Pages

Monday 20 November 2017

साध्या सरळ गोष्टींची छोटेखानी कथानके-भाग १

"तानपुर्यावर षड्ज झंकारत होता. मेघ राग चहु दिशांत गर्जत होता... घुमत होता... दुमदुमत होता... बाहेर पण, आणि आत पण. त्या गडगडाटात मी मात्र अगदी उदास होऊन कण्हत कण्हत त्याच एका कोपर्यात खूप काळ खिळून बसून होतो..बसून बसून पायात अगदी गोळे आले होते. प्रत्येक कडकडाट आणि प्रत्येक गडगडाट पोटातही तितकाच भयानक गोळा आणत होता..
अविश्रांत वर्षाव सुरु होता...संततधार...होतोय.. होतोय... थांबायचं नाव नाही. उठलो तर पडीन असच वाटत होतं. वातावरण अगदीच पाणीमय झालं होतं...त्यातून असल्या वर्षावातून निघणारे गंध निराळेच...एक वेगळच वातावरण सजलं होतं... क्वचितच कधी अनुभवायला मिळणारं...काल रात्रीच्या जेवणासारखं...विपरीत...
ढगाला सणकून कळ लागली होती, पाणी थेंबथेंब कसलं... चांगलं बदाबदा गळत होतं...नळाचं पाणी पण त्याच जोरानं वाहत होतं...लोमोटीलच्या गोळ्याचं २ गोळ्या गायब असलेलं पाकीट तिथे बाहेरच अर्धा भरलेल्या पेल्याच्या बाजूला पडलं होतं..."

साध्या सरळ गोष्टींची छोटेखानी कथानके-भाग १: एका गवैयाचे पोट बिघडते तेव्हा:
...

Wednesday 8 November 2017

व्यंगचित्र

(इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर वारंवार येणाऱ्या फोटोंना लक्षात ठेऊन:)


डोळे होते वटारलेले
तोंडाचा चंबू झालेलाच,
सुजलेल्याशा ओठांवरती
बहुदा पानाचा रंग चढलेला

फिल्टर नक्की पांढरा होता
का पावडर जास्त लागलेली
भुताटकीला भिऊन किंवा
चेहऱ्याची लाली लपलेली

ग्रीष्मातही डोक्यावरती
फुलांचा मुकुट घातलेला,
त्याच्यावरती रेबॅनचा गॉगल
हेअरबॅन्ड म्हणून लावलेला

सोनेरी रंगाची एकच बट
बोटावर होती कुरवाळलेली
दुसऱ्या हातात ग्लासामध्ये
बिअर होती फेसाळलेली

लाल भडक वन-पीस नेसून
हाय चेअर वरती बसलेली
आठ इंची हाय हील मात्र
लपवायची तेवढी राहिलेली

दीड-दोन हजार लाईक्स होते
कमेंट्सचं दव पडलेलं
तरुणाईचं टेस्टोस्टेरॉन
नको तेवढं वाढलेलं

स्वतःमध्येच रमून तिला
कधीच ना हे कळले होते,
फोटोमध्ये व्यक्ती नसून
एक व्यंगचित्र बसले होते