अमर व्याध हा अमर हरिण तो मृगयेचा सोहळा
अजरामर हो दिगंतरातुन हा मुलुखावेगळा!
उरात रुतला बाण परंतु खंत मृगाला नसे
प्रकाश उधळित नील पथाने संथ पुढे जातसे!
तीर सोडूनी एक राहिला मुग्ध उभा पारधी
वाट पहातो हरिण, यायचा शर दुसरा तो कधी?
अमित युगांचे कण ओघळती मृगया नच हो पुरी
परस्परांच्या सौंदर्याचे दास्य जडे अंतरी!
विचित्र या मृगयेत शिकारी एकच शर सोडूनी
मृगामागुनी अगतिक हिंडे विद्ध स्वतः होऊनी!
-कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment