Pages

Sunday, 1 October 2017

एक यु.लो.प्र कसा बनतो..

जरा आरशासमोर उभे राहा... आरशात जी व्यक्ती दिसते आहे, त्या व्यक्तीला नीट बघा.. बघा बघा! सामान्य वेशातील स्वतःला बघताय? हो? छे! मग लायकी नाही तुमची "युवा लोकप्रतिनिधी(यु.लो.प्र.)" म्हणवून घेण्याची... 

आहो, यु.लो.प्र. व्हायला तुम्हाला गहीरं व्यक्तिमत्व वगैरे असणं सगळं भंपक आहे. लागतो फक्त रुबाब.. तो कसा आणायचा ते मी सांगतो... डोळे मिटा... आरशातल्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा.. आणि मी सांगतो ते बदल करा...

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण किती शिकलो आहोत, याचा विचार करणं सोडून द्या. याबद्दल खरोखर कोणालाही काही पडलेली नाहीये. शिक्षण घ्यायचंच झालं तर थापा मारण्यात एखादा डिप्लोमा करा. कारण लोकांना खोट्या आशेच्या गाजरावर तुमचं प्रतिनिधित्व सिद्ध करता येण्यासाठी तुम्हाला तोच उपयोगी पडणार आहे. एरवी तुझी ४ पोरं बडवायला मला ५ पोरं आणायला लागतील एवढं गणित, दादागिरी करताना द्यायला १० शिव्या, "दिलगिरी व्यक्त करतो", "आज या ठिकानी", "भारत माता की जय" "जय महाराष्ट्र" "जय भवानी जय शिवाजी" अशी वाक्य आणि "ण/न" यांच्या वापरातला/गैरवापरातला घोटाळा हे जरी जमलं तरी पुष्कळ आहे! शिक्षणाची वगैरे काही गरज नाही. यु.लो.प्र. होताना सगळ्यात क्षुल्लक गोष्ट म्हणजे शिक्षण. 

ताकदीने आणि बुद्धीने तुमच्यापेक्षा क्षुद्र अशा ५-५० लोकांमध्ये स्वतःला अव्वल करणे ही तुमच्या यु.लो.प्र. होण्याची खरी पहिली पायरी. स्वतःचा विचार न करू शकणारे लोक पटवून आपल्या खिशात घालावेत. त्यानंतर खिळखिळ्या अन भाकड तत्वाच्या लोकांना ४ बाटल्या बियर आणि १ कोंबडी ठोसून आपल्या अवतीभवती पिंगा घालायला भाग पाडणे हे देखील करावे. एकदा का तुम्ही हा थोडासा खर्च उचललात, आणि नित्यनेमाने उचलत राहिलात, की ही पोरं तुमच्यासाठी वाट्टेल ते करायला पुढे सरसावतात. आपण इतराची किती काळजी घेतो याचा दिखावा करणे हा बेकार आणि बेरोजगार युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीचा एक उत्तम मार्ग आहे. त्याचा पुरेपूर फायदा उठवावा. क्वचित एखादा चांगला निघाला तर त्याला बुलेट(गाडी) द्यावी. 

अशाप्रकारे आपण एक-एक मोहरा- नको हीरे म्हणूया आपण त्यांना-  वेचून वेचून गोळा करत गेलात आणि तुमच्या टोळीची संख्या वाढली की पुढची अभिलाषा म्हणजे पदवीधर होणे. BA, MA, LLB, BE, BTECH वगैरे फालतूच्या पदव्या आहेत. तुम्हाला ज्या पदव्यांची गरज आहे, त्या  नावाआधी, नावामध्ये आणि नावानंतर लावता येतील अशा असाव्यात. उदाहरणार्थ :  नावा आधी "श्री.श्री.","ह.भ.प","पै", "युवाछावा", "गोल्डनभाई" अशा पूर्वपदव्या  तुम्ही कामावल्या, की नावात आपोआप  "दादा, तात्या, अप्पा, अण्णा, नाना, भाई, भाऊ, साहेब" अशा प्रकारच्या पदव्या आणि नावानंतर "तरुणीहृदयसम्राट" बाय डीफॉल्ट मिळतात. पी.एचडी करणाऱ्याला देखील  एकावेळी एवढ्या पदव्या मिळत नाहीत! यु.लो.प्र.त्वात जेवढ्या तुमच्या पदव्या जास्त, तेवढी तुमची महानता जास्त, मान जास्त. त्यामुळे, तुमचे नाव जरी "पक्या" असेल, तरी काळजी नसावी.  एकदा का तुमची सिकोफंटांची टोळी जमली, की आपोआप तुमचा "युवाछावा ह.भ.प.पै. श्री श्री. पक्यादादा गोल्डनभाई भाऊसाहेब" उर्फ "तरुणीहृदयसम्राट" झालाच म्हणून समजावा! एकदा का तुम्ही पदवीधर झालात की यु.लो.प्र.त्व गाठण्याची पुढची पायरी आपण इथेच यशस्वीपणे सर करता! व्वा! क्या बात है!! काय तो मान! काय तो थाट! कुठे पक्या अन कुठे "युवाछावा ह,भ.प.पै.श्री.श्री. पक्यादादा भाऊसाहेब!!" अशी पदवी ऐकून खुद्द अफजलखान देखील लाजेल!!(त्याची पदवी ऐका एकदा.. मजेशीर आहे!)

तुम्ही पदवी धारण केलीत, की फक्त त्यावरच समाधान मानणे हा यु.लो.प्र.च्याआयुष्यातला खूप मोठा अपराध आहे. तुमची पदवी चारचौघांसमोर झळकणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या वाढदिवसानिमित्त "गोल्डनभाई फ्रेन्डशिप ग्रुप" किंवा "सनी मित्र मंडळ" या ग्रुप्सच्या सौजन्याने आपल्या पदवीधर नावाचा एक भलामोठा फ्लेक्स आपल्या घराच्या आणि आजूबाजूच्या ५ महत्त्वाच्या चौकांमध्ये झळकला पाहिजे. फ्लेक्स बनवून घेणं हे कोणत्याही होद्करू यु.लो.प्र.ला एक विशेष कला म्हणून शिकायला पाहिजे. कारण आपली निराळी ओळख करून द्यायची ताकद फक्त फ्लेक्समध्येच आहे. चित्रविचित्र रंगाचा बॅकड्रॉप, चपखल शब्दांचा मजकूर, ठळक अक्षरात तुमची पदवी आणि फ्लेक्सभर तुमच्या चेल्यांचे हसरे चेहरे या सारखे आकर्षण तुमच्या गावात त्या दिवसापुरते तरी बाकी काही नसते. 

फ्लेक्स वर तुमचा फोटो मध्यभागी असावा. फोटोत कुंकवाचा मोठा टिळा लावलेला असावा, चेहऱ्यावर एक अवाढव्य गॉगल असावा, दाढी आखीव रेखीव पण वाढलेली असावी. भांग नीट पाडावा. मिशी हास्य लपवणारी नसावी, एकाच कानात बाली असावी, गळ्यात किमान ५ सोन्याच्या चेन्स असणे आवश्यक आहे.(ऑप्शनल नाही) हातात चांदीचं कडं, १०ही बोटांमध्ये आंगठ्या. थोडक्यात, खिशात दमडी देखील नसली, तरी हजारो एकरांचे तुम्ही एकमेव मालक आहात हे भासवणे गरजेचे आहे. ही थेरं केल्याशिवाय सामान्य लोकांपर्यंत तुमचे वेगळेपण पोहोचणे आवघड आहे. त्यामुळे जमत नसले, तरी हे करायला पाहिजेच. तुमच्या इलाक्यातले तुम्ही फार मोठे कोणीतरी आहात हे सामान्यांच्या लक्षात येते.

फ्लेक्स हा फक्त तुमच्या वाढदिवसालाच झळकला पाहिजे हा एक भोंदू समज आहे. इतर राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस- मग तो कोणत्याही पक्षाचा असो, रोहित शर्माने अजून एक द्विशतक ठोकले, गाईने वासराला जन्म दिल्याचा आनंद, पिंकीचा पळून गेलेला कुत्रा परत आला म्हणून, मावशीच्या पोरीच्या एक्स बॉयफ्रेंडला झोडून काढल्याबद्दल शुभेच्छा, झालेल्या मारहाणीचा खेद व्यक्त करायला, किंवा बाजूचे येडे काका गचकले म्हणून दिलगिरी व्यक्त करायला अशा सगळ्या छोट्या-मोठ्या, क्षुल्लक आणि महत्त्वाच्या घटनांवर तुमचा फ्लेक्स लागला पाहिजे. आपण एक सजग आणि कृतीशील आणि निष्ठावंत नागरिक आहात, हे भासवण्याचा  यापेक्षा सोपा मार्ग दुसरा नाही. परंतु या सर्व फ्लेक्समध्ये तुमचा फोटो ठळकपणे दिसला पाहिजे याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.  

एकदा का तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात यायला लागलात, की स्वतःवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण चार चौघात कसे दिसतो, कसे वावरतो यावर भर दिला पाहिजे. रंगीत, फुलाफुलाचे, चट्टेरी-पट्टेरी कपडे टाळावे.  शोभून दिसत नाहीत. बाहेर अंगात पांढराशुभ्र सदरा असावा. सदरा इस्त्रीचा घालावा- स्टार्च लाऊन केलेक्या कडक इस्त्रीचा. गुडघ्याच्या लांबीचा.  त्यावर अगदी फिकट पांढऱ्या रेघा.. खाली शुभ्र सुरवार.. अगदी पायाला कवटाळणारी( गुडघ्यांच्या खालपासून अर्थात.. त्यावर सैलच!)...पायात वहाण असल्यास बारीक नक्षीकाम असलेले चामड्याचे असावे. नाहीतर काळ्या मोजड्या किंवा काळे बूट. त्यावर एक मोदी जाकेट. आपली ताकद दाखवायला स्कॉर्पियो, डस्टर, एक्सयुव्ही अशा गाड्या, किंवा बुलेट अशा बाईक्स वापराव्या. Activa, nano, सायकल, ही वाहने टाळावी. मोठी गाडी नसल्यास भाड्याने घ्यावी. गाडीवर वाघाचा चेहरा असावा. "पप्पांची कृपा" पण असावे. नंबर प्लेटवर नंबर वाचता येऊ नये. त्या ऐवजी "दादा" किंवा "तात्या" किंवा "भाऊ" असले पाहिजे. गाडीला झेंडा लावायची सोय असली पाहिजे. परंतु ती जागा रिकामीच ठेवावी. पक्षपात करताना ते सोईचे पडते.  

अशाप्रकारे एक एक पाऊल उचलत आपण यु.लो.प्र.म्हणून गणले जाऊ लागता. परंतु एका होद्करू यु.लो.प्र. खरी परीक्षा तेव्हा असते, जेव्हा त्याच्या "इलाक्यात" "राडा" होतो. कानावर बातम्या येताच एक फोन टाकून शिट्टीवर ५० पोरं उभी करायची ताकद तुमच्यात हवी. राडा झालाच, तर या ५० पोरांना घेऊन त्याचा "मॅटर" करता आला पाहिजे. परवॉर्डीय लोकांना बुकलून काढता आलं पाहिजे, आणि एकदा काय सगळा चिवडा झाला, की त्यातून मामाला सांभाळून घेता आलं पाहिजे.

थोडक्यात काय, तर तुम्ही जगाची(आणि लोकांची) परवा न करता खंबीर मनाने उभे राहून गंभीर राहिलात, तुमचं नॉलेज खोल आहे म्हणून पृथ्वी गोल आहे दाखवलंत(देखावा केलात) आणि एका घावात शंभर तुकडे करून अर्धे इकडे, अर्धे तिकडे केलेत आणि या आणि इतर तुमच्या कृत्यातून तुम्ही स्वतःच्या ईगोची पूजा करता हे लोकांना पटवलं, तर तुम्ही एक खरेखुरे यु.लो.प्र.आहात हे सांगायची काहीच गरज नाही!!!