माझ्या फेसबुकवरील
मित्रमंडळी आणि इतरत्र पसरलेले आमचे पंखे यांना धुडगूस न घालायची नम्र विनंती करून
खालील स्वयंवराचे निमंत्रण देतो आहे.
चिनोबा उर्फ चिमाजीअप्पा
यांची लहानपणापासूनची चांगली भैणत्रिण ‘कु.डॉ.डस्सा-डॉक’ हिचे लवकरात लवकर
मुहूर्त काढून शुभविवाह लाऊन द्यायचे असले कारणाने (जड मनाने का होईना,) सर्व
होद्करू वरांसाठी आग्रहाचे निमंत्रण देतो आहे. अतिशय हुशार आणि बुद्धिमान मुलीला
योग्य असा वर मिळत नाहीये. प्रॉब्लेम असा आहे की डस्सा-डॉकच्या स्वप्नातला
राजकुमार काही केल्या सापडत नाहीये. (वरील परिच्छेद गोळे मास्तरांच्या सुरात
वाचावा)
तर, यापेक्षा अधिक विलंब न
करता आमच्या डस्सा-डॉकची ओळख करून देतो. (स्वतःच्या मनात गिटार, व्हायोलिन, सतार,
डमरू, हवं ते वाजवा...तुमचा चॉइस... हिरोईनच्या एन्ट्रीचा इफेक्ट आणण्यासाठी हा
खटाटोप)
(डस्सा-डॉक’ इथे तुझा फोटो
येणार आहे... पाठमोरा.. सस्पेन्स फॅक्टर म्हणून पाठमोरा. लवकर दिला नाहीस तर तुझा मजनूमेकर फोटो टाकीन)
ही आमची (इथे चि.सौ.का डॉ
अशी बरीच अक्षरं)डस्सा-डॉक’. ही मेडिकलची डॉक्टर आहे बरका. (नाहीतर आजकाल कोणीही
उठून वाट्टेल त्या क्षेत्रात डॉक्टरी मिळवायला बघतात- उदा- सिंधुसंस्कृतीमध्ये
लोट्याचे उपयोग!) म्हणजे ही खरच खरीखुरी डॉक्टर आहे-एमबीबीएस!. आम्ही हिला
लहानपणापासूनच चांगलंच ओळखून आहोत त्यामुळे बहुदा तिची योग्य माहिती देऊ(आमच्या
ओळखीचे काही खवचट लोक “म्हणूनच आम्ही डॉक झालो नाही” हे म्हणणार हे गृहीत धरतोय). डस्सा-डॉकने
शिक्षण प्रसारक मंडळी यांची इंग्रजी माध्यमिक शाळा असं मराठमोळं नाव असलेल्या एका
इंग्रजी(नावापुरती) शाळेत दहावी पर्यंत शिक्षण घेऊन, पुढे स.प महाविद्यालयात
सायन्स निवडून नंतर एका विख्यात हॉस्पिटलला जोडलेल्या एका दर्जेदार कॉलेजातून
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय(एमबीबीएस- खवचट पुणेकरांनी याचा म्हातारी बोळातून
बोंबलत सुटली हा अर्थ लाऊ नये).
सध्या डस्सा-डॉक उच्च
शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे आणि योग्य त्या त्या सर्व परीक्षा देत आहे.
डस्सा-डॉकला पुढे जरी डोळ्याचे डॉक्टर व्हायचे असले- तरी इतरही फिल्ड मधले डॉक्टरी
सल्ले ती अतिशय उत्तम देते.
माझी आणि डस्सा-डॉकला गेले
४ वर्ष एक डॉक्टर-पेशंट म्हणून देखील ओळख आहे. तिने माझ्यावर सर्दी पासून-वेड
लागणे आणि अश्या अनेक रंगीबेरंगी, मला हे नक्की झालेत असं मालाच वाटणाऱ्या
आजारांवर, आणि जेन्युईन आजारांवर योग्य आणि जालीम उपाय सुचवले आहेत. (आणि तोही फी
वजा). तिचे उपाय बाहुतेक वेळा आजाराच्या वर्मी लागतात, ज्यामुळे गुगलपेक्षा मी
तिच्यात जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे डस्सा-डॉक एक उत्तम डॉक आहे यात काही वादच
नाही.
वैद्यकीय प्रोफेशन बाजूला
ठेवता, होद्करू वधू म्हणून डस्सा-डॉकची मी ओळख करून देणं गरजेचं आहे. फोटोमधून
तुम्हाला डस्सा-डॉकचं सौंदर्य कळालच असेल.(इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी जीभा
बाहेर काढू नये. अनेस्तेशिया देण्यात येईल.) तरी तपशील पुढील प्रमाणे:
वय: आमच्यापेक्षा फार लहान नाही.
वर्ण: यमिपेक्षा सहापट गोरी.(तरी तिला कल्याणच्या सुभेदाराची
सून म्हणू नये)
चेहरा: अतिशय रेखीव
डोळे: काळे भोर आणि बोलके
स्वभाव: मनमिळाऊ, लाजरा, नाजूक
तुलना: बकुळीप्रमाणे
हास्य: स्मित
थाट: पेशवाई
उंची- हील्स घातल्यावर आमच्या खांद्यापर्यंत.
बौद्धिक उंची: आमच्यापेक्षा किमान २ फुट जास्त.
पाककला: उत्तम- कॉफीला तोड नाही (इथे फोटो टाकणार)
छंद: भरतनाट्यम मध्ये अरंगेत्रम पूर्ण
इतर जीवनोपयोगी कौशल्य: भर दिवसा कुठेही न आपटता पुणे शहरात चारचाकी उत्तम चालवता
येणे.
तर अशा आमच्या डस्सा-डॉकला
एक गोरा-घारा पुण्यात रहाणारा डॉक्टरच हवा आहे. त्यामुळे इंजिनियर वाचकांनी इथूनच
कलटी मारावी. डस्सा-डॉकच्या मते इंजिनियर लोकांना डॉक्टरांएवढी “सर्जन”शीलता नसते.
उरलेल्यांनीच पुढे जाणे असे डस्सा-डॉकचे म्हणणे आहे.
आमच्यामते सर्व लोक सारखेच आहेत,
म्हणून डस्सा-डॉकच्या स्वयंवराची पहिली यादी आम्ही कोणताही बायस न ठेवता बनवतो. त्यामुळे होद्करू वरांना आमच्या प्रश्नांना
सामोरे जावे लागणार आहे. आमच्यानंतर चितळे मास्तर निवड चाचणी घेणार आहेत. आमच्या
या डबल फिल्टर मधून पुढे गेलेल्या मुलांनाच फक्त डस्सा-डॉकच्या घरच्यांशी बोलता
येणार आहे.(आम्ही आणि चितळे मास्तर डस्सा-डॉकचे स्वघोषित अंगसंरक्षक असल्या कारणाने
आम्ही असला फालतूपणा करू शकतो)
डस्सा-डॉकः स्वयंवराय
प्रश्नानि पृच्छति चिन्मयः|
योग्यं उत्तरं ददाति ते
वराः न ददातीति वराहाः||
तर उगाच शो-ऑफ करायला
चुकीच्या संस्कृतात काहीतरी बरळून आम्ही आमच्या प्रश्नांना सुरवात करतो आहोत.
प्रश्न १. तुमचे पूर्ण नाव. (तीर्थरुपांच्या नावासहित)
प्रश्न २. वय (उत्तरावर कंडीशनल लूप लावला आहे)
प्रश्न ३. पेशा.
अ)
डॉक्टर ब) इंजिनियर क) सिए
द) यापैकी काही नाही.
(उत्तर अ असल्यासच पुढचा
अल्गोरीदम लोड होणार)
प्रश्न ४. प्रश्न ३ चे उत्तर डॉक्टर दिले असल्यास “बी.जे” चा योग्य
फुल फॉर्म एका प्रयत्नात सांगावा. (९९ टक्के टारगट व निगरगट्ट इंजिनियर्स आणि इतर
गेमाडपंथी मंडळी इथे बाहेर पडणार/फेल होणार)
प्रश्न ५. १ किलो बेसनाच्या लाडवांवर एकच काजू कसा पुरवणार?
प्रश्न ६. खालील पदार्थांची पाककृती सांगावी:
१)
मोदक
२)
पानग्या
३)
ओल्या काजूची उसळ
प्रश्न ७ देव दिवाळी का साजरा करतात?
प्रश्न ८. ५ बजाज पल्सर१५० इंजिन्स__________ माणसाचा मेंदू.
रिकाम्या जागेत योग्य चिन्ह
भरा. (उरलेले इंजिनियर्स बाद)
प्रश्न ९. “नो हार्ड फीलिंग.” या इंग्रजी वाक्प्रचाराला वैद्यकीय
भाषेत एकाच शब्दात मांडावे.
प्रश्न १०. मज्जासंस्था आणि नर्व्हस सिस्टीम मधले १० फरक काय?
प्रश्न ११. हिप्पोक्रेटिक ओथ २ मिनिटात म्हणून दाखवा.
प्रश्न १२. खालील मजकूर एकही चूक न करता पहिल्या प्रयत्नात वाचून
दाखवा
तरी वरील प्रश्नांची योग्य
उत्तरे दिल्यास आपल्याला डस्सा-डॉकच्या लवकरच होणाऱ्या स्वयंवरास हेजेरी लावायची
तार मिळेल. सर्व लेखी उत्तरे गुगलडॉक्स वर मिळणे अपेक्षित आहे.
तोंडी उत्तरे आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करून आम्हाला गुगल वर पाठवावे. ही उत्तरे ८
मात्रांच्या “ता तै तै तत्| धित् तै तै तत्||” या ठेक्यावर देणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे उत्तरे रेकॉर्ड करताना एकपट,
दुप्पट व चौपट लईमध्ये द्यावी व तसा घुंगरांचा आवाज येणे अपेक्षित आहे.
आमच्या डस्सा-डॉकच्या
स्वयंवरास भरपूर गर्दी होवो हीच आमची प्रभूचरणी प्रार्थना आहे.
मंडळ आभारी आहे!
कृपया लाथा मारून पृष्ठभाग
लाल करू नये. लाल पृष्ठभाग मिरवायला आम्ही बबून नाही!
डस्सा-डॉक माझ्यासाठी एक
पेन किलर इंजेक्शन रेडी ठेव बरका! पेरीनियल पेशंट आज परत हजेरी लावतोय!