Pages

Sunday 31 March 2013

मौनाची संभाषणे.

शांतता नाहीशी झालीये. सापडतंच नाहीये कुठे. किती ठिकाणी शोधलं तिला. कुठे हरवलीये देव जाणे. ओरिसात गेलो होतो, तेव्हा गंगासागराच्या किनारी तिने मला दर्शन दिलं होतं. पण नंतर कायमची तहान लाऊन स्वतः नाहीशी झाली. कुठे गेली, कधी गेली, का गेली माहिती नाही. अधूनमधून अथक प्रयत्न करून काही क्षणांसाठी दिसते. पण त्या रात्री ज्या सहजतेने ती प्रकटली, ती रात्र कधीच विसरू शकणार नाही.

पुरीला श्री जगन्नाथाचे दर्शन घेऊन पुरीजवळच्याच डी.आर.डी.ओच्या गेस्ट हाउसमध्ये उतरलो होतो. पुरीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पण कोणजाणे का, मंदिरात प्रसन्नता नाही वाटली. नारळाचा चढवलेला प्रसाद आणि तो फोडून नारळाच्या पाण्यामुळे चिकट झालेली फारशी व अनेक वर्ष चालत आलेल्या या प्रथेमुळे आधीच बंदिस्त आणि त्यातून नासक्या नारळाचा वास अशा त्या मंदिरात जीव गुदमरत होता. भक्तीच्या ठिकाणी माणसांचा समुद्र उतरला की अशीच अवस्था होते. कोण जाणे आपले देव तिथे कसे राहतात! 

जगन्नाथाचे दर्शन आटोपून गेस्ट हाऊसला गेलो. तिथे जवळंच एक छोटेसे मंदिर होते. तिकडच्या ग्रामदैवतेचे असावे. अगदी छोटेसे होते.समुद्र किनारी.त्या देवीचे धड नावही आठवत नाहीये. सहज विचार आला, की बघून यावे हे मंदिर. रात्री उशीर झाला होता. वेळ पण आठवत नाहीये. ओरीसामाधील आडवाटेवर- खेडेगावात पण नाही. बाहेर वीज नाही. फक्त काळोख आणि काळोखावर प्रकाश टाकणाऱ्या लक्षावधी तारका. तसाच चालत चालत बाहेर पडलो. देवळापाशी आलो. देवळात पूर्णतः अंधार होता. फक्त देवापुढचा एक दिवा पेटला होता. त्याच्या लुकलुकत्या प्रकाशात काय थोडाफार तो उजेड गाभाऱ्यात पडला होता. मंदिराला लागुनच समुद्रकिनारा होता. समुद्राच्या लाटा अगदी देवळाच्या कडेला आदळत असाव्या. त्या आडवाटेवरच्या मंदिरात मी ज्या वेळी गेलो, तेव्हा तिथे कोणीही नव्हते. काहीही नव्हते. बाहेर बसून स्वच्छ आकाशातला एक एक तारा मोजायची इच्छा होती. वारा होता-अगदी मंद गतीने वाहणारा चोर पावलांनी येऊन पानांची सळसळही न करता हवेत गारवा ओतत. मी, तो देवापुढचा छोटासा दिवा, तो वारा, समुद्र आणि ते आकाश व्यापणारं तारांगण कधी एकमेकांशी संवाद साधू लागलो, ते कळालंच नाही. 

ईश्वराच्या या रूपांशी बोलायला वाणीची गरज नाही. इंद्रिये जागी झाली, की संवाद साधायला मौन पुरेसे आहे.  तोंडातून एक शब्द ना बाहेर पडत होता की स्वतःच्या मनात उलटा पडत होता. कसलाही विचार करून त्या मुक्या संभाषणाला तडा जाऊ शकेल असे काहीही करायची इच्छा नव्हती. भोवती कोण आहे याचे भान नाही. भान होते ते फक्त मौनातून होणाऱ्या संभाषणाचे.  या मौन संभाषणाचा विषय होता शांतता, जी आता माझ्याभोवती सगळीकडे पसरली होती-प्रसन्न. काळाला कोणीतरी विळख्यात अडकवले  होते, असेच वाटावे. तो पुढे सरकतोय याची चाहूल मात्र लावत होती वाऱ्याच्या तालावर नाचणारी ती दिव्याची ज्योत आणि तिला लयबद्ध करणारा लाटांचा खळखळाट.  कोणत्यातरी वेगळ्याच शक्तीने माझ्या मनाचा ताबा घेतला होता. सकारात्मक शक्ती. मनात एकही विचार नाही. फक्त आणि फक्त शांतता. इतकी शांतता की मंदिरातल्या घंटेवर वारा अलगद आपटल्यावर पण कानठळ्या बसत होत्या, आणि स्वतःच्या श्वासामुळे होणाऱ्या बारीक आवाजाने त्या शांततेला ओरखाडे येत होते. कितीवेळ माझे संभाषण सुरु होते, माहिती नाही, पण ज्या क्षणी ते संपले, त्याचबरोबर ती शांतता नाहीशी झाली. पिसाप्रमाणे वाऱ्यावर उडत अनंत आकाशाच्या शांततेला स्पर्श करणारे माझे मन दगडाचे वजन घेऊन मनुष्य लोकात कोसळले.

त्या नंतर अनेक ठिकाणी अनेक वेळा निसर्गाशी मुकी संभाषणे साधत ती शांतता शोधायचे असंख्य प्रयत्न झाले. तासंतास तानपुऱ्यावर झंकारणाऱ्या षडाजाची मदत, गड कोटांवर सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याची मदत. मुंबई सारख्या महानगरातल्या समुद्राची मदत, आणि स्वतःच्या देवघरातल्या पणतीची मदत. सगळं सगळं करून झालं. मनातले विचार मनात बोलके असताना, निसर्गाच्या मदतीने  ओरिसातल्या त्या मंदिरातल्या शांततेची फक्त झलक मिळाली. ती मात्र तिच्या पूर्ण स्वरूपात कधीही मिळाली नाही. अर्थात साथ नव्हती ती अंतर्गत शांततेची. पाण्याने तहानलेल्याला जसे पाण्याचेच भास होतात, तसेच शांततेला शोधणाऱ्याला सगळीकडे, मुख्यतः स्वतःत शांततेचे भास होतात. स्वतःत शांतता जरी आणली, तरी ती शांतता मिळणं अवघडच, कारण साथ इथे साथ नाही ती त्या नाव विसरलेल्या शक्तीची. त्या जगदंबेच्या रूपाची, जिने या शांततेच्या स्वरूपात खर्या अर्थी  आपले देवपण सिद्ध केले.