परवा कॅलिफोर्निया वरून
रालेला परत आलो, तेव्हा विमानतळापासून घरी यायला उबर केली होती. उबरचा
ड्रायव्हर आफ्रिकन-अमेरिकन होता. आत्तापर्यंत जेव्हाकेव्हा उबर वापरली आहे, तेव्हा
आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर असला की गप्पा मारायला धमाल येते असा माझा अनुभव आहे.
अनेक विषयांवर हे लोक खूप सहज आणि मोकळेपणाने बोलतात. अनेकदा खूप कमी शब्दात किंवा
काहीच न बोलता आयुष्यातले कटू प्रसंग, सलणाऱ्या भावना आणि उघड
जरी नसला, तरी गौप्य पद्धतीने चालणारा वर्णभेद यावर
काहीतरी खोल बोलून जातात, नकळत व्यक्त होऊन
जातात.
सहसा हवा, अमेरिकेत कधी आलात, त्यांचा आणि माझा मूळ
गावं/देश याबद्दल बोलण्याने संवाद सुरु होतो. बरेच लोक तितक्यावरच थांबतात, पण नकळत गौरवर्णीय विरुध्द कृष्णवर्णीय यांतला नकळत होणारा
फरक चटकन सांगून जातात. पण बरेच लोक मोकळेपणाने बोलतात. आफ्रिकेतल्या सुदान, सोमालिया, किंवा इतर
युद्धग्रस्त देशातून पलायन करून आलेले अनेक लोक इथे उबर ड्रायव्हरचं काम करताना
दिसले आहेत. आपल्या देशी परत जाऊ शकत नाही याची त्यांना प्रचंड खंत असते आणि ते दुःख अनेकदा दिसून येतं. पण
यातल्या अनेकांना भारताबद्दल जबरदस्त कुतूहल आहे. त्यांचे अनेक मित्र दिल्ली
विद्यापीठातून शिकले आहेत. मुंबई आणि पुणे विद्यापीठे देखील यांना माहिती असतात.
माझ्यासाठी इथे आल्यावर हे सगळं ऐकणं जरा नवीनच होतं.
परवाचा माझा झालेला मित्र, “गाम्बिया” नावाच्या अतिशय छोट्या देशातून आला होता.
पश्चिम आफ्रिकेतील सेनेगाल नावाच्या देशाच्या मधोमध एका नदीचं खोरं आहे, आणि या नदीच्या लागतची एक छोटीशी पट्टी म्हणजे हा
गाम्बिया देश. पूर्ण पश्चिम आफ्रिका फ्रेंचांनी गिळंकृत केले असताना या नदीच्या
खोर्यात इंग्रज शिरले होते. नकाशावर हा देश बघितला होता, पण फारशी माहिती नव्हती. माझ्या या नव्या मित्रामुळे तीही
भरपूर मिळाली.
सहज बोलता बोलता जगात
कुठे काय सुरु आहे यावर विषय घसरला. पाश्चात्य देशांनी सत्ता केंद्रित करण्यासाठी
जगात “गरज नसताना कशी युद्ध केली” यावर विषय गेला होता. सिरीया, इराक, विएतनाम, कोरिया, किम जोंग उन, ट्रम्प, अफगाणिस्तान,
कोल्ड वॉर, आणि अशा कितीतरी विषयांवर गप्पा झाल्या.यावर काही महानेत्यांच्या पोकळ
विचारांचे धिंडवडे काढले गेले. त्यातच एक कमालीचं वाक्य ऐकायला मिळालं.. “Some countries think that
they spread non violence. But they are the most violent countries in the world-
involved in most unnecessary wars. If anyone asks them why, the response is “Our
violence is to uphold non-violence” and that is complete BS”. खरोखर विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. पुढे
गप्पा मारता मारता लोकशाहीची गरज नसताना केलेली अंमलबजावणी, फसलेली लोकशाही आणि
काही ठिकाणी हुकुमशाही का योग्य होती हे संभाषण पण झाले. तेव्हा “Let me tell you- If people are ruled by an idiot they don’t
want, it is called dictatorship. But if they are ruled by and idiot they elect,
its called democracy” असे नवे ज्ञान
मला मिळाले.
एखाद्या उबर ड्रायव्हर बरोबर
मी या गप्पा मरीन याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.
पुढे सोशल मिडिया, केम्ब्रिज अनालीटीका, निवडणुकी, याकडे विषय वळला हे स्वाभाविकच होतं. “How is our friend Mr. Modi doing? You think he will get elected
again?” हा प्रश्न ऐकून मी ५ मिनिट सुन्न झालो होतो. अमेरिकेतल्या तशा छोट्याशा
शहरात गाम्बिया नामक चिमुकल्या देशातून आलेला एक माणूस इतक्या उत्साहाने भारतीय
निवडणुकीकडे लक्ष ठेऊन आहे, यावर विश्वास बसत
नव्हता. पुढची १० मिनिटे मोदिनी किती भारी काम केलं आहे, हे मी त्याच्याकडून ऐकलं, आणि “If I was Indian, I would always vote for him” हे विधान ऐकून थक्क झालो. मी मोदी समर्थक आहे- विचारधारेमुळे, संघाच्या संस्कारामुळे, भाजपबद्दल आपसूक
असणाऱ्या आकर्षणामुळे मी, किंवा
माझ्यासारख्या इतर कोणी हे विधान करणे अगदी स्वाभाविक आहे. पण, परत, आफ्रिकेतल्या
छोट्याशा देशातला तो माणूस, भारतात असलेल्या
त्याच्या मित्रांच्या बोलण्यावरून, भारतात एकूणच
इंटरेस्ट घेऊन निस्वार्थ मानाने हे म्हणतो हे खरोखर विशेष आहे. “Sometime I wish our African countries had a leader like
Modi – we would have been so much ahead of where we are now” या वाक्याने तर मी अक्षरशः बधीर झालो होतो.
आपल्याकडे आज एक राष्ट्रपुरुष, विश्वपुरुष उभा करण्याची संधी आहे. भारतातच नव्हे, तर इतर अनेक
देशात मोदींचे भारतीयइतर चाहते आहेत, ही
कल्पनेपलीकडची गोष्ट आहे. आपण फक्त एक सक्षम पंतप्रधान नाही तर कदाचित एक विश्वमार्गदर्शक बघतो आहोत. भारतातच नाही, तर इतर अनेक
देशात मोदी यांच्याकडे लोक आशेने बघन आहेत, यात काही शंका
नाही. एक भारतीय आणि त्यातून मोदी समर्थक म्हणून आपल्याला अजून किती काम शिल्लक
आहे, त्याचा आवाका काय आहे, ते डोळ्यासमोर उभं राहिलं.
विमानतळावरुन घरी यायला
पाउण तास लागला, आणि या सर्व गप्पांच्या
नादात तो कसा गेला तेच कळलं नाही. पुढचे दोन दिवस यावरच विचार सुरु होता. अमेरिकेत
येताना तिथल्या लोकांबद्दल- विशेषतः आफ्रिकन अमेरिकन लोकांबद्दल मनात काही स्टीरियोटाईप
आणि पूर्वग्रह करून आलो होतो- ते आत्तापर्यंत बऱ्याच प्रमाणात ढासळले होते- पण त्या
“सामान्य टॅक्सी चालकाबरोबर” झालेल्या बोलण्यानंतर तर ते पूर्णतः कोसळले आहेत. या
देशात खरोखर हिरे विखुरले आहेत.
No comments:
Post a Comment