Pages

Sunday, 12 January 2014

केदार, मृण्मयी आणि मी.

मी आज जी गोष्ट सांगणार आहे, ती साधारण १२ वर्षांपूर्वी घडली होती- म्हणजेच मी शाळेत असताना. ही गोष्ट आहे २ मित्र आणि एका मैत्रीणीची. त्याकाळात आणि त्या वयात मुलं-मुली एकाच शाळेत शिकत असले तरी एकमेकांशी क्वचितच बोलत असत- किंबहुना वादाखेरीज मुला-मुलींमध्ये कोणत्याही प्रकारचं बोलणंच नसायचं. मोबाईल बिबाईल कोणाकडेच नव्हते, त्यामुळे मुलीशी बोलायचे असल्यास (कामासाठी देखील) तिच्या घरी फोन करायला लागायचा. हा फोन करताना जितकी भीती त्या मुलीशी बोलण्यात वाटायची, तेवढीच चिंता फोन उचलणाऱ्या तिच्या आई-वडिलांना आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी कान टवकारून बसलेल्या प्रौढांना काय कथा खपवायची याची लागलेली असायची. असे एका पेक्षा एक (महागुरू वाले नाही बरका... आम्ही शाळेत असताना महागुरू बालकलाकारच होते- नकली बालकलाकार नाही!).. तर असे एकापेक्षा एक दुर्गम प्रश्न आम्हा लोकांपुढे कायम उभे रहात. त्यातून जर फोन झालाच आणि चुकून तो मुलगा आणि ती मुलगी सोडून इतर कोणाला या गोष्टीची चुणुक जरी लागली, तर तिची आणि त्याची दुसऱ्या दिवशी वर्गात जोडी लागणार हे निश्चित. आता जिथे फोन करण्याचंच इतकं भय असेल, तिथे एखाद्या मुलीला शाळेबाहेर भेटायचा तर प्रश्नच उद्भवत नाही. तर अशा विचारात गुंतलेले २ मित्र जेव्हा त्यांच्या एका मैत्रिणीला भेटायला जातात त्या किस्स्याची ही गोष्ट आहे. यात प्रमुख भूमिकेत आहेत केदार बर्वे, मृण्मयी हुपरीकर आणि मी.

नुकतेच आम्ही सगळे आठव्या इयत्तेत आलो होतो. शाळेच्या युनिफॉर्म मध्ये आता अर्धी चड्डी जाऊन फुल पँट आली होती, टाय आला होता आणि या बंदिस्त अवस्थेत पूर्ण दिवस कसा काढायचा या विचारात आम्ही पडलो होतो. नुकत्याच मिशा फुटायला लागल्या होत्या, आणि "जोडी लागाओ" हा वर्गातला सगळ्यात आवडता खेळ झाला होता- त्यामुळे उगाच मोठे झाल्यासारखे वाटत होते. मुलं मुलींशी आता वर्गात आपणहून बोलायला लागली होती. सगळ्यांनाच शिंग फुटत होती, त्यामुळे वर्गात कायम कल्लोळ असे. या वयातल्या मुला-मुलींना "शिंग फुटली" का म्हणतात ते कळत नाही. पण "शिंग फुटणे" याचे इंग्रजी भाषांतर केल्यानंतर ते जाणून घ्यायची इछाच मेली. इंग्रजी भाषेचा हाच कमकुवतपणा आहे. "शिंग फुटणे" या सारख्या साध्या विधानाला पण भाषांतरानंतर पार अश्लील दर्जा देऊन जाते. त्यामुळे इतर भाषांमधले बारकावे भाषांतरीत न करू शकणारी ही एक दुबळी भाषा आहे का असा विचार मनाला चाटून जातो. असो..

वर्गात उसळणाऱ्या धुमाकुळात मी जातीने सक्रीय असे. अगदी खडू घेऊन मारामारी करणे ते वर्गात कोणी नसताना फळ्यावर, भिंतीवर वाट्टेल ते लिहून येणे इत्यादी इत्यादी अनेक उपद्व्याप. खोड्या काढण्यात, भांडणे पेटवण्यात, आग लावण्यात तर मी महागुरू पातळी गाठली होती. पण हे सगळे उपद्व्याप सांभाळून चांगला अभ्यास पण होत असे. अगदी पहिला नंबर जरी आला नाही तरी पाचात असायचो, त्यामुळे खोड्या काढल्या तरी त्याबद्दल जास्ती मार बसायचा नाही. (याचा फायदाच झाला) अनेक शिक्षकांनी अनेक प्रकारे माझ्या वाढत्या खोड्या कमी करण्याचे प्रयत्न केले(जे कायमच फसले). पुस्तक वाचून त्यावर रिपोर्ट द्यायचा हा यातलाच एक कट असावा असा माझा तेव्हापासूनचा अंदाज आहे. शक्यतो ज्यांना इंग्रजीत "सिन्सिअर" म्हणतात अशा काही निवडक लोकांना "स्कॉलॅस्टिक" या पुस्तक खपवणाऱ्या एका संस्थेची रटाळ पुस्तके वाचून त्यावर रिपोर्ट लिहून पुस्तकवाल्यांना पाठवायला लागायचा. या संकटात मी नेमका जाऊन अडकलो होतो. पण त्यात मी एकटाच नाही तर माझ्याबरोबर बर्वे आणि मृण्मयी देखील अडकले आहेत हे बघून मला अघोरी आनंद झाला होता म्हणायला हरकत नाही.

जुलै सुरु होता- शाळेचा पहिलाच महिना. सगळंच नवीन होतं- वर्ग, पुस्तकं, अभ्यास, युनिफॉर्म, जबाबदारी. यातच नवीन पुस्तक वाचन योजनेतली अनेक फालतू पुस्तके. आधी थोडी टाळाटाळ करून अखेर आम्ही वाचन योजनेतलं पहिलं पुस्तक वाचायला काढलं. नाव पण आठवत नाहीये आता त्याचं. ते घेतलं अन् दप्तरातच पडून राहिलं. रिपोर्ट द्यायच्या एक दिवस आधी मला आणि बर्वेशेठना आठवलं की पुस्तकच वाचलं नाहीये, लिहिणार काय! एकूणच लिहिण्याचे वांदे आहेत. त्यामुळे शाळेनंतर आम्ही काम करायला थेट केदारशेठच्या घरी जाऊन बसलो. 
केदारशेठ आणि मी, माझ्या घरी.

या आमच्या केदार बर्व्याचा केदार"शेठ" कसा झाला याची गोष्ट फारच मनोरंजक आहे. त्या काळात बर्व्यांनी गोव्याला आईस्क्रीमची फॅक्ट्री टाकली होती आणि शाळेतले सर्वजण त्याच्याकडून आईसक्रिम विकत घेत. गोव्याहून आलेला आईस्क्रीमचा साठा ठेवायला घरात कोल्ड स्टोअर असलेला हा सगळ्यांचा एकमेव मित्र होता, त्यामुळे याला फारच महत्त्व प्राप्त झाले होते. अगदी काही नाही, तर कोल्ड स्टोअरचा अनुभव सगळ्यांनाच हवा असायचा, त्यामुळे याच्या घरी मित्रांची रांग! याच लौकिकामुळे तसेच आईस्क्रीम व कोपर्यावरच्या श्रीकृष्ण मिसळीमुळे लवकरच केदारची ढेरी सुटून त्यास शेठजी ही पदवी देण्यात आली. त्यानंतर तो कायम शेठच राहिला आहे! या केदारला एका शब्दाततच सांगायचं, तर तो शब्द म्हणजे "पुढारी".  ४थी मध्ये असताना बर्वे आमच्या प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पुढारी झाले होते. त्या कोवळ्या वायापासूनच वर्गाचा व शाळेचा नेता व आम्हा मुलांना शिक्षक नामक कर्दनकाळांपासून बचाव करणारा तारणहार अशी त्याची ख्याती होती. त्यामुळे शाळेतले सगळेजण त्याला योग्य तो मान द्यायचे. कालांतरानी त्याचा बर्वे "साहेब" झाला यात काही नवल नाही. शरद पवारांएवढा धूर्त व चातुर्यसंपन्न दूरदर्शीपणा दाखवत या पोर-पुढार्याने खूप आधी पासूनच पूर्ण वर्ग एकत्र विणला होता(युनिटी). अखेरच्या इयत्तेत येईपर्यंत मुलांनी बर्वे साहेबांच्या नेतृत्वाखाली शाळेविरुद्ध केवळ बंडच नाही तर पार असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, चलेजाव आंदोलन सगळं काही चालवलं होतं. आता हा गांधींच्या लौकिकाचा आणि सामर्थ्याचा बरव्या पुस्तक वाचनाच्या कार्यक्रमात का आणि कसा  पडला होता हे परमेश्वरास ठाऊक, पण पडला होता हे खरं!

शाळेला आर्धा दिवस होता. शेवटची घंटा झाली आणि आम्ही सायकलींना जी टांग मारली ती थेट शुक्रवार पेठेत बर्व्यांच्या प्रशस्त वाड्यात जाऊनच थांबलो.(टाईमप्लीज हा मराठी चित्रपट पाहिला असल्यास त्यात जो वाडा दाखवला आहे तोच). शालेय जीवनात हा वाडा आमचा बालेकिल्ला होता. आभ्यास करायला(करायचो का?), मजा करायला, खेळायला इथेच. शनिवार रविवार कॅरम आणि पत्त्यांचे डाव पण इथेच रंगत! हा फक्त बर्वे कुटुंबाचा रहाण्याचा वाडा नसून आम्हा कार्ट्यांसाठी एक कचेरी व गुप्त खलबते चालवण्याचा अड्डा देखील होता. मी आणि केदार दोघांनी मिळून केलेल्या अनेक उचापतीपैकी एक म्हणजे आमच्या मित्रांवर नजर ठेवायला आणि एकूणच खबरा काढायला "CKBI" नावाची एक गुप्तहेर संघटना स्थापन करणे. (या उद्योगात अनेक लोकांनी(मुलांनी) नोंदवलेल्या अनेक "फिर्यादी", सुपाऱ्या तसेच गोळा केलेली गुप्त माहिती- कोण कोणावर लाईन मारते/मारतो, कोण कुठे किती वाजता जातो, कोणी कुठला क्लास लावला आहे, शाळेतल्या सुंदर मुली कुठे राहातर, त्या कोणाला भेटतात, अशी बरीच फालतू माहिती हेरगिरी मार्फत मिळवलेली आणि अनेक फायलींमधून ठेवली होती. अनेक फायली अजूनही आमच्याकडे आहेत!) या संस्थेचे सगळे कामकाज, हेरांची नेमणूक, रिपोर्ट फायलिंग इ. याच वाड्यातून चालायचे! तर अशा या आम्हा बाल-बहिरजींच्या बस्थानात राजकीय आराखडे आणि गुप्तहेर मोहिमा मांडण्याऐवजी चक्क एका पुस्तक वाचनाच मनसुबा बघून त्या वाड्यातल्या सर्व लहान-थोर मंडळींना अचंबा झाला होता! 

२.३० ला वाचायला बसलो ते थेट ८ पर्यंत! पुस्तकातला एक शब्द डोक्यात शिरला असेल तर शप्पथ! आम्हाला दोघांना मिळून जेवढा भाग लिहायचा होता, तो कसातरी करून उरकला. २०० पाने वाचून त्यातला (गाळीव) सार ५-६ फुलस्केप पानांवर उतरवला होता. आम्हाला दोघांना जे काम करायचे होते, ते तर झाले, पण आता आमच्या पुढचा प्रश्न फारच मोठा व गंभीर होता. आत्ता पर्यंत जे लिहिले आहे ते, आणि पुस्तक हे मृण्मयीला कधी द्यायचं! दुसऱ्या दिवशी शाळेत रिपोर्ट द्यायचा होता, आणि मृण्मयीला तिचा भाग वाचून तिचा रिपोर्ट लिहायचा होता. आता मात्र आमची थोडी टरकली होती कारण कधीही मुलींना फोन न केलेल्या आम्हा दोघांपैकी कोणालातरी मृण्मयीला फक्त फोनच करायचा नाही तर "शाळेबाहेर भेटून" पुस्तक नेऊन द्यायला लागणार होतं. दुसऱ्या दिवशी वर्गात होणारी नाचक्की आम्हाला डोळ्यासमोर दिसू लागली होती.

खरं तर मृण्मयीला शाळेबाहेर भेटण्यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं, कारण ती शाळेत आल्यापासून आम्हा दोघांची चांगली मैत्रीण होती. वर्गात अगदी आधीपासून ज्या मुलींशी आम्ही बोलायचो, त्यात ती एक(मेव). वर्गात तिला बाईंनी माझ्या शेजारची जागा दिली होती(माझ्यावर नजर ठेवायला), अन हे असून देखील मला तिच्यावरून किंवा तिला माझ्यावरून कधीच चिडवण्याचा प्रश्न नव्हता. केदार आणि तिच्यात पण हेच. ते काय होतं, आमच्याच वर्गातल्या एका "वाघाला" या बिचाऱ्या "बकरी" वरून आधीपासूनच चिडवायचे- त्यामुळे त्या बाबतीत आम्ही एकदम निर्धास्त होतो. कोणाच्या सुदैवाने आणि कोणाच्या दुर्दैवाने तिथे आमचे खाते उघडणार नाही हे माहिती होते.(माझी इतर बरीच खाती माझ्या मित्रांनी सुरु करून दिली होती बरका- त्यात शाश्वती आटवे हे रिकरिंग, करंट, सेविंग आणि फिक्स्ड सगळं कम्बाईंड!). तरी पण शाळेबाहेर मुलीला भेटलो हे वर्गात पसरलं की एवढ्याचं एवढं होण्यासाठी वेळ लागत नाही याची विनाकारण भीती मनात बसली होती. 

"एक काम करू, आपण नेहाला(जोशी) फोन करून तिचा नंबर घेऊया. तसाही फोन केल्याशिवाय तर काही जायचं नाही. उशीर झाला आहे." इति मी.

"वेडबिड लागलंय का तुला? तू,मी आणि मृण्मयी सोडून कोणालाही काळात कामा नये की हे झालं आहे! तुझं माझं जाऊदे रे, आपल्याला चिडवलं तर काही नाही, पण तिला उगीचच चिडवतील लोकं. तिच्या एवढ्या सभ्य मुलीला चिडवणं बरं दिसेल का?"

"हे मात्र तुझं बरोबर आहे".

मृण्मयी हुपरीकर म्हणजे साक्षात आदर्श विद्यार्थिनी होती. ८वि च्या सुरुवातीला ती "गुणी, शहाणी आणि सभ्य" या तीनही शब्दांचा समानार्थी शब्द होती. अवगुणाचा एक काळा ठिपका तिच्यात शोधून सापडला नसता. तिच्याएवढी समजूतदार मुलगी आमच्या वर्गात शोधून सापडायची नाही(अजूनही). ८वित असताना आमच्या शिक्षिकांनी मला सुधारण्याचे जे अनेक अयशस्वी कट रचले त्यात मृण्मयी सारख्या शहाण्या मुलीला माझ्या शेजारी बसवून माझ्यावर कायम पाळख ठेवणे हा एक होता. वर्षाच्या सुरवातीला दोषमुक्त म्हणून ख्याती असलेली मृण्मयी या राहू/केतू/शनीच्या प्रभावाखाली/मार्गदर्शनाखाली वर्षभरात अनेक अवगुण हस्तगत करत वर्षाआखेरीपर्यंत गुणदोषसंपन्न होत माझी अतिशय चांगली आणि विश्वासू मैत्रीण झाली होती!(अजूनही आहे!). शाळेतली मृण्मयी म्हणलं की आधी तिचे लांबलचक केस डोळ्यासमोर येतात. काय केस होते तिचे! आहाहा! शाळेत मुलींना केस मोकळे सोडायची परवानगी असती, तर मृण्मयीचे केस नक्की फरशीपर्यंत लांब गेले असते. ते केस आवरायला ती कायम २ कंबरेपर्यंत लांब शेपट्या बधून येत. त्या एकमेकांना/दप्तराला बांधायच्या, त्यात कागदाचे छोटे बोळे टाकायचे, खडू घेऊन रंगवायचे या तिला त्रास द्यायच्या काही खास पद्धती होत्या. नंतर कॉलेजला गेल्यावर तिने एक दिवस अचानक जाऊन जेव्हा केस कापले त्या दिवशी, "खोड्यांचा एक अख्खा खजीना बंद झालेला" बघून, तिला झालं नसेल एवढं दुःख मला झालं होतं. हिलाच आता पुस्तक द्यायला आम्ही निघालो होतो.

मी आणि मृण्मयी, अनेक वर्षांनंतर शाळेत!

"बर्वे, फोन लाव. डिरेक्टरी मधून नंबर शोधू. पुण्यात शनिवारात राहणारे असे कितीसे हुपरीकर असतील? लगेच सापडेल नंबर!"
(त्या काळात दर वर्षी बीएसएनएल कडून घरी एक डिरेक्टरी यायची! शहरातल्या सर्व नंबर्सची!)

"फोन करायलाच लागणार आहे. फोन न करता गेलो आणि तिच्या दादाने दार उघडलं तर काय सांगणार आहोत?" इति बर्वे. 
(मृण्मयीचा दादा अचानक आमच्या डोळ्यापुढे उभा राहून हातात मशीनगन घेऊन आमच्यावर गोळ्या झाडायला लागला.)

"हो हो फोन कर. नंबर घे- चारशे एकोणपन्नास,एकोणपन्नास अठरा."

बर्वेंनी नंबर फिरवला. आमच्या सुदैवाने तो तिनेच उचलला, 

"हेलो, मृण्मयी, केदार बोलतोय. ते पुस्तक द्यायचं होतं. मी किंवा चिन्या द्यायला येतो. अर्ध्या तासात येतो. चालेल ना? तू तुझ्या घराखाली येशील का?"

"चालेल..."

"चल ठेवतो फोन. भेटू. बाय.... चिन्या... ती घराखाली येत आहे. चल निघूया."

खात होतो, ते खाऊन निघण्यात पुढची ५-१० मिनिटे गेली. एकटाच कुठे जाणार, उगाच बोभाटा झाला तर? दोघंहीजण जाऊ. एवाने बाहेर पावसाची भुरभूर सुरु झाली होती. रस्त्यात चिखल-राडा. पावसात सायकली नको न्यायला. चालतच जाऊया, म्हणून एकच छत्री घेत आम्ही दोघंजण वाड्याच्या मागच्या बाजूनी बाहेर पडलो. घरी काहीतरी काम आहे अशी थाप मारली असावी. शिंदे आळीत बाहेर पडून थेट बाजीराव रोड गाठला आणि शानिवाराच्या दिशेने पटपट चालायला लागलो. मृण्मयी कुठे राहायची हे कोणालाच माहिती नव्हतं, म्हणून आम्ही सुट्टीत आमच्या काही हेरांकडून त्याबद्दल माहिती काढली होती. ती शनिवार पोलीस चौकी आणि शनिवार वाड्याजवळ कुठे तरी राहायची. 

"मृण्मयी शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ राहते ना रे?"

"हो... खबर तरी तशीच होती. सापडलं नाही तर तिथून फोन करूया. नंबर घेतला आहेस ना?"

"लिहिला नाहीये, पण लक्षात आहे.. चारशे एकोणपन्नास....."

"ठीके ठीके...लक्षात आहे म्हणतोयस म्हणजे असेलच..."

"केद्या, तू कधी असा मुलीला भेटायला गेला आहेस का रे?"

"वेडा आहेस का! काही पण काय! शाळेत भेटतो तेवढंच!"

"अरे असलेकर असायला पाहिजे होता... तो बिनधास्त आहे या बाबतीत. तो जातो असं ऐकलंय मी"

"असलेकर सोड रे तो कुठून आला मधेच!... मृण्मयी खाली आली नसली आणि आपल्याला तिच्या घरी जावं लागलं तर तू काय सांगणार आहेस याचा विचार कर!"

"अरे आता दोघं जण जात आहोत, आणि पुस्तक, आणि रिपोर्ट पण आहे ना, मग कसला विचार करतो आहेस एवढा!"

"जाऊदे.. चाल पटपट.. या पावसाला पण आत्ताच यायचं होतं..."

असे संभाषण करत करत आम्ही बाजीराव रोड तुडवीत पुढे जात होतो. नजर सगळीकडे फिरत होती. शाळेतलं किंवा घरचं कोणी दिसायला नको. चोरी केल्यानंतर चोर ज्या सावधतेने फिरतो, तेवढीच सावधता आता आम्ही देखील बाळगत होतो. अखेर मृण्मयीच्या घरी जायचा फाटा आला.. आत डावीकडे वळालो, आणि आता शनिवार पेठ पोलीस चौकीच्या दिशेने जायला लागलो. तिथे आलो, पण चौकीजवळ तिचं घर कुठे आहे, हे नक्की माहिती नव्हते. साधारण जी माहिती मिळाली होती, त्याचा अंदाज घेत ज्या बाजूने आलो तिथेच कुठेतरी आहे म्हणत मागे फिरलो. थोडं पुढे जाऊनसुद्धा ती दिसली नाही, म्हणून चुकीच्या ठिकाणी वळलो म्हणत परत चौकीच्या दिशेने फिरलो. तेवढ्यात समोरून हाक ऐकू आली.

"एक केदाsssर, ए चिन्मsssय!"

बघतो तर छत्री घेऊन लांब शेपटा असणारी मृण्मयीच उभी होती. 

"हुश्श.. खाली आली आहे... घरी जायला नको..." इति मी.

"पुस्तक आणलंय ना? आणि रिपोर्ट?"

"हो हो.. आणला आहे. घे. तू इथेच रहातेस ना समोर?" बर्व्यांनी उडी टाकली.

"नाही रे, थोडं पुढे गेल्यावर. तुम्ही येताय का घरी?"

"नाही!! नको! तू काय सांगून खाली आली आहेस?" मी (जरा घाबरूनच)

"काही नाही.. कोपर्यावर झेरॉक्स काढायची आहे"

"ओके ओके, पण तू चौकात कशी? तू घरापाशी थांबणार होतीस ना?" केदार

"आरे, अर्ध्यातासात येतो म्हणाला होतास, १५ मिनिटं खाली उभी होते, कोणीच आलं नाही म्हणून चौकात आले. मला वाटलं तुम्ही हरवलात."

"छे आम्ही कसले हरवतोय!"

"ए पण मला एक सांगा, तुम्ही जेव्हा फोन केलात तेव्हा मला पत्ताच विचारला नाही. मग इथे यायचं कसं समजलं!"
मृण्मयीने हा गुगली टाकून अगदी शेन वॉर्नच्या बॉलिंगपुढे भांजाळलेल्या माईक गॅटिंग सारखी अवस्था केली. घरचे काय विचारतील हे यशस्वीपणे टाळले होते, पण याचे काहीच उत्तर नाही."

"नाही नाही, नंबर वरून शानिवारात आहे ते कळालं, म्हणून तिथल्या पोलीस चौकीत जाऊन विचारावं म्हणून इथे आलो." इति आमची थाप.
(ही थाप तेव्हाही खपली नसणारे! फक्त मृण्मयी तेव्हा काहीच बोलली नाही.)

"बर बर.. पुस्तक चांगलं आहे ना?"

"रटाळ आहे खूप. बोअर झालो होतो वाचताना. आम्ही लिहिलंय तसच लिही. जास्ती लिहू नकोस उगीचच."

"ठीके. चल जाते मी. भेटू उद्या शाळेत. बाय"

"बाय"

बाय म्हणेपर्यंत मृण्मयी मागे वळून पुन्हा घरी जायला निघाली. ती नक्की कुठे राहते हे बघण्याचे कुतूहल सुद्धा शिल्लक नव्हते आता! अगदीच भेदरलेल्या अवस्थेत होतो आम्ही. शाळेबाहेर एका मुलीला - जरी ती चांगली मैत्रीण असली तरी- भेटलो! केवढा हा पराक्रम! काहीच सुचत नव्हतं आता तर! आश्चर्याची गोष्ट होती कारण आम्ही तिच्या मागेपण गेलो नाही!  पुढची ५ मिनिटे मी आणि केदार सुन्न अवस्थेत तिथेच काहीही न बोलता उभे होतो. आत्ता नक्की काय झालं,  या विचारातून बाहेर येण्यासाठीच तेवढा वेळ लागला. आम्हा दोघांसाठी तरी हा एक नवीन आणि वेगळाच अनुभव होता, बहुदा मृण्मयीसाठी देखील! शालेय जीवनातले अनेक तत्कालीन अलिखित नियम एकाच दिवशी मोडत एका मुलीला फक्त फोनच केला नाही, तर तिच्या घरापर्यंत जाण्याचे धाडस केले होते, आणि तिच्या घराखाली(जवळ) भर चौकात तिला जाऊन भेटलो देखील होतो- ते पण पोलीस चौकी समोर! आम्ही तिघे सोडल्यास इतर कोणीही या घटनेचा साक्षी नाही, हे तेवढेच दिलासा देणारे होते, कारण दुसऱ्या दिवशी वर्गात कोणीही कोणाला चिडवणार नव्हते हे उघड होते!  

ही भेट उरकली आणि मी आणि बर्वे पुन्हा आमच्या घरी जायला वळलो. शनिवार पेठेतून नारायण पेठेत आलो, रमणबागेच्या चौकात सेलिब्रेशन म्हणून आलू भुजिया चे ३ रुपयाचे प्रत्येकी २ पुडे उडवले. पुन्हा चालत जाऊन सदाशिवात प्रवेश करत नागनाथ पारावरून पुढे चिमण्या गणपती पाशी. तिथून मी माझ्या घरी, बर्वे बालेकिल्ल्यात. मनात achievement चे वारे! झोप लागता लागेना! त्या दिवशी आम्ही खर्याखुर्या अर्थे शिंग फुटलेले मोठे झालो होतो.

आज हे लिहिण्याचे कारण म्हणजे ही घटना मी पूर्णतः विसरलो होतो. फोन नंबर विसरलो होतो. सगळंच विसरलो होतो. पहाटे सिनेमात जसा flashback होतो तसा अचानक झोपेत flashback झाला, आणि अगदी सखोल तपशिलासह हा किस्सा आठवला, आणि ताडकन मी जागा झालो. फोन नंबर लक्षात रहाण्याचा तर संबंधाच नवता, आणि मृण्मयी बरोबर बोलून तपासल्यावर त्यातला फक्त एक आकडा चुकीचा होता! कहर होता हा. पुन्हा विसरण्याच्या आधी हे लिहून ठेवायला हवे म्हणून आमच्या अनुदिनीवर प्रकाशित करायचा विचार आला. त्या निमित्ताने माझ्या २ लाडक्या दोस्तांबद्दल लिहिता आले. 

मागे वळून पाहता यात विशेष असे काहीच नाही. नंतर अनेकदा आम्ही मृण्मयीला भेटलो. तिचा घरीपण अनेकदा गेलो. पण मैत्रीचा भक्कम पाया बहुदा त्याच दिवशी रोवला गेला असावा. पण तेरा वर्षांच्या पोरांना तेव्हा हे कुठे कळत होते! शानिवारातून नारायण पेठेकडे येत रमणबागेच्या चौकात आलू भुजियाचे पुडे चोपताना आमच्या मनात कोणती वादळे आणि धुमश्चक्री सुरु होती ते आम्हालाच माहित!
सगळ्यात डावीकडे मृण्मयी, मधला केदार आणि सगळ्यात उजवीकडे मी.

No comments:

Post a Comment