Pages

Saturday 23 February 2013

तर,तुमचं नक्की काय चालू आहे?

पंचविशी ओलांडलीये, आणि तसाही सगळ्यांना माझ्यावर जबर संशय आहे, म्हणून अशा प्रकारचा पोस्ट लिहायला पुढेमागे विचार करत नाहीये. एरवी तसाही हा पोस्ट कोणतीही भीती मनी न बाळगता लिहिलाच असता. भ्यायचं कशाबद्दल! इतरांना माझ्याबद्दल - खास करून या मुद्द्यावरून काय वाटतंय याचा फारसा कधी विचार नाही केला ना!! आणि केला तरी फरक कधीच पडला नाहीये! असो. मुद्द्यावर गुद्द घालतो.

माझ्या आजूबाजूला माझे अनेक मित्र-मैत्रिणी हल्ली प्रेमात पडताहेत.(काहीकाही एकमेकांच्याही- भीतीदायक कल्पना आहे ही!) हल्ली तसा रिलेटिव्ह शब्द झाला.( हल्ली म्हणजे गेल्या ४-५ वर्षात.) यांच्यात २ वेगळे ग्रुप्स करता येतील. एक असतो तो म्हणजे अजिबात न लाजणाऱ्या युगल जोडप्यांचा. म्हणजे लोक आपल्याबद्दल बाहेर चर्चा करतील- करू देत, काय फरक पडतो अशा प्रकारे सिच्युएशन हाताळणारा एक ग्रुप असतो, तर दुसरा ग्रुप असतो तो अतिशय खुफिया प्रकारे कोणाच्या नजरेत न येता दबत दबत प्रेम करणारा. "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि जगाची फिकीर करत नाहीत, तेव्हा त्या व्यक्ती प्रेमात पडलेल्या असतात... जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि "हे कोणालाही कळता कामा नये" म्हणतात तेव्हा त्या व्यक्ती प्रेमप्रकरणात पडले असतात..." हे मीच उद्गारलेले माझे स्पष्ट मत आहे. लपून छपुन "प्रेमप्रकरण" करणाऱ्या लोकांना उगाच असं वाटत असतं की कोणाला काही कळणार नाही. लपवायचं काय असत यात, तेच कळत नाही! म्हणा लपवण्यात आणि पकडण्यात मजा आहे. बर यांना रंगे हातो पकडलं, तरी नाही ला नाहीच असतं! पण काही प्रश्न विचारले की यांची बोलती मात्र बंद होते आणि काय आहे नाही ते सगळं कळतं.

या भयानक प्रश्नांपैके सगळ्यात घातक आणि उत्तर न देता येण्यासारखा प्रश्न म्हणजे "तुमचं नक्की काय सुरु आहे रे!" "प्रेमप्रकरणात" अडकलेल्या जोडप्याला/ एकट्याला पकडायला हा प्रश्न फारच उपयोगी आहे. "प्रेमप्रकरणाच्या" वेगवेगळ्या टप्प्यांवर हा प्रश्न वेगवेगळ्या स्टाईलने मित्र मैत्रिणी विचारतातच. प्रत्येक स्टेजला एक ठराविक टोन असतो. चिडवणे, आश्चर्य, उत्साह, निराशा असे वेगवेगळे भाव हा एकच प्रश्न हाताळतो, आणि त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण देत त्याला योग्य न्याय दिला जाईल असे उत्तर कोणालाच देता येत नाही. एखादा हाडाचा अभियांत्रिकी विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असताना एक्स्टरनल एक्झामिनरच्या प्रश्नाला जितका घाबरत नसेल, तितका जास्ती "तुझं/तुमचं नक्की काय चालू आहे?" या प्रश्नाला घाबरतो. कारण पण तसंच आहे- हा प्रश्न शून्यातून ब्रम्हांड निर्माण करू शकणारा आहे! उत्तर दिलं तर मीठ मसाला लाऊन गोष्ट पसरणार, उत्तर दिलं नाही, तर अफवा पसरणार! प्रेमात पडलेल्या लोकांना या प्रश्नाचा काही त्रास होतंच नाही, कारण ते कबूलच करून टाकतात. पण सहसा असे लोक फारच दुर्मिळ असतात. जवळपास सगळेच जण "काहीतरी शिजतंय -> अर्रे भानगड आहे -> लफडं आहे -> सेट आहे" या राष्ट्रीय मार्गावरच आपल्या प्रेमप्रकरणाचा प्रवास करतात. त्यामुळे जवळपास सगळ्यांनाच "तुझं नक्की काय चाललंय" या प्रश्नाला सामोरे जावेच लागते. असो. मला नेमकं काय सांगायचं आहे, ते खालील काही सीन्स मधून सांगायचा प्रयत्न करतो.

एखादा पोरगा- पहिल्या वर्षातला फ्रेशर घ्या. नवा आलाय कॉलेजात. ११-१२वि जस्ट दिलीये, त्यामुळे शिंग फुटायला सुरुवात झालेली आहे. शाळेत मैत्रिणी अनेक होत्या, पण त्या तर लहानपणापासूनच्या मैत्रिणी ना!! लाईन मारायचा चान्सच नाही!! ११-१२विला महाशय कधी महाविद्यालयात गेलेच नाहीत, त्यामुळे तिथे मुली कोण याचा आतापता काही नाही! हां- एखादी दिसली बरी, की नाव पत्ता काढून ठेवायचा आपला. पण त्यापुढे काहीच नाही. म्हणा ११-१२ फार पटकन संपते, त्यामुळे आपला हा (नाव नाहीये अजून, सोईसाठी झंप्या ठेऊया) काहीही करू शकत नाही. १२विला जरा बरे मार्क मिळवून चांगल्या कॉलेजात admission हवी असते त्यामुळे हे शेंडेफळ फक्त अभ्यास करतं! CET मध्ये सॉलिड मार्क मिळतात आणि महाशय सी.ओ.इ.पी सारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी कॉलेज मध्ये येतात. मुली पाहायला मिळतील(सिओईपी त अवघड आहे!) म्हणून डोळे जरा इथे तिथे फिरत असतात. या व्हिडीओ मधला हिरो तोच आहे असे त्याला वाटत असते! म्हणा असं काहीही होत नाही!

  (त्याच्या कॉलेजमधली एकही मुलगी हिच्यासारखी दिसत नाही, याची स्पष्ट नोंद वाचकांनी घ्यावी!)

आता या पुढचे त्याच्या प्रेमप्रकरणातले काही किस्से.

किस्सा १(काहीतरी शिजतंय!!)- प्रथम वर्ष. झंप्या आणि त्याचे काही मित्र कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये डबा खात बसले आहेत. कॅन्टीनच्या दुसऱ्या बाजूने "ती" येताना दिसते. ओळख ना पाळख. हा कोणाला कळणार नाही अशी नजर करून तिला मनसोक्त पाहतो. त्याला वाटतं कोणाला कळणार नाही. पण त्यांच्याच ग्रुप मधला एक चाणाक्ष मित्र नेमका त्याला पकडतो. "काय रे, कुठे तंद्री लागलीये? चालू काये तुझं!" हा गप्प. काहीच बोलता येत नाही!! ग्रुपमध्ये कोणालाही कळता कामा नये! कॉलेज संपल्यावर हा पार्किंग मध्ये उभा असतो, ती येते. हा म्हणजे अगदीच क्रश्ड होतो! पार्किंग मधल्या दुसऱ्या एका मित्राला विचारतो, "कोण आहे रे ही. हिला पाहिलंय कुठेतरी, साला नावच आठवत नाहीये!" मित्रालापण फार काही वाटत नाही, म्हणून तो काय जे काय नाव असेल ते सांगतो. घरी जाऊन हा ओर्कुटवरून सगळा तपशील मिळवतो, आणि लाईन मारायला तयार! नंतर फ्रेशर्स पार्टी होते, जात तीचाशी व्यवस्थित ओळख होते. याला तिचा नंबर मिळतो.(कसा मिळतो हे महत्त्वाचे नाही, मिळतो हे महत्त्वाचे!). मोबाईलवर आता "क्यूट-क्यूट" मेसेजेस पाठवणं सुरु होतं. "मनी माऊचं पिल्लू गादीमध्ये लपतं" टाईपचे.(हे कुठून आलंय हे ज्यांना समजायचं त्यांना समजेल!) एकदिवस नेमका याचा फोन मित्राच्या हाती लागतो आणि तिचे "क्यूट-क्यूट" मेसेजेस वर्गात लीक होतात.याची यथेच्छ घेतली जाते. ग्रुप जेवायला बसला की पहिला प्रश्न असतो(चिडवण्याच्या स्वरात)- "काय रे झंप्या काय चाललंय काय तुझं? मनी माऊची पिल्लं?"  हा म्हणतो- "अरे नाही रे! तुला वाटतंय तसं काही नाहीये! जस्ट फॉरवर्ड होता रे" मित्र-"हो ते माहित्ये, पण म्हणजे असे मेसेजेस म्हणजे नक्की काय सुरु आहे!" हा वैतागून उठून निघून जातो.. मागे ग्रुप बोलत अससतो..."शिजतंय काहीतरी!! हल्ली बोलत नाही बघ फारसा!!" बस्स.. अफवा पसरायला या नंतर फार वेळ नाही लागत!

किस्सा २(भानगड आहे काहीतरी)- द्वितीय वर्ष. आतापर्यंत झंप्याची आणि तिची चांगली ओळख झालीये. झंप्याला ती आवडते पण काही बोलत नाही, तिला पण झंप्या आवडतो पण ती सुद्धा काहीच बोलत नाही. आपल्याला काय वाटतंय हे कोणालाही कळता कामा नये, स्टेज२ मध्ये स्वागत! कॉलेजचा इव्हेंट असतो. तो आणि ती दोघेही पब्लिसिटीच्या टीम मध्ये.   दुसर्या कॉलेजमध्ये प्रचाराला जायचं असतं. टीम हेड नेमका दोघांना एकत्र पाठवतो. मग काय! त्याची बाईक..मागे ती.. लक्ष लागलं गाडी चालवताना तर नवलंच! बाईकचा रेअर व्ह्यू मिरर तीचावरच फोकस्ड! हे दोघे जातायत, वाटेत दुर्गात जातात कोल्ड कॉफी प्यायला..मित्रांचं हेरखातं फारच बळकट! इकडून कॉलेज मध्ये फोन जातो! "एड्या!! खबर पक्की आहे! आत्ता दोघांना दुर्गात बसलेलं पाहिलंय! डोळ्यात-डोळे घालून बसले होते!नक्कीच भानगड आहे काहीतरी. काही बोलत नसला तरी! ". खबर पसरते सगळीकडे. याला माहितीच नाही आणि!! दुसऱ्या कॉलेजमध्ये महाशय बसले असतात. त्यांना फोन जातो. "कुठे आहेस रे! काय करतोयस?" हा म्हणतो, "काही नाही रे, पब्लिसिटीच्या कामाला आलोय, एम.आय.टीत". मित्र विचारतो "पोरी कशा आहेत रे!!" हा "तिच्या" बरोबर असतो म्हणून काही बोलू शकत नाही. "नंतर भेटलास की सांगतो" असं म्हणतो. पकडला गेला इथेच! तिकडून आवाज "एकटाच आहेस ना? मग लाजतोय काय! एकटाच आहेस ना नक्की? का ती पण आहे!?" हा विचार करतो, "च्यायला त्यांना कसा कुठून कळलं?" आणि "हो रे, आलीये, ती पण" तिथून मित्राची चिडवाचिडवी सुरु... आणि नंतर पुन्हा तो घातक प्रश्न..."काय रे, म्हणजे नक्की काय चाललय काय तुझं आणि तिचं?!" याला नंतर काहीच बोलता येत नाही!

किस्सा ३(लफडं आहे रे!!)-तृतीय वर्ष. आपला झंप्या आता जरा मच्युअर झाला आहे. त्यांनी "तिला" त्याच्या भावना व्यक्त केल्या, तिनी पण केल्या, दोघे प्रेमात पडले आहेत, पण बाहेर कोणाला सांगितलं नाहीये. इतरांना काय करायचंय! आणि चुकून कोणी घरी बोललं तर काय!! संपलंच ना मग सगळं! आता त्यांच्या "प्रकरणाला" खरी सुरुवात झाली आहे. मित्रांना टाळणे, अवघड प्रश्न अव्होईड करणे असे सगळे प्रकार. मित्रांच्या मनात एनीवे संशय असतोच. वेरीफाय करायचं ठरवतात. याचं लक्ष हलवायला एका जुनियर पोरीचा वापर केला जातो. कॉलेजमधली सगळ्यात सुंदर पोरगी असते ती. सगळेजण मरत असतात, पण ती कोणालाही भाव देत नाही. याचे मित्र याला हरबरयाच्या झाडावर चढवत असतात. "अरे, तुला सांगतो मी, कॅन्टीनमध्ये असलो ना आपण, की कायम तुझ्याकडे बघत असते. त्यादिवशी तुझ्याबद्दल बरंच काही विचारात होती. हवा आहे राव तुझी!! मार प्रो तिला, सांगतो मी. स्टड होशील कॉलेजचा!" हा आपला, "नाही रे, माझ्या टाईपची नाहीये ती, बोर आहे!" (कॉलेजमधल्या सगळ्यात सुंदर मुलीला तुम्ही मित्रांशी बोलताना बोर आहे म्हणालात की मित्रांना माहिती असतं की तुमचं काहीतरी सुरु आहे!) मित्र टोमणा मारतोच तेवढ्यात.."बरोबर आहे ना, तुला बोरच वाटणार...तुझ्या आयुष्यात "ती" आहे ना! तुमचं नक्की काय सुरु आहे अरे?" आणि जखमेवर मीठ चोळावं म्हणून उगाच पुढे "नाही म्हणजे काही लफडं वगैरे सुरु नसेल तर मी तिच्यात डिक्लेअर इंटरेस्ट करणार आहे!" झाम्प्याला या प्रश्नावर काहीही बोलता येत नाही! (त्याच्या डोक्यात फक्त त्याला माहित्ये की मला माहित्ये त्याला माहित्ये असे विचार सुरु असतात, आणि ते इन्फायनाईट लूप मधे असतात!)

(किस्सा ४- लफडं आहे रे!! २)- अंतिम वर्ष. झंप्याने कंटाळून/वैतागून शेवटी आपल्या काही खास मित्रांना सांगितलं की वर्ष झालं ते दोघं एकत्र आहेत. पण अगदी बोटावर मोजता येतील इतक्या लोकांना माहित्ये. मुख्य म्हणजे त्याच्या घरी माहिती नाहीये. बर, हा घरी फारसा नसतो, हुंडारत असतो, म्हणून घरी संशय येतोय. मित्र घरी पत्ते खेळायला आले असतात. ती पण असते. खेळता खेळता त्याची वहिनी तिथे येते. आणि थेट मित्रांना विचारते. "काय रे, तुम्हाला कोणाला माहित्ये का याचं नक्की काय चाललंय! हल्ली घरी नसतो संध्याकाळचा! काय प्रकरण वगैरे असेल तर सांगा बरका, म्हणजे आमचे शोधायचे कष्ट कमी!" त्याला तर विहिरीत उडी मारायची असते त्या वेळी. ती त्याच्याकडे awkward होऊन बघत असते. मित्र एकटक बघत कसंबसं हसू आवारात असतात. पण या स्टाईलच्या "काय चालू आहे रे?" मुळे त्याच्या घरी कळतं काहीतरी लफडं आहे! लफडं हा शब्द बरोबर वाटत नाही, म्हणून त्याला "अफेअर" असे म्हणले जाते!

(किस्सा ५- सेट आहे रे!)- इंजिनीयरिंग झाल्यावर २-३ वर्षांनंतर. झंप्याच्या घरी सगळ्यांना माहित्ये. मित्रांना सगळ्यांना माहित्ये. लपवून ठेवण्यात आता तितकी मजा नाहीये. याचं भांड कधीच फुटलंय! गावभर यांचीच चर्चा सुरु आहे. आता सगळेजण यांच्या मित्रांना हैराण करतायत, "अरे याचं नक्की काही चालू आहे का ?"विचारून!. दोघंजण गावभर हिंडताना दिसत असतात, पण लग्नाचा पत्ता नसतो. वैतागून/चिडून शेवटी मित्र त्याला गाठून हरलेल्या टोन मध्ये विचारतात " अरे बाबा आता नक्की काय चालू आहे तुमचं! सेट आहात ना अनेक वर्ष! बास ना म्हणजे आता! करून टाका ना लग्न! किती दिवस असेच नुसते फिरत बसणार! ग्रुप मधलं पाहिलं लग्न" हा सूर लागतो तो त्याचा साखरपुडा होईपर्यंत! मात्र, अॅस युज्वल याचाकडे काहीही उत्तर नसतंच!


शेवटी एकदाचं त्याचं आणि तिचं लग्न होतं. त्याच्या डोक्याची कटकट सुटते, कारण "तुझं/तुमचं नक्की काय सुरु आहे?" या जीवघेण्या प्रश्नाला त्याला परत त्या अर्थी कधी सामोरा जाण्याची वेळ येणार नसते. आता त्याच्या त्रास देणाऱ्या मित्रांना हाच प्रश्न विचारून एक वेगळी "प्रेमप्रकरणाची कथा' रंगवण्याची जबाबदारी त्याचावर आली असते! 

बास करतो आता. बरंच लिहिलंय! हे माझ्या स्टोरीवर बेस्ड नाहीये. काल्पनिक आहे. काहीकाही गोष्टी माझ्या आजूबाजूला खऱ्या घडलेल्या आहेत. ज्यांच्याबद्दल उल्लेख न करता लिहिलंय, त्यांनी हे स्पिरिटमध्ये घ्यावं अशी विनंती.प्रेमात पडणे आणि प्रेमप्रकरणात पडणे या मधला फरक, आणि प्रेमप्रकरणाचे विविध टप्पे तुमच्या लक्षात आले असतील ही अपेक्षा!

प्रत्येकाचीच एक प्रेमकथा असते. ती त्याने त्याच्या त्याच्या परीने फुलवावी आणि सजवावी. प्रेमात पाडावं का प्रेमप्रकरणात पडावं हा ज्याचा त्याचा वैयात्तिक प्रश्न आहे. हे करा आणि ते करू नका सांगणारा मी कोण! हा- काही म्हणा, प्रेमात पडलेल्या जोडप्यापेक्षा प्रेमप्रकरणात पडलेल्या जोडप्याला एक वेगळी मजा अनुभवायला मिळते, म्हणून मी तरी प्रेमात न पडता प्रेमप्रकरणात पडणार हे ठरवलंय. पण प्रॉब्लेम इतकाच आहे, की पडायचं ठरवलं, की मला एकाच ठिकाणी पडायची सवय नाही! १०० ठिकाणी पडतो. त्यापेक्षा कुठेच न पडलेलं बरं- नाहीतर १ उडी १०० वांदे!! 

(स्टोरीलाईन डेव्हलप करायला सुमेध ढबूचे जबर योगदान आहे, कोणतीही प्रात्याक्षिके व स्वानुभव शेअर न करता. त्याचे मनापासून आभार! प्रत्येक स्टेज चे टोन्स त्याने रेकॉर्ड करून द्यावे ही विनंती!)