१९ सप्टेंबर २०१२- गणेश चतुर्थी निमित्त.
यंदा बरेच वर्षांनंतर गणेशोत्सवाला मी पुण्यात नाहीये. याची खंत जरी असली, तरी
या मुळे गणेशोत्सव माझ्यासाठी काय आहे याची जाणीव झाली. वर्षातून १० दिवस येणारा
बाप्पा सर्वच मराठी मनांवर अधिराज्य गाजवितो. घरांमधून, वाड्यांमधून व सोसायटी
मधून गणेशोत्सव साजरा होतो. पण तो छोट्या प्रमाणावर असतो. माझ्या नजरेतून पाहता
सर्वात मोठा गणेशोत्सव असतो तो पुण्यात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव.
लोकमान्यांनी स्वराज्यासाठी लोकांना एकत्र आणायचं माध्यम म्हणून सार्वजनिक
गणेशोत्सवाची सुरुवात केली. पुण्यातील भाऊ रंगारी गणेश मंडळ हे सर्वप्रथम
सार्वजनिक गणेश मंडळ. याची स्थापना झाल्यापासून पुणे शहरांनी या बाबतीत कधी मागे
वळून पाहिलंच नाही. आज सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या हजारांमधे आहे.
पुण्यासारखा गणेशोत्सव जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही. भव्य देखावे- त्यातून
सांगितल्या जाणाऱ्या ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक कथा. गाण्यांच्या ठेक्यावर
उघड-दाब करून नाच करणारी विद्युत रोषणाई, मानाच्या गणपतींची अस्सल पेशवाई थाटात
असणारी मनमोहक आरास, व दगडूशेठ गणपतीची भव्य मंदिरे, महाराष्ट्राच्या सर्व
कोपऱ्यामधून भक्तांचा पूर पुण्यात ओढून आणते. १० दिवस पुण्यात खरोखर गर्दी माजते.
पण त्याकडे कधी गर्दी म्हणून पहिलेच जात नाही. भक्तांच्या या मेळाव्यात बाहेर पडून
श्री गणेशाचे दर्शन घ्यायची मजा वेगळीच! पण देखावे, रोषणाई, गर्दी, काहीही असो,
गणेशोत्सव म्हणला कि पुण्याच्या ढोल ताशांचा आवाज कानी पडल्याशिवाय तृप्तता नाहीच!
पुण्यात ढोल ताशाच्या कडाडत्या नादातच गणपतीचे आगमन होते, व याच नादात त्याचे
विसर्जन. येतो तेव्हा आनंद व्यक्त करायला हे वादन. आणि जातो तेव्हा असं काही
वाजवून त्याला सोडलं जातं की पुढच्या वर्षी त्याने परत हा नाद ऐकायला लवकर यावं!
खरोखर, नादब्रह्माच्या उपासनेतील आगमन व निरोप ही जगावेगळी पुणेरी प्रथा! ढोल
ताशाच्या नादात पुणेकर अगदी हरवून जातो- मंत्रमुग्ध होऊन जातो. हा गजर फक्त
देवासाठीच नसतो, तर तो एक सामाजिक गजर असतो.
सध्या २ प्रकारची गणेश मंडळे निर्माण झाले आहेत. एक- परंपरा जपणारे, पारंपारिक
वाद्यांच्या नाद कल्लोळात रमणारे आणि दुसरे डीजे आणि डॉल्बीच्या वायफळ आवाजावर
दारूच्या नशेत अश्लील गाणी लाऊन “आयकोनोक्लास्टीक” म्हणता येतील असे -परंपरांना,
तत्त्वांना तडा घालणारे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोण कसे, याची स्पष्ट जाणीव
होते. एक सांगायला मात्र अभिमान वाटतो- आमच्या या पुण्यानागारीमध्ये डॉल्बी पेक्षा
ढोलावर रमणारे लोक ५० पट जास्ती असतील! गेली अनेक वर्ष या ट्रेंड्स लक्षात आल्या
आहेत. आमच्यासारखे युवा, देव म्हणला, की ढोल तशाच लागतो! सर्वात सुखाची गोष्ट
म्हणजे रात्री १२ नंतर स्पीकर्सची भिंत जरी बंद पडते. कायद्याप्रमाणे सर्व वाद्य
बंद पाहिजेत, तरी सुद्धा पुणेरी मनांना रात्रभर ढोल सोरू लागतो! खरच ही एक सुखद
गोष्टच आहे!
तसं पहिला गेलं तर पुण्यात ढोल ताशाची परंपरा निर्माण झाली यात काही आश्चर्याच
नाही. पुणे हे कायम विचारवंत क्रांतिकारकांचे शहर आहे. इथल्या मातीत मराठ्यांचा
इतिहास मिसळला आहे, याची जाणीव इथल्या लोकांना आहे. यामुळेच इथे परंपरा, संस्कृती
व वारसा जपणारी अजूनही माणसे आहेत. हा पुणेरी रक्तात उतरलेला वारसा छत्रपतींनी
शिकवलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा आहे. याच पुण्यनगरीमधे १७व्य शतकात स्वराज्याचा
जन्म झाला. त्याचा अंत देखील १८१८ मधे इथेच झाला. पुढची १५० वर्ष इंग्रजांनी आपल्या
संस्कृतीची विधुळवाट लावली व ती जवळपास नष्ट केली. मराठी स्वाभिमान हरवला होता.
टिळकांनी तो परत मिळवून दिला. शांतता आवडणाऱ्या इंग्रजांविरुद्ध दणका वाजवायचा,
त्यांना कानठळ्या बसल्या पाहिजेत, त्यांचे नियम आम्हाला मान्य नाहीत हे दाखवून
द्यायला ढोल वादनाची सुरुवात झाली असेल काय? असू शकेल, नक्कीच असू शेकल. आपल्या
देशात ५००० मैल लांबून शत्रू येऊन त्याचे नियम आमच्यावर लादतो, हे पुणेकरांना सहन
होणे अशक्क्य आहे! नक्कीच ढोल सुरु करण्यामागे काहीतरी असेच कारण असणार! टिळकांनी
प्रज्वलित केलेली ती स्वातंत्र्यज्योती ढोल-ताशांच्या माध्यमातून अजुन सुद्धा
पुणेकराच्या मनात पेटती ठेवली आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी शाळेच्या गणपती समोर लेझीम-टिपरी चे खेळ होतात. शालेय
मुलांवर संस्कृतीचा वर्षाव व्हावा, ते धर्मकार्य, समाजकार्य या साठी एकत्र यावे
हीच त्या मागची भूमिका असणार! आज देखील पुण्यात शाळांची पथके मोठ्या प्रमाणावर
मिरवणुकीत सहभागी होतात. विमलाबाई गरवारे प्रशाला, ज्ञान प्रबोधिनी, रमणबाग या
शाळांची पथके प्रसिद्ध आहेत. याच बरोबर रुद्र, शिवगर्जना, नादब्रम्ह,
समर्थप्रतिष्ठान, श्रीराम पथक, शिवतेज, स्वराज्य, स्वरूपवर्धिनी इ.अनेक ढोल पथके
कार्यरत आहेत. लहान वयापासूनच पुणेकरांवर हे ढोल पथकाचे संस्कार होतात. त्या
वयातील भरकटणाऱ्या चंचल मनांवर शिस्तीचे, धर्माचे, परंपरांचे, व एकीचे संस्कार होतात. लोकांना एक हेतू ठेऊन
एकत्र केलं जातं. अर्थात- एकजूट मनगटी तोडणे अवघड असते म्हणूनच! आमच्या सरांनी मला
हिच शिकवण माझ्या शाळेच्या पथकातून दिली. इयत्ता ५वी ते ९वी दर वर्षी मिरवणुकीत
सहभागी झालो. आज ढोल वाजवायचं- वाजव, आज झांजा वाजव रे- वाजवल्या, आज टिपरी, उद्या
लेझीम, आज काही नको करूस, फक्त पाणी आणायचं काम कर- जे काम असेल, ते करायची सवय
लागली. गणेशोत्सवाची गोडी याच मुळे लागली. हेच विचार घेऊन मोठा झालो. आणि तेच अजुन
देखील आहेत- म्हणूनच गणेशोत्सवाबद्दल हे प्रेम!
गेली ५ वर्ष अगदी न चुकता विसर्जन मिरवणुकीचा पूर्ण आस्वाद घेतला.
इंजिनीअरिंगच्या परीक्षा गणपतीत असायच्या म्हणून मात्र पथकात वाजवायची हौस राहून
गेली. पण बाहेरून सर्व पथके पाहता आली. सर्वांचे वेगवेगळे गजर, ठेके ऐकता आले.
सर्वांच्या नादोपासनेत रमता आले. पथकांमध्ये असलेला उतू जाणारा जोश, उत्सुकता
पाहता आली. सकाळी उन्हात ढोल बडवल्यावर रात्री पुन्हा वाजवायची ताकद येते कुठून! यावर
बराच विचार करायची संधी मिळाली.
असा एक विचार आला- की ढोल तशांसाठी एवढी ओढ का! का वाजवली जातात हे वाद्ये!
कदाचित आधी सांगितल्याप्रमाणे इंग्रजांना कानठळ्या बसाव्या म्हणून असेल. मुळात ढोल
ताशे ही हिंदू रणवाद्ये आहेत. विजयाचा जयघोष करायला वापरली जातात. क्रांतिकारक
विचारसरणी असलेल्या पुण्यात रणवाद्ये नाही वाजणार तर अजुन काय वाजणार! महाराजांनी
पुण्याच्या भूमीमध्ये अन्यायाविरुद्ध बंड मांडायचा मंत्र मनमोकळेपणे ओतला आहे.
पुढे नानासाहेबांच्या काळात याच पुण्यातून मराठ्यांनी अवघा हिंदुस्तानच जिंकला! या
सर्व घटनांना प्रेरणा मानणाऱ्या पुण्यातल्या तरुणाईला जोशाचे उधाण येते हे
स्वाभाविक आहे! ढोल वादनातून त्या इतिहासाला प्रज्वलित केले जाते, व त्या
इतिहासाला आदर्श मानून साध्य स्थिती मधे सुधारणा घडवून आणायचे एक मध्यम बनते.
सुधारणा करायची म्हणली की आपला आवाज आला पाहिजे- म्हणूनच हे ढोल ताशे हवे! उभ्या
महाराष्ट्रात मुद्दा मांडण्यासाठी या सारखा नादघोष कुठेही होत नसेल!
ढोल ताशाच्या कोणत्याही खेळाची सुरुवात होते ती छत्रपतींना मानवंदना देऊनच.
अर्थात हक्काने डंका पिटायची आज्ञा आपल्याला त्यांनीच दिली आहे! प्रभू रामचंद्र,
मारुती, तुळजा भवानी, खंडोबा, या देवांचे स्थान सुद्धा बरेचदा महाराजांनंतर असते!
ते काही असो, या सर्वांना मानवंदना देऊन खेळाची सुरुवात होते. ढोल ताशाच्या
पहिल्या गजरावारच छत्रपतींचा, महाराष्ट्राचा, हिंदुराष्ट्राचा भगवा ध्वज आसमंत
भिडतो! चढत्या उत्साहात तो नाचवला जातो. घोषणा, शंखध्वनी, ढोल-ताशांचा नाद व मागे
असलेल्या गणेशाच्या आधारावर हा ध्वज बेडरपणाने अवघं गगनाच भेदू पाहतो!
स्वातंत्र्याची निशाणी आहे ही आमची! भीत नाही आम्ही कोणालाही हे सर्व जगाला
खडसावून सांगणाऱ्या ध्वनींवर हा ताठ मानेने झुलत असतो! आज रणवाद्यांवर आमचा झेंडा
नाचतोय...पण उद्या कोणी त्याच्याकडे वाकड्या नजरेने पहिले, तर वाद्य सोडून खड्ग
हातात घेऊ! अशी जाणीव निर्माण करून देणारा तो क्षण असतो!
आज “वेस्टर्न कल्चर” च्या नावाखाली आपल्या देशाच्या “identity”ची होळी व्हायची वेळ
आली आहे. या पाश्चात्य संस्त्कृतीला झुगारून देऊन एक भारतीय identity निर्माण करायची गरज आहे. दोन व्यक्तींमध्ये सुरु असलेला संवाद ऐकलं की असे
लक्षात येते की अर्ध्याहून अधिक शब्द इंग्रजी आहेत. क! दर वेळेस कोणत्याही
गोष्टीकडे पाहताना इंग्रजांच्या, अमेरिकन लोकांचा चष्मा लाऊन पहायची काय गरज आहे!
भारतीय दृष्टीकोन अस्तित्वातच नाहीये क? आहे! पण विकाऊ मिडिया, भारतीय सिनेजगत इ
घटकांच्या आधारे जे आपले नाही, तेच आपल्यावर लादायचा प्रयत्न होतो. डीजे च्या
ठेक्यांवर देवासमोर हिडीस नाच करायचा हि आपली संस्कृती नाही- पण दुर्दैवाने ते
आपल्या देशात आज घडतंय! इंग्रजी मधे विचार करणे, हा दुसरा मुद्दा! आज वेळ या अशा
सांस्कृतिक आक्रमणाला झुगारून द्यायची आहे. त्यासाठी ढोल-ताशा पथकांची भूमिका
महत्त्वाची आहे. यांच्या नाद उपासनेतून निघणाऱ्या ध्वनिलहरींच्या जोरावर भारतीय
तरुणांमध्ये रक्त सळसळते. ते सळसळणारे रक्त चांगल्या कामासाठी वापरलं गेलं पाहिजे!
केवळ गणपतीतच नाही, तर प्रत्येक हिंदू सार्वजनिक सन सोहोळ्याच्या दिवशी
ढोल-ताशे-नगरे वाजवले गेले पाहिजेत. जेव्हा हि वाद्य गर्जना होईल, तेव्हा
आमच्यासारखे तरुण नक्कीच एकत्र येतील! आणि एकदा एकत्र आले, की मग आमच्याकडे
वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही कोणाची!
समाजकल्याण अन राष्ट्र उद्धार हेच आपले विचार पाहिजेत. गणेशोत्सव व त्यात
वाजवले जाणारे ढोल ताशे हे तरुणाईला एकत्र आणायचे माध्यम आहे- एक वेगळी भारतीय identity द्यायची क्षमता यात आहे! प्रेरित करायची ताकद यात आहे. ढोल-ताशे आवाज नाही
करत, ते गरजतात- आणि आज आपल्या देशाला आज या गर्जनेची गरज आहे!
-माझा मित्र आकाश चौकसे याचे मनापासून आभार!
No comments:
Post a Comment