Pages

Monday, 21 January 2013

जुगलबंदी

बरेचदा लिहायला बसलो, की काय लिहू असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. विषय अनेक असतात, पण एखाद्या विषयावर लिहायला त्याबद्दल थोडंसं वाचन व ती लिहायची इच्छा व्हावी लागते. अनेक वेळा इच्छा होते- पण काही सुचत नाही. न सुचत केलेल्या लिखाणात कुठेही फ्लो दिसून येत नाही.(माझ्या तरी लिखाणात). माझं कसं आहे- मी डोक्यानी विचार करून जेवढं लिहितो, तेवढाच हृदयातून लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आज अमुक इ विषयावर लिहायचेच आहे असं ठरवून बसलो, तरी लिखाण केलं जात नाही. काल असाच एक दिवस. रविवार ची सुट्टी असल्या कारणाने सकाळपासून कोणत्यातरी विषयावर लिहिण्यासाठी शोधाशोध सुरु होती. पण काहीच अपील झालं नाही. तशा लिहायला अनेक गोष्टी आहेत. २७ वर्षांचा रणसंग्राम याचे ३ भागच लिहून झालेत. अजून ६ लिहायचे आहेत- पण ते म्हणलो तसं- त्या मूड मध्ये शिरल्याशिवाय लिखाणात त्याचा इफेक्ट उतरत नाही. काल ऐतिहासिक मूड मध्ये डोकावणं झालं नाही, आणि २७ वर्षाचं युद्ध राहून गेलं( लवकरच लिहीन)

काय लिहावं असा विचार सुरु असतानाच रात्री अलोक मेहता या माझ्या मित्राने मी काढलेल्या एका फोटो चे पेंटिंग करायला घेतल्याचा फोटो काढून मला पाठवला- म्हणलं, तसंही काही लिहून झालं नाहीये, सकाळी यावरच थोडं फार लिहू. मी आणि अलोक कॉलेज मध्ये एकत्र होतो.(अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे.- CoEP) कॉलेज पासूनच इतर गोष्टी करायची भयानक आवड. अनेक छंद. त्यातून मी म्हणलो, म्हणजे आहे नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये हात घालून पाहणार आपल्याला जमतंय का. त्यातच फोटोग्राफीचे विश्व. देवाच्या कृपेने, आणि अर्थात मुंबईमधल्या माझ्या काही दिग्गज मित्र-मैत्रिणी यांच्यामुळे यात बरेच काही शिकायला मिळाले. सध्या जरा बरे फोटो काढतो. अगदीच pubish वगैरे होतील इतपत नाही, पण मनाला समाधान मिळते इतपत बरे तरी असतात! माझ्या काही निवडक फोटोंची अलोक ने पेंटिंग्ज बनवली आहेत. फेसबुक वर "जुगलबंदी" या अल्बम मध्ये ती टाकण्यात आली आहेत- तीच आता इथे टाकतो आहे.

आत्तापर्यंत एकूण ८ जुगल्बंद्या झाल्या आहेत. जुगलबंदी ही concept सुरु करून वर्ष पूर्ण होईल. मेहताच्या उत्कृष्ट पेंटींग्जमुळे फोटो काढताना "हा फोटो जुगलबंदीसाठी चांगला काढला पाहिजे" असं एक चांगलं प्रेशर येतं. असो, जास्ती न लिहिता आता जुगलबंदीचे फोटो आणि त्याबद्दल थोडी माहिती.

जुगलबंदी १- पुलाऊ उबिन या बेटावर फिरायला गेलो होतो. तिथे एका तळ्यात वाळलेल्या झाडाचे सुंदर प्रतिबिंब होते. बाजूला सर्व हिरवं होतं आणि पाणी तर निळ्या रंगाच्या फारच सुंदर छटेचं होतं. फोटो काढला. चांगला आला- अलोक ने इंक(शाई) वापरून याचे पेंटिंग बनवले आहे.


जुगलबंदी २- अभियांत्रिकी महाविद्यालयाचे Mechanical Department. कॉलेज संपल्यावर मुंबईमध्ये असताना कॉलेजला एकदा भेट दिली, तेव्हा काढलेले छयचित्र. जुन्या शैलीचे बांधकाम. पेंटिंग १५ मिनिटात जेल पेन्स वापरून बनवले आहे.



जुगलबंदी ३- पश्चिमेच्या वाक्षाकाडील बाणाकृतीतील बगळे. हा फोटो खरं तर माझ्या बहिणींनी- अनुश्रीने काढला आहे. मी त्या फोटोचं बरंच एडिटिंग केलं होतं. घराच्या बाल्कनी मधून काढलेला फोटो आहे, ज्यात सूर्यास्ताच्या वेळी घरटी परत निघालेल्या बगळ्यांचा एक थवा आहे.



जुगलबंदी ४- गवताचे पाते. हे जरी गावात वाटलं नाही, तरी हा एक गवताचाच प्रकार आहे. घरी elephant grass ज्याला म्हणतात ते आहे. सूर्यास्ताच्या वेळी त्याचे टिपलेले एक छायाचित्र फारच आवडलं होतं. सावल्या आणि silhouette सुंदर दिसत होतं. त्याचंच बनवलेलं पेंटिंग.





जुगलबंदी ५- आहट. जवळपास पूर्ण चंद्र होता, आणि तो एका झाडामागून लपंडाव खेळत होता. चंद्रप्रकाशात झाडांच्या फांद्या पाहून लहानपणीच्या कथांमध्ये असलेल्या चेटकीणीच्या बोटांची आठवण झाली म्हणून तो फोटो काढला होता. जरा आहट इफेक्ट होता.





जुगलबंदी ६- केरळा टी इस्टेट. मुन्नार ला फिरायला गेलो होतो तेव्हा काढलेला फोटो. सूर्य नुकताच मावळला होता. चालायला बाहेर पडलो होतो. समोरच्या डोंगरावर चहा लावला होता. आणि चहा साठी व्यवस्थित पाणी पुरवठा होईल, या करता सिल्व्हर ओक या झाडाची एक रांग होती. केरळात मुन्नारच्या जवळ हे नेहमी दिसणारं दृश्य. ३ रंग वापरून याचे पेंटिंग करण्यात आले आहे.




जुगलबंदी ७- ते एकंच झाड. हा फोटो पण घरीच काढला आहे. घरातून मागच्या बाजूला पहिला गेलो, के एकंच झाड दिसतं, ज्याला कधीच पालवी नसते. किंवा असली तरी अगदीच कमी असते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी त्याचे काढलेले छायाचित्र व त्याचे बनवलेले पेंटिंग.



जुगलबंदी ८- जैसलमेरच्या वाळवांटात. नुकताच राजस्थान फिरून आलो. जैसलमेर जवळ सम नावाच्या गावन sand dunes आहेत. तिथे उंटावर बसून गेलो होतो. सूर्यास्त पाहून परतताना काढलेलं हे छायाचित्र. पूर्वी caravan आली असं कथांमधून, गोष्टींमधून वाचलं होतं, तेच जणू डोळ्यांनी पाहिलं असा फोटो, ज्याचं फारच उत्तम पेंटिंग बनवण्यात आले आले.




असो. आज बास करतो. कामाला जायचे आहे. तुम्हाला मी काढलेले काही फोटो पहायचे असतील तर इथे क्लिक करा.

अलोक मेहता याने बनवलेले पेंटींग्ज पहायचे असतील तर इथे क्लिक करा. (मेहता पेंटींग्ज विकतो पण. त्यासाठी त्याला फेसबुकवर संपर्क करणे.)

Wednesday, 2 January 2013

शेंबूड

(जरा घाण बोलायची(लिहायची) हुक्की आलीये.. २७ वर्षाचे युद्ध नंतर लिहीन!)

निसर्गात काही द्रव्य अशी आहेत की त्याचे गुणधर्म जाणून घेता घेता नाकीनौ येते. ही द्रव्य केव्हा कधी कशी वागतील याचा काही भरवसा नाही. शाळेत या हातावर मोजण्याजोग्या लिस्ट मधून २ गोष्टी अगदी उत्साहाने शिकवल्या जातात- पाणी आणि पारा. पाणी खरंच विचित्र आहे. ३ का ४ डिग्री सेल्सियसला त्याचे “ anomalous expansion” होते असं शाळेत असताना वाचलं होतं. याला मराठीत नक्की काय म्हणतात याची मला काडीमात्रही जाण नाहीये- कदाचित विक्षिप्त विस्तारीकरण म्हणत असावे. पण याचकारणामुळे थंडीमध्ये पाण्याचे पाइप फुटतात.(शाळेत शास्त्रीय करणे द्या मध्ये हा प्रश्न दर वेळी यायचा, म्हणून घोकला होता.. अजून पाठ आहे!). पारा हा अजून एक बुचकळ्यात टाकणारा पदार्थ आहे. तो लिक्विड का आहे याचे कारण बहुदा ११वि का १२वि मध्ये होते. पण टवाळक्या करण्यात अर्ध लक्ष असल्यामुळे आता ते जे काय कारण आहे ते आठवत नाहीये. पण पारा हा एक metal असून तो निसर्गतः लिक्विड स्टेट मध्ये असतो हे फारच इंटरेस्टिंग वाटते.

अशाच या लिस्ट वर अजून एक निसर्गतः आढळणारे, पण शाळा कॉलेजच्या अभ्यासक्रमात ज्यावर बहिष्कार टाकण्यात आलाय असे द्रव्य म्हणजे "शेंबूड". शेंबूड खरोखर एक विचित्र आणि जगावेगळेच द्रव्य आहे. आमचे मित्रवर्य आदित्य गुप्ते यांचा मते "शेंबूड हा सर्व पदार्थात अस्तित्वात असून दाठरलेली नाकाची पुडी ते हॉटेलात मिळणारे दाट corn soup- यात सगळीकडे शेंबूडच भरलेला असतो!". शेंबडाचे गुणधर्म जाणून घेणं म्हणजे एक शापच आहे. हा कधी कोणत्या अवस्थेत सापडेल याची काहीही खात्री नसते. आमच्या इंजिनियर्सच्या भाषेत सांगायचं झालं तर याला कोणताही  parameter constant करून quantify करणे शक्यच नाही. एकतर त्याचं असणं हेच इतक्या parameters वर अवलंबून आहे, की त्याची यादी करण्यातच एखाद्याला पीएच.डी करता येईल!

शेंबडाच्या physical properties तर विचित्रच आहेत. त्यातील मला कधीही न कळालेल्या दोन पुढे दिल्या आहेत. शक्यतो सगळ्या लिक्विड्सना एक ठराविक viscosity असते. त्यावरून ते किती पटपट वाहू शकेल याचे तर्क बांधता येतात. शेंबूड variable viscous substance म्हणून खपवण्यात काहीच अडचण येणार नाही. कधी कधी तो इतका कमी viscous असतो की काहीही न करता तो स्वतःहून नाकातून टपकायला लागतो, आणि कधी कधी इतका जास्त viscous असतो की एक नाकपुडी बंद करून बेसिन समोर उभं राहून रामदेव बाबांचं कपालभाती-अनुलोमविलोम प्राणायाम केल्याशिवाय तो नाकातून बाहेर पडायचं नाव घेत नाही. काळ, वेळ, प्रहर, गरमी, थंडी या कोणत्याही गोष्टीवर याचा फ्लो अवलंबून नाही त्यामुळे त्याची viscosity नक्की कशाचे function आहे हेच कळत नाही. तो कधी कोणत्या temperature ला कसा वागेल हे सांगता येत नाही- स्वतःजवळ खिशात एखादा स्वच्छ रुमाल ठेवणे हाच काय त्याचावरचा एक तोडगा!

Viscosity सोडा तो फारच पुढचा आणि शास्त्रोक्त मुद्दा आहे. या  शेम्बडाच्या रंगातपण काहीही consistency नाही. माणसामाणसातला फरक सोडा, स्वतःच्या शेंबडातच इतके variations असतात, की तो Darwin पण  variations एक उत्क्रांती मधील गोष्ट नसून रसायनशास्त्रातील प्रोसेस आहे असे समजून नाकात बोट घालून   chromatography करायला भाग पडेल! Clear Transparent, translucent पासून yellowish-green या रंगांमध्ये जेवढ्या विविध छटा आहेत त्या सगळ्या शेंबडाला लागू आहेत. मी माझ्या स्वतःच्याच नाकातून इतक्या वेगवेगळ्या रंगाच्या छटा बाहेर काढल्या आहेत की त्या एखाद्या झाडाला फुटलेल्या नव्या पालवीला देखील लाजवतील. मात्र एक गोष्ट पाहण्यात आली आहे. शेंबडाच्या viscosityचा आणि रंगाचा काहीतरी संबंध  आहे. जेव्हा त्याची viscosity कमी असते, तेव्हा तो शक्यतो colourless असतो. जेव्हा तो खूप जास्त viscous असतो तेव्हा हिरवट छटा धारण करतो. शेंबूड खरोखर एक सरडारूपी द्रौव्य आहे- बाजूचे parameters बघून तो स्वतःचे गुणधर्म स्वतःच ठरवतो! पाण्याला निसर्गतः काहीही चव नसते. शेंबूड मात्र एकजात खारट पदार्थ आहे, हे मी स्वअनुभवावरून सांगतो, आणि त्यामुळे त्याच्या सरडेपणात थोडंफार का होईना एक स्थैर्य येतं!

शेंबडाची directional sense तर भल्याभल्यांना लाजवील. तो कधी कोणत्या नाकपुडीतून बाहेर येतो याची धड खात्री नसते. त्याच्या अस्तित्वाने वैतागून ५ मिनिटे नाक शिंकरून एक नाकपुडी साफ केली की तो पाचव्या मिनिटाला दुसरी नाकपुडी तुंबवून ठेवतो. असो.. असते एकेका गोष्टीची किमया. कायेना शेंबडाचे कितीही वर्णन केले, उपयोग सांगितले,कौतुक केले तरी त्याला गलिच्छ category मधे उगाच ढकलण्यात आलंय. खरंतर तसं होऊ नये. पहा ना- शेंबूड असला की आपोआप कपालभाती-अनुलोमविलोम प्राणायाम केले जाते. त्या निमित्ताने व्यायाम होतो! नाकात शेंबूड असला म्हणजे दिवसातून कमीतकमी ३० मिनिटे तुम्ही प्राणायाम करताच! काय म्हणणार ना आता! भल्याभल्यांना स्वतःच्याच नाकात बोट घालून स्वतःचेच नाक लाल करायला प्रवृत्त करणाऱ्या त्या शेंबडाची धन्यता लोकांना कळली पाहिजे. बर बाकी सगळं जाऊदे, निदान शेंबडाडला बेभरवशाच्या “ anomalous liquids” या यादीमधले मनाचे अग्रस्थान स्थान तरी मिळालेच पाहिजे आणि त्याबद्दल बोलणे म्हणजे अचरटपणा नसून शास्त्रोक्त विचार मानले पाहिजे एवढीच इच्छा आहे...

असो...