आमचे काही मित्र आहेत, जे कोणत्याही सणासुदीनिमित्ताने, विशेषतः नाताळानिमित्ताने चेकाळून सकाळपासून रात्रीपर्यंत तीर्थप्राशन करतात. एकीकडे आपल्या टकलावरची अदृश्य शेंडी कुरवाळत व गळ्यातून हरवलेलं जानवं आणि नसलेल्या तुळशीच्या माळा मिरवत इतर लोकांची अनेक कृत्य कशी धर्माला तडा घालणारी व धर्मसंकट ओढवणारी आहेत यावर भरपूर भाष्य करत लोकांनी कसे वागले पाहिजे याचे धडे देत असतात, तर दुसरीकडे "आम्ही किती पुरोगामी आणि वेस्टर्न" म्हणत आधी मिरवलेले विचार वाळीत टाकून तोच धर्म व तीच तत्त्व भ्रष्ट करताना एक सूत सोडत नाहीत. दारूच्या नशेत झिंगत असताना हरीनामाचे धाक दाखवणारे हे आमचे (वैचारिकदृष्ट्या) दिवाळखोर आणि दाखवायचे आणि खायचे(माफ करा-प्यायचे) दात वेगळे असणारे मित्र असेच एकदा नाताळाच्या दिवशी जगाचा ताल विसरून व लय हरवून मुळशीतल्या एका "फार्महाऊस" वर पडले होते. त्यांना मनात ठेऊन हा एक विडंबन अभंग लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
सुरेवीण होई कसा दिसारंभ,
आचमनी गिळे घोट पहिला॥
कीर्तनी हो वाचे, सुरेचे पुराण
मुखी रामनाम, ढोसताना॥
मुखी रामनाम, ढोसताना॥
तीर्थासह घेई चार पळी त्याचे
देवापुढे दिवे, लावताना॥
प्रसादास ठेवे चकण्याचे ताट,
पेल्याभोवती पाणी तीन वेळा॥
सुरेचेच सूर उठे त्रिभुवनी,
भजनात शिव्या, मुक्तकंठी॥
चिन्या म्हणे मूर्खा नको गाठू गत,
नाताळात झिंगलेल्या नाठाळाची॥
ज्यांना संबोधून लिहितो आहे, त्यांनी का लिहितोय हे समजावे, व जे या मार्गावर चालायच्या विचारात आहेत त्यांना सद्बुद्धी मिळो अशीच प्रार्थना करतो..