Pages

Monday, 3 December 2012

मुंबई-पुणे-मुंबई.

मला अगदी १०० टक्के खात्री आहे,की या लेखाचे शीर्षक पाहून माझे मित्र, मुक्ता बर्वे-स्वप्नील जोशी-सतीश राजवाडे कृत, याच नावाने असलेल्या सिनेमा व त्यातील कथेवरून माझी यथेच्छ घेणार आहेत व माझं डोकं खाणार आहेत. काय करणार- हा चित्रपट आहेच असा! (मला फारच आवडतो- अगदी माझी स्टोरी पण अशीच होऊदेत असं देखील कितीदा वाटलं आहे!!). एकतर पुणे विरुद्ध मुंबई असा कधीही न संपणारा वाद. त्यातून मुंबईची महाआगाऊ मुलगी(सगळ्या मुंबईच्या मुली जन्मतः भयानक आगाऊ असतातच- त्यांना उगाच वाटत असतं आपण फारच भारी आहोत!) , आणि १०० टक्के पुणेकर मुलगा(अगदी रिलेट करता येतं त्याच्याशी- माझ्यासारखाच म्हणा ना!) यांच्यात होणारी तू-तू-मै-मै आणि एकमेकांना समजून घेताना एकमेकांची केलेली हटाई व मारलेले टोमणे या मुळे प्रत्येक वेळी हा सिनेमा पाहताना मजाच येते. आता तर इतके वेळा बघितला आहे(काउंट खरंच विसरलो आहे-  तरी ५० वेळा आरामात), की संभाषणासकट सिनेमा पाठ झाला आहे. हा चित्रपट केवळ एक "सिनेमा सिनेमा"  नसून, आमच्यासारख्या "bachelor" पुणेकर मुलांसाठी मुंबईच्या पोरींना कसं पटवायचं हे शिकवणारा एक गुरुमंत्रच आहे. (किती सुरेख कौशल्याने स्वप्नील जोशी मुक्त बर्वेला पटवतो या सिनेमा मधे!! शेवटी ती ट्रेन निघताना जी काय लाजते ना!! बस्स... जिंकला पोरगा तिथेच, आणि मी स्वतःच्या पायावर धोंडा काय, कुऱ्हाड मारली आहे!)


(या सिनेमा मधल्या धमाल क्षणांचं एक कोलाज असणारं माझं अतिशय आवडतं गाणं!!)

चिमणबागेतील शूटिंग पाहता हा पोरगा आमच्यासारखा अस्सल सदाशिव पेठी आहे, याद वादच नाही. भिकबाळी तर आहेच!(त्याची बघूनच मी घातलीये असे बरेच जण मला म्हणतात पण तसं काही नाहीये! माझी स्टाईल एकदम ओरिजिनल आहे!) मुलगी तिच्याकडे बघून बहुदा दादरची असावी असं वाटतं. या आमच्या पुणे ३० च्या बंधूंनी जे चित्रपटात जे किडे केले आहेत, मी अगदी तसेच किडे करणार आहे.- आता कळालच असेल की मित्र का खेचणार आहेत माझी- असे विचार असणे, आणि ते अश्या प्रकारे लिहिणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखेच आहे ना!.) असो... अजून या चित्रपटाबद्दल बडबड न करता मूळ मुद्द्यावर येतो. काय आहे, ह्या सिनेमाचं कौतुक केल्याशिवाय मुंबई आणि पुणे एकाच लेखात येऊच शकत नाही. पण चित्रपटाचा उल्लेख इथेच संपतो. मी "मुंबई-पुणे-मुंबई हे शीर्षक जरा वेगळ्याच कारणासाठी वापरलं आहे.

सध्याच्या "ग्लोबलायझेशन" च्या जमान्यात प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात फिरतीचे योग येतातच. पूर्वीच्या काळात मुलगा ग्रॅज्युएट झाला, की तो बहुदा त्याच शहरामध्ये- जास्तीत जास्त त्याच राज्यामधे नोकरी निमित्त राहायचा. सध्या ती स्थिती राहिली नाही. प्रत्येक कंपनीच्या अनेक शहरांमध्ये शाखा असतात, त्यामुळे पुण्यातून पदवी मिळाली असली, तरी नोकरी बंगलोर, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, कुठेही असू शकते. एक वेगळंच एक्स्पोजर आम्हाला मिळते. मी सद्ध्या सिंगापुरात जरी असलो, तरी माझी अभियांत्रिकीनंतरची पहिली नोकरी मुंबई मधे होती. मुंबई पुण्यापासून फार काही लांब नाही- आणि आता एक्सप्रेस वे मुळे जायला पण वेळ फारच कमी लागतो. त्या बाबतीत मी खरंच लकी होतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. ते या साठी की शनिवार रविवार घरी जाता यायचं! (आजोळी राहण्याचे इतर अनेक फायदे पण असतात जे मुंबई मधे राहून मिळाले सुद्धा! :P, आणि विजयनगर कॉलनी सारख्या कॉलनीत राहण्याची मजा सुद्धा वेगळीच!- पण ते किस्से नंतर कधीतरी लिहीन.)

 मुंबईमध्ये राहणाऱ्या मुंबईकरापेक्षा मुंबईत कामाला असलेल्या पुणेकराला शुक्रवारचं महत्व जास्ती लवकर कळत असं माझं ठाम मत झालं आहे. एखादा टिपिकल आयटी प्रोफेशन मधे असणारा मुंबईत राहणारा मुंबईकर ज्या आतुरतेने शुक्रवार संध्याकाळची वाट दारू पिण्यासाठी पाहतो, त्यापेक्षा कित्येक पटीने एक पुणेकर आतुरतेने वाट बघत असतो ती घरी जायची. सोमवार सुरु झाला, की शुक्रवारचं काउंटडाऊन सुरु आणि शुक्रवार उजाडला कि ५ वाजण्याचं काउंटडाऊन  सुरु. ५ वजता होणारा आनंद तर विचारूच नका! मुंबईत काम करणाऱ्या पुणेकरांसाठी शुक्रवार ५.३० ला न संपता ४.३० - जास्तीत जास्त ५ ला संपतो. (माझी तर न चुकता ४.४५ ला कलटी असायची!) शुक्रवारी ऑफिस संपलं की स्वारी ना ना तऱ्हेने पुण्याला रवाना! या पोस्ट मधे प्रवासवर्णन लिहिणार नाहीये, पण ज्या काही विवध पद्धतीने मुंबईहून बाहेर पडून घरी गेलो, त्या लिहिण्याचा एक प्रयत्न करतोय.

आमचं ऑफिस पवईला होतं. पण पहिला १ महिना ट्रेनिंग मरोळला असायचं. ते ५ ला संपलं, की आधी ६ पर्यंत घरी. आवरून, कपडे भरून निघायला ७.३०. अंधेरीहून जलद लोकल पकडून १० मिनिटात दादर गाठणे व तिकडून शिवनेरी घेऊन औंध ला परिहार चौकात उतरणे असा २ आठवडे कार्यक्रम सुरु होता. २७० रुपयांची शिवनेरी तशी बरी वाटायची. रात्री ११ च्या सुमारास पुण्यात हजर. परत जाताना मात्र रविवार संध्याकाळची  बोरीवलीची गाडी पकडायचो. ती घेऊन पार्ल्याला गरवारेपाशी उतरून १० मिनिटात चालत घरी.(एकदा या गाडी मधे चेंबूर जवळ असताना फारच गाढ झोप लागली होती- सुदैवाने हनुमान रोडच्या थांब्यावरून बस निघत्ये तेवढ्यात जाग आली होती- उतरायचो न त्या ठिकाणी!.) या दादर-पुणे-पार्ले प्रवासामुळे घरी जाता यायचे, पण फारच घाईगडबड उडायची व जनरलीच पुण्यात कमी वेळ मिळायचा. त्यामुळे २ आठवड्यानंतर जरा मार्ग बदलला.

१ महिन्यानंतर मेन ऑफिस मधे शिफ्ट झालो होतो. पवईवरून दादरला येण्यापेक्षा मुलुंड ला जाऊन ठाणे-स्वारगेट शिवनेरी घ्यायचो(मरोळच्या ट्रेनिंग सेंटर मधे असताना पण एकदा हे केलं होतं.. मरोळ-घाटकोपर रिक्षाने व घाटकोपर-मुलुंड लोकलच्या फर्स्ट क्लास मधून असा प्रवास! काय धांदल उडाली होती म्हणून सांगू! लोकल मधून तुमच्याबरोबर एखादी मुलगी येत असेल, तर खरोखर डोक्याला तापाच आहे, हे शिकवलं या प्रवासाने! किती किती नाटकं असतात यांची!!). ऑफिसातले अनेक पुणेकर एकत्र जायचो.(एकदा ऑफिस मधून १ रिक्षा मधे ४ लोकं सामानासकट कोंबून मुलुंड ला गेलेलं आठवत आहे.- श्रुती पाटकर तुमच्याबरोबर प्रवास करत असेल, कि तिच्या बसायच्या जागेवर एखादं झुरळ सोडलं की किती आरडा ओरडा होऊ शकतो, हे अनुभवलं या प्रवासात!) २ महिने शिवनेरीने प्रवास केल्यावर असं जाणवलं की दर शनिवार रविवार घरी जायला हे परवडत नाही! (तिकीट २७० वरून वाढून आधी ३२० आणि मग जवळपास ३८० झालं होतं) आता मात्र अस्सल मध्यमवर्गीयासारखा जाताना शिवनेरी सोडून १२० रुपयांची एशियाड घेऊ लागलो.(येतानाचा रूट फिक्स होता-आयडीयल कॉलनी ते गरवारे.) यात पण कमाल मजा केलीये.एक्सप्रेस वेवरच्या धाब्यावर उभं रहून धो धो पडणाऱ्या पावसात गरम गरम कांदा भाजी आणि चहा पिण्याची एक वेगळीच मजा असते. एशियाड लोणावळ्याला जाते- तिथे सप्टेंबर मधे वाटणारा गारवा सोसत गरमागरम बटाटेवडे खाण्यात पण एक वेगळीच मजा आहे.

रिझर्वेशन असताना शुक्रवारी घरी जाता येत नाहीये हे कळल्यावर जी चिडचिड होते, ती पण एकदा झाली होती. नेहेमीप्रमाणे ५ ला काम उरकून निघतच होतो, तेवढ्यात माझी बॉस आली आणि "आज एक डिलिव्हरेबल ड्यू आहे, आणि सगळ्याची फाटलीये, आणि प्रोसेस फक्त तुला माहित्ये. (जामा नावाचं एक डोक्यात जाणारं टेस्ट सायकल टूल होतं. किती किचकट आहे ते वापरणं, फोर्च्युनेटली/उन्फोर्च्युनेटली आमच्या टीम मधे मला एकट्याला हे वापरता येत होतं!!) त्यामुळे ते केल्याशिवाय तू जाऊ नकोस व इतरांना पण जाऊ देऊ नकोस" असं सांगून स्वतः घरी गेली. असला राग आला होता सांगतो तुम्हाला! [शिवनेरीच्या बुकिंग चे ३२० रुपये तर गेलेच, वर याचं काही कॉम्पन्सेशन नाही! उशिराची गाडी घ्यायची, म्हणजे अजून ३२० रुपयांचा बांबू, आणि खिशात ३२० काय, साधे ५० रुपये नाहीत! (एटीएम कार्ड घरी विसरलो होतो!!)(एक अस्सल कोकणस्थ असल्यामुळे फुकट अश्या काही कारणांसाठी पैसे वाया गेले, कि डोकंच उठतं!)] बर दुसऱ्या दिवशी अनंतचतुर्दशी, म्हणजे काहीही करून पुण्यात पाहिजेच! आयटी क्षेत्रात हे खूप वेळा पाहिलं आहे- आपले बॉसेस व सिनियर्स त्यांना लवकर जायचं असलं, की त्यांचं सगळं काम आपल्या डोक्यावर टाकून सरळ निघून जातात. स्वतः इतके शुंभ असतात- की धड एकही प्रोसेस त्यांना माहिती नसते. मी काम संपवायचं म्हणून जो त्यावर तुटून पडलो, मला बाजूचं भानच नाही राहिलं काही! नंतर असं जाणवलं, की हे सगळे सो कॉल्ड एक्स्पर्टस सर्व काम माझ्यावर टाकून निघून गेलेत! मी १ आठवडा भर आधी सांगूनसुद्धा ऐनवेळी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून हे सगळेजण मात्र ६-६.३० ला सटकले होते. ८ ला ऑफिस बस असते. त्यामुळे त्याचा आत सगळं उरकून बॉस ला ईमेल करून थेट त्या बसने दादर गाठले. पण सर्व गाड्या फुल होत्या- शुक्रवारी हाच एक प्रॉब्लेम होतो. शेवटी रात्री १०.३० च्या गाडी मधे एक जागा आहे म्हणल्यावर पुढचा मागचा विचार न करता ३२०चं तिकीट काढलं(नशिबाने गायतोंडे माझ्याबरोबर होता व त्याच्याकडे मला पुरातील एवढे पैसे होते! काही काही मित्रांना म्हणूनच कधीही विसरू शकत नाही- त्यातच हा आदित्य!). १०.३० ची गाडी पुण्याला पहाटे ३ ला पुण्याला पोहोचली. ८-३ या ७ तासांमध्ये मी माझ्या बॉसला जेवढ्या शिव्या घातल्या, तेवढ्या कदाचित आयुष्यात कोणालाही घातल्या नसतील! नोकरी करताना सिनियर्स व बॉसच्या या वागण्याला वैतागून मी नंतर ठरवले, की घरी जायचं असेल तर या कार्ट्यांना शुक्रवारी सकाळीच विचारायचं कि आज काही ड्यू आहे का- आणि असेल, तर ते आत्ताच सांगा!! नसेल काही, तर मी तुम्ही ऐनवेळी काही देण्याआधी ४.४५ ला सटकतोय, असाच एक निर्धार केला! असो. अनुभव एक एक!!

एकदा शुक्रवारी एक डिलिव्हरेबल ड्यू होतं म्हणून शनिवारी सकाळी घरी जायचं ठरलं. एक चेंज म्हणून एशियाडनी न जाता सकाळी इंद्रायणी एक्सप्रेस घेऊन ४ तास जनरलच्या डब्यात दाराजवळ उभं राहून गेलो होतो. सॉलिड मजा आली होती. सकाळी ५.५० ची इंद्रायणी गाठायची, आणि रिझर्वेशन नव्हतं. त्यातून माझ्या रूम मेटनी सांगितलं की सकाळी गर्दी असेल, म्हणून ४ वाजता ची अंधेरीहून सुटणारी पहिली लोकल घेऊन दादर ला गेलो होतो. २ मिनिटात तिकीट मिळालं होतं, आणि नंतर मी ४.३० ते ५.५० ही ८० मिनिटे दादर स्टेशनाच्या प्लॅटफॉर्म ३ वर बसून माशा मारणे, त्या वेळात दादरला येणाऱ्या गाड्या व त्या ओढणारी इंजिन यांची एक लिस्ट बनवणे किंवा सकाळी भैया लोकांचे होणारे फालतू संभाषण ऐकणे असे नसते उद्योग करत होतो. ऐनवेळी तिकीट काढल्याने जनरल चं मिळालं होतं. मुंबई-पुणे ट्रेनच्या जनरलच्या बोगी मधे शिरणं म्हणजे दुष्काळग्रस्त भागात विहिरीवर होणाऱ्या मारामारी सारखंच. शिरू का नाही असा प्रश्न पडला होता, पण एकदा ठरवलं रेल्वेनी प्रवास करायचा कि त्या गर्दीचं काही वाटत नाही.(मुंबई लोकल मुळे तशी सवय झाली होती.) गाडी आल्या आल्या आत शिरलो, व दाराजवळ एक जागा मिळवली होती. रेल्वे घेऊन पुण्याला जाताना फारच मजा येते. कर्जत चा वडापाव, लोणावळ्याला चिक्की, गाडीत मिळणारा चहा अश्या खादाडी मधे, आणि घाटातली हिरवळ(नैसर्गिक-जनरल बोगी मधे अजिबात "हिरवळ" नसते!) बघत ४ तास कसे गेले ते कळलच नाही. रेल्वेच्या दारात उभं राहून दुसऱ्या बाजूला कोणती गाडी गेली, किंवा कल्याण, दिवा, अश्या जंक्शनला रूळ कसे बदलतात, ते कुठून कुठे कसे जातात, गाडी १ नंबरच्या platformवरून ८ नंबरच्या रुळावर कशी क्रॉसकरून जाते, किंवा कल्याण बाहेर एसी-डीसी कन्व्हर्जन कसे करतात हे जाणून घेण्यात मला भलताच इंटरेस्ट आहे- त्यामुळे रेल्वेमधून कधी प्रवास घडतोय याची वाट बघतच असतो. नोकरी करताना हाच प्रवास सर्वात आवडता ठरला!!

रेल्वे जरी आवडता मोड ऑफ ट्रान्सपोर्ट असला, तरी शुक्रवारी निघायचं म्हणलं की रेल्वेच्या नावानी बोंब असायची. डेक्कन क्वीन सोडा, प्रगती पण नाही मिळायची. म्हणून बस. पण बस चा पण कंटाळा आला होता. शेवटचे २ महिने मी व माझे रूममेट्स, जे सगळे पुण्याचे होते,(माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे आणि!) मंदार च्या गाडी मधून पुण्याला यायला लागलो होतो. सगळ्यात जास्त मजा इथेच केली. ४.३० ला ऑफिस मधून केलेले पलायन, नॉन स्टोप अडीच तासात पुणे गाठणं, शुक्रवारी रात्री घरी जेवणं, म्हणजे कमाल! मंदार, संदीप, संदीप चे बॉस- मराठे, व मी ठरलेली मंडळी होतो. एका गाडीत ५ जण बसून पुण्याला. घाटामध्ये ट्रक वाले हमखास फास्ट लेन मधे ट्रक घालणार हे निश्चित असायचं. जेवढं त्याचं लेन मोडणं निश्चित होतं, तेवढंच मराठे त्या ट्रकवाल्याच्या आई, मावशी, बहिणी व इतर कित्येक स्त्रीलिंगी व नपुसकलिंगी नातेवाईकांची व त्यांच्या डे-टू-डे लाईफची  येथेच्छ आठवण काढणार हेही निश्चित असायचं. ट्रकवाल्यांच्या या घाटातील डांबिसपणावर व कोणता डांबिसपणा केल्यावर काय म्हणून ट्रकवाल्याला हाक मारायची यावर मराठे एक पुस्तक लिहू शकतील. मराठे बरोबर असले, की धमाल असायची. त्यांच्या नादाने आम्ही सगळेजण सुद्धा ऑफिस मधले सगळे राग व वैताग त्या बिचाऱ्या व निष्पाप(!!??) ट्रकवाल्यांवर काढायचो! सोमवारी सकाळी परत मुंबईला जाताना हीच मजा असायची, पण नव्हेंबरच्या थंडीमध्ये पहाटे ५ वाजता पुण्याहून कुडकुडत  स्वेटर, कानटोपी, हातमोजे घालून निघायची मजा निराळीच होती. डिसेंबर २०११ च्या सुरुवातीला मी मुंबई च्या नोकरीचा राजीनामा दिला, व पुण्यालाच आलो व माझे हे मुंबई-पुणे-मुंबई दौरे बंद झाले.(नंतर महिन्याभराने सिंगापूरलाच आलो.)

बरोबर १ वर्षापूर्वी ३ डिसेंबरला मी मंदारच्या गाडीतून शेवटचा मुंबई-पुणे-मुंबई हा प्रवास केला होता.आज सिंगापूर ला येऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झालं आहे,पण एकदाही इतका थ्रिलिंग प्रवास घडला नाहीये.(सिंगापूर-मुंबई-पुणे हा प्रवास करताना मनात वेगळ्याच भावना असतात, व त्या या भावनांशी नक्कीच एकमत नाही होऊ शकत.) इथे सिंगापूर मधे सगळं मिळत, पण मुंबई-पुणे-मुंबईच्या प्रवासात होणारे किस्से मिळत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी पण खूप आनंद देऊन जातात. ६ महिने न चुकता केलेल्या या मुंबई-पुणे-मुंबई प्रवासाने मला केवढं शिकवलं आहे व किती आनंद दिला आहे!. "इंडिपेंडंट" असणं म्हणजे काय. प्रवासात होणाऱ्या धांदली, एखाद्या छोट्याशा झुरळापासून १२०किमि नी जात असताना अचानक बेडकाने गाडीवर उडी मारली या मुळे होणारा जोक व आरडा ओरडा(बहुदा तो उगाच भीतीपोटी असतो!) वेळेचं नियोजन, ऑफिस मधून सफाईतपणे बॉसला न कळता/ बॉस अजून जास्ती काम देण्याआधी कसं निसटायचं असं बरंच काही शिकवलं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे, घरी जायची ओढ लागली, आणि जायचे वंदे झाले, की एखादा माणूस किती तळमळतो व ती सिच्युएशन कशी हँडल करतो, हे माझ्या स्वतःच्या व ट्रेन, बस व मंदारची गाडी या सर्व ठिकाणी भेटलेल्या सहप्रवाशांना आलेल्या अनुभवातून शिकायला मिळाले. श्रुती, अलोक, मृणाल, पूजा, शरद यांच्यापारोबर शिवनेरीतला फालतूपणा असो, नाहीतर एशियाड/इंद्रायणी मधे एकट्याने प्रवास करताना अनुभवलेली शांतता व निसर्गातला गारवा असो, नाहीतर मंदारच्या गाडीत मंदार, सुशांत, शिरीष काका, संदीप, मराठे यांच्यासोबत केलेला कल्ला असो- एक एक अविस्मरणीय अनुभवच होते ते! खरोखर, धान्य तो माझा मुंबई-पुणे-मुंबई प्रवास...असो... आठवणी जरा ताजा करूया म्हणलं...



(इथे हे खरंच खूप जास्ती मिस करतो- पण सगळ्यात जास्त मिस करतो ते म्हणजे मराठे आणि संदीप ज्या प्रकारे मनमोकळेपणाने ट्रकवाल्यांना शिव्या घालायचे, ते... तोडच नव्हती त्याला.. अनुभवाच एकदा हा प्रवास- मग कळेल मी असं का म्हणतोय ते!)

5 comments: