Pages

Saturday 15 August 2015

विश्वास जिवंत ठेवणे!

अंधारलेल्या कॉन्फरन्स रूम मध्ये लॅपटॉपच्या मिणमिणत्या प्रकाशात क्लायंटचा शाब्दिक मार खाऊन पार्थ चिंतेत बसला  होता. क्लायंटला त्याचं प्रपोसल अजिबात आवडलं नव्हतं, आणि त्याने ते बोलून दाखवलं होतं. कंपनीमधली संपूर्ण मॅनेजमेंट हादरली होती. आता प्रश्न कंपनीच्या सर्व्हायवलचा होता. फक्त दोन दिवसांची डेडलाईन देऊन पुढच्या ५ वर्षांसाठीचा संपूर्ण प्रोडक्ट लाइफसायकल प्लान बनवून क्लायंटला प्रेसेंटे करायच्या होता. त्याच्या कपॅसिटीवर लावलेले आरोप, पार्थला पचेनासे होत होते. अखेर धीर खचलाच. “प्रोफेशनल लाइफमध्ये इतक्या कमी वेळात इतकं मोठं काम- जोक वाटला का यांना?. हतबद्ध आणि बधीर झालेला पार्थ गेल्या १५ वर्षात जामावलेले स्कीलसेट्स, टूल्स त्यागून सर्व सर्व सोडून द्यायचा विचार करत होता. इतक्यात रूमचं दार उघडून, एक व्यक्ती आत सरकली. “पंत!”. ५ मिनिटं पंत काहीच बोलले नाहीत, फक्त पार्थकडे पहात उभे राहिले. रडवेला झालेला पार्थ कपाळावरच्या सर्व आठ्या एकत्र करून पराभूत नजरेने लॅपटॉपकडे तंद्री लाऊन “आता काय, आता काय?” पुटपुटत होता. यातच, अचानक, त्याच्या खांद्यावर पंत आधाराचा हात टाकतात आणि म्हणतात,

पंत: “पार्था, तू फार चिंतेत दिसत आहात. काही अडचण आहे का...का काही धर्मसंकट ओढवून घेतलं आहेस? एवढा चेहरा टाकून काय बसलायस?”
पार्थ: “काय सांगू पंत! काय सांगू! आयुष्य अश्या एका टप्प्यावर येऊन थांबलंय की दुसरा काही मार्गाच दिसत नाही. प्रचंड मोठे रणकंदन दिसते आहे. फार फार बिकट युद्ध. पंत! हात ढिले पडले आहेत. मन थकलंय. काय करू तेच कळत नाहीये!”
पंत: “पार्था, माला तुझ्या चेहऱ्यावर जे दिसतंय ती भीती आहे? छे! अजून आयुष्यातल्या सर्वात मोठ्या रणाला सुरवात देखील झाली नाही आणि तू असा डळमळतो आहेस, घाबरतो आहेस? स्वतःवर, स्वतःच्या कर्तुत्वावर, कुवतीवर विश्वास असुदे पार्था...”
पार्थ: “विश्वास? पंत इतके वर्ष इतकी खंबीर धरलेली समशेर निसटत आहे. झुंजायची ताकद नाहीये. आणि झुंजलो तरी पराभवाशिवाय काहीच दिसत नाहीये, पंत! तुम्हीच सांगा विश्वास कसा ठेऊ? आपल्या फिल्ड मध्ये या प्रकारचा पराक्रम आजतागायत कोणीही केला नाहीये. त्या पराक्रमाची स्वप्न देखील धूसर आहेत पंत! होय पंत... होय!! मला भीती वाटते आहे! घाबरलो आहे मी! आत्ता पर्यंत अनेक अडचणींना सामोरा गेलो आहे, पण... पंत!! ही लढाई साधीसुधी नाहीये! या वेळी प्रेशर फारच जास्त आहे. नाही पंत नाही, ही लढाई नाही. आता हा आयुष्याचा प्रश्न आझाला हे, आणि त्याचे पानिपत करायचे नाहीये.... कसं सांगू तुम्हाला?”
पंत: “मला ठाऊक आहे तुला काय वाटत आहे ते. कधीकाळी यशाची शिडी चढताना मी देखील याच संकटांमध्ये अडकलो होतो. यावर मात केली म्हणूनच आज “पंत” बनू शकलो. एक्स्पीरियंस मॅटर्स पार्था. म्हणूनच म्हणतोय...आयुष्याचे पानिपत होऊ द्यायचे नसल्यास विश्वास कायम जिवंत ठेवला पाहिजे.’”
पार्थ: “पण पंत, अशा परिस्थितीत विश्वास ठेऊन करणार तरी काय?”
पंत: “पार्था, जगात विश्वास सर्वात थोर. त्याची थोरवी आणि पराक्रम दहादिशांत बहुचर्चित. विश्वास जिवंत ठेव पार्था, आणि रिझल्ट्स बघ... विश्वास  छोटा असला म्हणून काय झालं, तो जागता असणं महत्त्वाचं! आरे, आशेची ज्योत तेवत ठेवतो हा.”
पार्थ: “पंत, आमचा विश्वास याक्षणी तसा नाजूकच आहे. हाय प्रेशर सिच्युएशनमध्ये तो तग धरणार नाही...त्याला जिवंत कसा ठेवणार?”
पंत: “पार्था विश्वास सदशिवाच्या नजरेत असला, तर तो कोमेजून कसा जाईल?”
पार्थ: “पंत! कळालं आता! विश्वास जिवंत ठेवायचा असले, तर तो सदशिवाकडे सुपूर्त करावा! हे इतकं सोपं आहे?”     
पंत: “नाही पार्था, घाई करतो आहेस...सदाशिवाचे विश्वासावर फार फार प्रेम असले, तरी तो त्याच्या बाबतीत तसा हळवाच आहे. विश्वास पूर्णपणे त्यास सुपूर्त केला आणि नंतर तिकडून काढून घेतला, किंवा नाहीसा झाला, तर सदाशिव हळहळेल. एरवी शांत चित्त असणारा तो काळजीने ढवळून निघेल. विश्वासाच्या शोधात सदाशिव भूलोकात उतरला, तर तुझ्या लढाईचे प्रलयात रुपांतर होईल पार्था.. आणि प्रलय कोणासाठीच चांगला नाही.”
पार्थ: “पंत! मला काही कळत नाहीये! आत्ता तुम्हीच तर म्हणालात ना, विश्वासला सदशिवाकडे ठेवावे?”
पंत: “सदशिवाच्या नजरेत असावे पार्था, नजरेत. त्याच्या स्वाधीन करावे नाही म्हणालोय. यु शुड नेवर कीप ऑल युअर एग्ज इन वन बास्केट. सदाशिवाची मदत घेतली, म्हणजे इतर कोणाची नाही घ्यायची असं बिलकुल नाहीये. निळी फुले वाहून राऊपुत्र कृष्णास बोलवावे. तोच खरा समशेरबहाद्दर आहे. त्याची जरब सर्वत्र! सोबत दत्तात्रय आहेच. आणि अगदीच वाटलं, तर इब्राहीमास देखील साकडं घाल! समटाईम्स इट्स बेटर टू गो ऑल गन्स ब्लेझिंग... संताचे काळीज वाघाचे आहे. त्या वाघांना तुझ्यात ललकारायला शिकव. चिंतन कर. या सार्यांचं स्मरण कर. ही सगळी भूतं एकत्र आली, तर विश्वासाला धक्का लागूच शकत नाही!”
पार्थ: “समजलं पंत! समजलं! विश्वास जिवंत ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं! पटलंय! पण पंत, प्रश्न पडलाच आहे म्हणून विचारतो, चुकून, अगदी चुकून जर आपल्या विश्वासाला तडा जाऊन तो नाहीसा झाला, तर काय करावं पंत? म्हणजे ववर्स्ट केस सिनारियो कसा हँडल करावा?”
पंत: “पार्था, विश्वास नाहीसा झाला, की माधवाला शरण जाण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नाही”
पार्थ: “माधव? सिरीयसली? माधव? पंत काही पण काय बोलता! आहो, कंपनीतल्या सर्व दिगाज्जांमध्ये माधव सगळ्यात ज्युनियर नाही का?”
पंत: “ज्युनियर खरा, पण मी सांगतो पार्था, फ्युचर तोच आहे. उद्या समजा तुझा विश्वास उडाला...तर तुझी हार अटळ आहे. तुझी हार ही आपल्या सर्व ना ना साहेबांची हार. त्यामुळे तुझ्या विश्वासाची गच्छंती फिक्स असेल, तर त्यांची गच्छंती देखील फिक्स्ड आहे. आणि सर्व साहेबांची गच्छंती म्हणजे सूत्र आणि श्रद्धा अर्थात माधवाकडे!”
पार्थ: “म्हणजे पंत, पुढची वाटचाल पाहता, आत्ता आपली श्रद्धा माधवात इन्वेस्ट करणे योग्य ठरेल?”
पंत: “पार्था, माधवात पूर्णपणे श्रद्धा गुंतवणं योग्य ठरणार नाही. तो हुशा आहे यात काही वादच नाही, पण तो रममाण आहे. तो तुला योग्य मार्ग दाखवेल यात देखील काही वाद नाही. या भुवनात एखादी राक्षसी क्लायंट मिटिंग सक्सेस्फुली नॅविगेट देखील करेल. माधव खूप महत्वाचा ठरू शकेल पार्था, पण लक्षात ठेव, तो कितीही मोठा झाला तरी तो अ-क्षय नाही.”
पार्थ: “पंत काय बोलत आहात? मला समजलं नाही”
पंत: “रघुनाथाची कृपा पार्था... रघुनाथाची कृपा. तो कधीनाकधीतरी सर्वांचीच परीक्षा घेतो.”
पार्थ: “पण पंत, माधव ही परीक्षा नक्की पूर्ण करू शकेल! आय मीन ही इज इंडीड व्हेरी टॅलंटेड! अँड व्हेरी डिप्लोमॅटिक. ही कॅन इझिली ओव्हरकम दिस! आणि पंत, तुम्हीच तर एकदा म्हणाला होता..’रघुनाथाय नाथाय...रमाया पतये नमः!’”
पंत: “पार्था, रघुनाथाला कधीही अंडरएस्टिमेट करू नकोस. माधवीकाव्याचं पेटंट आहे त्याच्याकडे. तो काहीही करू शकतो. त्यात रघुनाथ आनंदी असेल तर विचारूच नकोस! ऑफिसातले सुखात्मे आणि तत्सम गर्दी बरोबर घेऊन कोणाला कधी, कसा, आणि काय काय घेऊन गिळंकृत करेल ते सांगणं अवघड आहे!”
पार्थ: “देवा नारायणा!! हा काय प्रकार ऐकतो आहे मी!”
पंत: “एक्झॅक्टली. बरोबर ओळखलंस”
पार्थ: “पण... पण पंत, हे कायदेशीर दृष्ट्या बरोबर नाही. केस-खटला काही झालं, की तो लगेच अटकेत, नाही का?”
पंत: “पार्था, रघुनाथाला अटकेत जायला कोर्टाची गरज नाही. त्याच्यात स्वतःहून तिथे जाण्याचं सामर्थ्य आहे!”
पार्थ: “म्हणजे पंत, तुम्हाला नक्की म्हणायचं आहे...”
पंत: “पार्था, रघुनाथाविरुद्ध‘रामो “राजमणी” सदा विजयते’, हे कितीही सत्य असलं तरी तू रघुनाथाला इतका साधासुधा समजू नकोस. त्याच्यात अटकेत जायचे गट्स आहेत कारण त्याचबरोबर अटकेपार जायची व्हिजन आणि हंगर पण आहे.”
पार्थ: “पंत! दिस इज डेंजरस! आय सी ओन्ली डार्क डेज इन टर्म्स ऑफ बिझनेस इफ सच थिंग्स हॅपन! जरका आपली पॉलिसी अशीच सुरु राहिली, तर एकही क्लायंट येणार नाही!”
पंत: “पार्था, निराश होऊ नकोस. इतकी शॉर्टटर्म व्हिजन नाहीये माझी. प्रत्येक रात्रीनंतर एक भानु उदयाला येतोच- आणि तो सर्व समस्यांवर प्रकाश पाडतोच. आणि त्या भानुला इतर अकरा आदित्यांची साथ लाभली, तर हे बारा प्रखर सूर्य कोणताही प्रोजेक्ट आरामात करू शकतील.”
पार्थ: “पंत, तुम्ही तर साक्षात देवेंद्रालाच आणायचं म्हणताय!”
पंत: “बरोबर पार्था, बरोबर!”
पार्थ: “पण पंत, त्याचा अस्त अपेक्षेपेक्षा लवकर झाला तर काय?”
पंत: “सूर्यास्तानंतर कायमच अंधार होतो पार्था!”
पार्थ: “नाही पंत नाही, ऑलरेडी खूप अंधाराचे दिवस बघितले आहेत. अजून अंधाराचे दिवस नको आहेत!”
पंत: “म्हणूनच म्हणतोय पार्था, विश्वास जिवंत ठेव!”


एवढं म्हणून पंत पर्थच्या खांद्यावर दोन वेळा थोपटतात आणि शांतपणे निघून जातात. पार्थच्या मनातला आधी मरगळलेला स्वतःवरचा  (आत्म)विश्वास जागा झालेला असतो. आयुष्याचे एक मोठे पानिपत व्हायचे टळते. पार्थ सहज मागे वळून बघतो, पंताची पाठमोरी आकृती ऑफिसातून कायमची बाहेर जाताना दिसते. 

(** यातले बरेचसे "डायलॉग्ज" उमा आणि सुमेध बरोबर बनवले आहेत. बरचसं श्रेय त्यांनाच!)