अजून सकाळ झाली नाहीये. पहाटच आहे पण सकाळ व्हायच्या बाजूला पहाट कलते आहे. अंधारच आहे. उजाडण्याची अजून काही खुण दिसत नाहीये. पक्ष्यांचा किलबिलाट अजून सुरु व्हायचा आहे. छोट्याशा रस्त्याच्या एका बाजूला लावलेल्या सोडियम व्हेपर लाईट्स मुळे एका पिवळट छटेत सर्वत्र धुकंच धुकं दिसतंय. हावेत गारवा आणि थोडा ओलावा आला आहे. पहाटेचा गारवा चोरपावलांनी समोरच्या टेकडीवरून उतरून दबत दबत माळावरून पुढे चालतो आहे. तो दिसत नाहीये, पण तो आहे हे जाणवतंय. ते पहा- दिसल्या त्याच्या पाऊलखुणा? बघा बघा! वाळत चालेल्या गवतावर कसा दवबिंदू ठेऊन पुढे चालला आहे! हुडहुडी भरवतो आहे. आता हवेचा जडपणा जाणवतो आहे. कान खांद्यात लपवून आणि हात खिशात घालून आपण पुढे जातोय. तो ऐका, आवाज आला? मधेच येतो आहे. दूर स्टेशनवर कुठल्यातरी गाडीची निघण्याची वेळ झालेली दिसते आहे. स्टेशन फार लांब आहे हो इथून. किमान १० किमी. दुसरा आवाज आला.. आला तुम्हाला? ब्राह्ममुहूर्ताला उठून देव पूजा संपवून पर्वती वरचा पुजारी टोल वाजवतो आहे. ऐका..नीट ऐका. अरे देव सुद्धा लाखो भक्तांच्या तक्रारी आणि मागण्या ऐकायच्या आपल्या ड्युटीवर जायला निघालेत... आणि तुम्ही झोपून आहात? शुद्ध थंड ताजा हवेमुळे मन प्रसन्न होतंय...बाहेर पडा...शांतता काय असते याचा अनुभव येऊ दे...चिडीचूप शांतता आहे..
अशातच अचानक दूरवरून ती शांतता नष्ट होते आहे हे जाणवायला लागलंय. लांबवरून भगव्या वेशातला एक गृहस्थ येताना दिस्तोल. कोण एक बैरागी-गोसावी वाटतो आये. उत्तम सूर पकडला आहे. कान टवकारून त्याचं गाणं ऐका. कोणत्याही वाद्याची साथसांगत दिसत नाहीये, तानपुरा नाहीये, हां, त्याच्या एकतारी वर त्याने ताल धरलाय... लईला पकडून आहे... घट्ट... त्या थंडीत त्याचा खोल आवाज घुमल्यासारखा वाटतो आहे...छे छे! खरंच घुमतोय... का हा पण भास? कोमल रिषभामुळे मानेवरचे केस शहारे येऊन उभे रहात आहेत... अंगावर अक्षरशः काटा येतोय. ही काय वेगळीच जादू आहे? . हा कोण आहे? काय गातोय? ऐक नीट...
"मन सुमरत निसदिन तुम्हरो नाम..." आरे! ही तर खां साहेबांची चीज आहे. याला कुठून मिळाली?
"अब तुमही सवारो सगरे काम...."
" हूँ अवगुनी कछु गुन नाही मोमे...तुम्हारे शरन अब लियो विश्राम..."..." मन सुमरत निसदिन तुम्हारो नाम..."
खां साहेबांची चीज या भटकणाऱ्या माणसाला कोणी शिकवली? खांसाहेबंचीच गायन शैली वाटते आहे... कोण आहे हा? नक्की कोणीतरी असणार.. पण मग तो असा बैराग्यासारखा का भटकतोय?
माहिती नाही- तो गेला. कधीच गेला. गोसावी-बैरागी होता कोणीतरी. रागांमधला बैरागी कानात ठेऊन पुढे गेला... पाऊलखुणा...
Update- I put this post on Chat GPT, and here are the results:
No comments:
Post a Comment