेगवेगळ्या रंगाचे पोपट मी सिंगापूरात बघितले होते ते एकदम डोळ्यापुढे आले. त्यामुळे कोणत्याही एका धर्माच्या रंगाचा शिक्का त्यावर मारणं चुकीचंच आहे. भगवा पोपट मात्र मी आजवर बघितला नाहीये- बहुदा सगळे पोपट सेकुलर असावेत.  

सिरीयस विचार बाजूला ठेऊन फक्त फालतू कुतूहल म्हणून पोपटांनी त्यांचा स्वतःचा धर्म प्रस्थापित केला तर तो कसा असेल असा विचार आला.या धर्माचे नाव बहुदा "पोपट मीमांसा"( हिला ट्वीटरवर शोधा!) असावे. त्याच्या भगवंताचे नाव बहुदा "कीर" असावे. एरवी पोपटाला कोणी त्या नावाने हाक मारत नाही, त्यामुळे जो "कीर" आहे तो त्यांच्यातला स्पेशल कोणीतरी असावा. पोपटाला भजनं म्हणता येतात असे बऱ्याच पोपट पाळणार्यांना (फक्त त्यांनाच) वाटते. त्यामुळे पोपटाच्या धर्मात भक्तीरस भरपूर असावा. पीता-पुराण असे त्यांच्या धर्मग्रंथाचे नाव. त्यांच्या धर्मगुरूंना बहुदा पोप-अट म्हणत असावे. मोक्षप्राप्तीसाठी  तरसणारा  माणूस जसा "राम राम" करतो, तसा मोक्षप्राप्तीसाठी तरसणारा पोपट बहुदा "किरकिर" करत असावा. किंबहुना स्वर्गात जागा मिळवण्यासाठी त्याने याचा रेटा लावावा असा देखील नियम असला पाहिजे. पोपटाच्या धर्मानुसार एका आदर्श पोपटाने फक्त फलाहाराचे भोजन स्वीकारावे असा दंडक असावा. मांसाहार करणारा पोपट मी तरी बघितला नाहीये. हां- उपवासाच्या दिवशी चेंज म्हणून पोपटाने हिरवी किंवा लाल मिरची असे तामसिक पदार्थ खाललेले चालत असावे.  पोपटांच्या धर्मात पोपटाने डोक्यावर कोणती टोपी, पागोटे, तुरे शेंडी ठेवलीच पाहिजे असा दंडक नसावा- ज्या त्या पोपटाला हवी ती स्टाईल मारता येते. तेवढे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पोपटाचा धर्म त्यांना देत असावा. दाढी मिशा वाढवलेला पोपट मात्र कधी दिसत नाही. त्यांच्यावर रंगाचे बंधन नाही.

 इतर धर्मांप्रमाणे पोपटाच्या धर्मात देखील तीर्थयात्रा असाव्यात. त्या बहुदा दक्षिण अमेरीकेत असणार. कारण तिथल्या देशांची नावं उगाच "पेरू" आणि "चिली" नसणार ना! ती नक्कीच पोपटांसाठी मक्का-व्हेटीकन-वाराणसी-जेरुसलेम असणार. पोपटांच्या धर्मक्षेत्रांची स्थानिक भाषेत नावे देऊन पोपटांच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी मानवांनी या जागांची नावे पोपटांना पचतील अशीच ठेवली आहेत. या देशाची किमान एकदा यात्रा केली की पोपटाला परस्पर मोक्षप्राप्ती मिळत असावी. पेरू आणि चिलीला गेलेले पोपट परत आले आहेत असे ऐकले तरी नाहीये. एकूण काय, तर कोणत्याही इतर धर्माप्रमाणे या धर्मात देखील त्याच गोष्टी असणार.


सुदैवाने पोपटांचा धर्म अस्तित्वातच नाहीये. असलेल्या धर्मांचा गाभा आपल्याला समजत नाही, त्यामुळे कशाला उगाच नसलेल्या धर्मावर  वायफळ विचार करत बसायचा! थांबवलेलाच बारा!! आणि हो- या विषयावर बोलून  कशाला उगाच आपला पोपट करून घ्यायचा!...



माणसाच्या नजरेत पेरू-चिली




            पोपटाच्या नजरेत पेरू-चिली.