Pages

Sunday 17 September 2017

आजी...


काल माझ्या "बाळू आजीला" जाऊन ८ वर्ष झाली... नलू आजीला(आजीची बहिण) जाऊनही पण आता ५ वर्ष होतील..हे माझे घरातले दोन "बॉस". अत्यंत लाड करणाऱ्या अशा माझ्या आज्या...

दोघींच्या प्रचंड खोड्या काढायचो.. त्या हसत हसत सहन करायच्या... त्यांच्या पिशव्यांमधून आणि कपाटातून वेफर्स, चॉकलेट, गोळ्या कायम भरलेल्या असायच्या. दोघींची कपाटं उघडून त्यात लपवलेल्या या गोष्टी शोधायला मला अगदी आत्ताआत्तापर्यंत त्या असेपर्यंत अगदी मनापासून मजा यायची. चष्मा शोधून देणे, टाईमपास आणि मनोरंजन मधी कोडी सोडवायला मदत करणे, कॉम्प्यूटर वर गेम खेळायला शिकवणे, आणि तासंतास गप्पा मारत बसणे अशा कितीतरी आठवणी आत्ता डोळ्यासमोर येत आहेत.

गेल्या ५ वर्षात एवढं काही मिळालंय, पण ते बघायला माझ्या दोनीही "बॉसेस" आज नाहीयेत. अनेक लोकांकडून शाबासक्या मिळवल्या, पण काही चांगलं केलं, की नलू आजीनी आणलेली बर्फी, खारे दाण्याची पुडी आणि रावळगावच्या गोळ्या आणि बाळू आजीनी आणलेला श्रीखंडाचा डबा हल्ली शोधूनही सापडत नाही.. आज्यांची कपाटं अजूनही भरलेली आहेत, पण त्यात चॉकलेट दिसत नाही..
खालच्या मजल्यावरच्या बिछान्वयांवर आजकाल कोणीच नसतं. उबदार लोकरीची पांघरुणं माळ्यावर धूळ खात पडलीयेत. दुपारी साडे ३ ला घरी असलो तर तेव्हा सवयीप्रमाणे पाय आपसूक त्या खोलीकडे वळतात... पण गुदगुल्या करून उठवायला, पांघरुणाखाली पायच नाहीयेत, आणि झोपमोड झाल्यामुळे "गाढवा" म्हणत पाठीत धपाटा घालणारे हात पण नाहीयेत..

आता उरल्या आहेत फक्त  पाणावलेल्या डोळ्यांसमोर तरळणाऱ्या आठवणी आणि भिंतीवर शून्यात बघत बसलेल्या दोन तसबिरी...
बाळू आजी "बॉस" (सुमती दातार)
नलू आजी "बॉस" (डॉ. नलिनी देवधर)