गेल्या रविवारी अनेक वर्षांनी सह्याद्रीत भटकायचा योग पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आला. गेली काही वर्षे भारताबाहेर असल्याने किंवा भारतात असलो तर ऑफिसग्रस्त असल्याने ट्रेकिंग हा छंद जरा मागे पडला होता. बाकी काही म्हणा... ऑफिसात बसून माणूस रग्गड कमावतो- पैसे आणि पोट दोनीही. माझ्याबाबतीत म्हणाल तर दुसरा मुद्दा अगदी यथार्थ बरोबर आहे. काम करून कोट्याधीश झालो नाहीच उलट थोड्याफार प्रमाणात पोट्याधीश नक्कीच झालोय! ५ वर्षांचा आळसाचा वारसा घेऊन सुटलेल्या ढेर्यांनी डोंगर चढायचा म्हणजे जरा बेताचंच म्हणायचं. वर पोहोचू का नाही ही शंका तर होतीच! त्यातून तोरणा चढणं म्हणजे एका अर्थी स्टंटबाजीच म्हणायची...पण, लहानपानापासून या डोंगरांमधून भटकण्याची सवय आहे, त्यामुळे स्वतःची परीक्षा म्हणून वरपर्यंत जायचच असा एक अट्टाहास होता.
रविवारी पहाटे ४.४५ ला घराबाहेर पडलो होतो. इथून थेट वेल्हे गाठायचं होतं. पहाटेच्या अंधारात पुण्याचा रिकाम्या रस्त्यांची शांतता अनुभवणं म्हणजे एक चमत्कारच मानावा! गजबजलेल्या सिंहगड रस्त्यावर एकही गाडी नाहीये हे बघून खूपच आनंद झाला. थोडं उजाडेपर्यंत आम्ही पाबे घाटात पोहोचलो होतो. गेल्या काही दिवसात हा परिसर पावसात न्हाऊन निघाला होता. त्यामुळे नव तृणांनी हिरव्या गालिच्यात गुंडाळल्यासारखा वाटत होता. डोंगरउतारावर लहानमोठे धबधबे खळखळून कोसळत होते. भात पेरणीला नुकतीच सुरवात झाली होती, त्यामुळे सर्वत्र पाण्यानी भरलेली शेतजमीन आणि त्यात भाताची होणारी लागवड, आजूबाजूला मधूनच दिसणारी कौलारू घरं असं एक सुंदर निसर्गचित्र सतत साथीला होतं. अमेरिका देश महान जरी असला तरी तिथे ही मजा नाही. आपल्या मातीचा रंग आणि गंध आपल्या मनात घर करून असतो-त्यामुळे इथून दूर जाण्याची खंत फार मोठी असते. त्यात अमेरिकेत हे रंग आणि गंध अनुभवायला मिळण अशक्य! मग आपसूक विचार यायला लागतात- ज्या देशात जांभूळ, करवंद, फणस आणि आंबे मिळत नाहीत, त्या देशाला गर्व करायचा कोणताही अधिकार नाही- नापास आहे तो देश!
पास नापासाचा विचारातून सद्यस्थितीत लगेच परतलो तो नुकताच एक निसर्गवर्णनाचा संस्कृत श्लोक वाचला होता त्याच्या आधाराने. आज त्याचे शब्दशः प्रात्यक्षिक बाहेर बघायला मिळत होते.
स्थलीभूमिर्निर्यन्नवकतृणरोमाञ्चनिचय-
प्रपञ्चैःप्रोन्मीलत्कुटजकलिकार्जृम्भितशतैः|
घनारम्भे प्रेयस्युपगिरि गालन्निर्झरजल-
प्रणालप्रस्वेदैः कमपि मृदुभावं प्रथयति||
 |
शुद्रकाचे शब्दशः वर्णन!
|
हा बहुदा शुद्रकने लिहिलेला असावा- पण नक्की माहित नाही. शिखरिणी वृत्तात बांधलेला हा श्लोक अक्षरशः डोळ्यासमोर चोहीकडे दिसत होता. पृथ्वी एखादी सुंदर स्त्री आहे, जी तिचा प्रियकर पाऊस याची वाट पहात आहे, त्याची पहिली चाहूल लागताच गवतरूपी रोमांच तिच्या अंगावर उभे राहिलेत, तिचं आश्चर्य व्यक्त करायला शेकडो कुडाची फुले उमलायला लागली आहेत. आपल्या प्रियकराच्या आगमनाने घामाघूम झालेली सृष्टी अंगाच्या डोंगरांवरून निर्झररुपी घाम गळू लागली आहे, आणि तो येतोय हे लक्षात येऊन अतिशय मृदुभावे प्रसन्नता पसरवत आहे असा काव्यात्मक अर्थ एके ठिकाणी वाचला होता. काल्पनिक अतिशयोक्ती जरी बाजूला ठेवली, तरी शब्दशः भाषांतरानुसार पावसाळ्यात नवीन तृण लपेटून उभी असलेली शेतजमीन, नुकत्याच उमललेल्या शेकडो कुडाच्या फुलांमधून दरवळणारा सुगंध, डोंगरउतारावर पावसामुळे निर्माण होणारे झुळझुळणारे निर्झर या सर्वामुळे सर्वत्र प्रसन्नता पसरते हा सरळ सोपा अर्थ सुद्धा एक विलक्षण चित्र उभं करतो.
पाबे घाट ओलांडून ६.३० च्या आसपास आम्ही वेल्हे गाठले होते. गावात जुन्या मराठी पद्धतीने चौथर्यावर बांधलेली दगडी घरं पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. बदलत्या काळानुसार वाळीत टाकलेल्या आणि कालबाह्य ठरवल्या गेलेल्या काही परंपरांमध्ये ही देखील एक दुर्दैवी गोष्ट- त्यामुळे जुनं बांधकाम बघितलं की छान वाटतं. अशाच चौथर्यावर बांधलेल्या एका टपरीवर चहा पोह्यांचा नाश्ता करून गड चढायला सुरवात केली.सुरवातीलाच एक खळखळणारी कुठलीतरी मावळगंगा वाहात होती- तिच्या आवाजातल्या गतीचा ताल घेऊन आमची चढायची गती ठरवली- आणि आम्ही सुसाट सुटलो!
 |
वेल्हे गावात बाबा |
 |
मावळगंगा! |
गडाचा पहिला टप्पा सिमेंटच्या रस्त्यावरूनच चालत होतो. त्यामुळे फार काही मजा येत नव्हती. तरी आजुबाजूच्या वातावरणाचा आनंद घेत धबधबे मोजत पुढे जात होतो. रस्त्याच्या दोनही बाजूला ऐनाची अनेक झाडं दिसत होती- कळ्या, फुलं आणि फळांनी लगडलेली. त्यासोबतच असंख्य प्रमाणात बूचपांगारा! पावसाळ्याच्या सुरवातीला पूर्ण पट्टा लाल फुलांनी बहरलेला असणार! जायला हवं तेव्हा!
 |
वाटेतला धबधबा! |
 |
तोरण्याच्या वाटेवर |
 |
गलन्निर्झरजल! |
 |
वाटेत सापडलेलं एका प्रकारचं Orchid |
चढता चढता एका चौथऱ्यावर एक मारुतीची मूर्ती दिसली. थोडं पुढे काही सतीशिळा देखील होत्या. पण अर्ध्या रस्त्यातला तो मारुती बघून अंगात बळ संचारलं. आमची सगळी दैवतं अशी रांगडीच असतात. त्यांना संगमरवरी महाल आणि मंदिर लागत नाहीत. मंदिर बांधायचच झालं तर काळ्या कातळात, नाहीतर सुसाट वाहणारा वारा हेच चार खांब आणि अस्ताव्यस्त पसरलेलं आकाश हेच त्याचं छत! चुकुन एखादा वड-पिंपळ-उंबर असतो- तुम्हा आम्हा सामान्यांना सावलीसाठी. मारुतीरायाचे आशीर्वाद घेऊन नव्या बळाने पुढे निघालो. दुतर्फा हिरवळ होती. धो धो धबधबे होते. म्हणता म्हणता पहिल्या पठारावर पोहोचलो. इतका वेळ डोंगराच्या आडोशाला होतो त्यामुळे वारा बाधक असेल असं वाटलं नाही- परंतु इतका सुसाट वारा आयुष्यात कधीही अनुभवला नव्हता! दोनदा मी उडून जातो की काय असा विचार देखील आला! कमकुवत मनाचा असतो, तर कदाचित इथे हार पत्करून मागे वळलो असतो- अनेक लोक घाबरून मागे फिरत पण होते- पण लहानपणीचे संस्कार इथे कामी आले!
 |
आमची रांगडी दैवतं |
"सह्याद्रीत फिरताना त्याला आदर देऊन फिरलात तर सह्यपर्वत तुमच्या कानात स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा आणि क्रांतीचा मंत्र फुंकतो." हे बेडेकरांचे शब्द मनावर कोरले गेले आहेत. अवघा भारत यवनांनी ग्रासला असताना इथल्या निधड्या छाताडानी एक होऊन एक विलक्षण राष्ट्र निर्माण केलं होतं. त्या राष्ट्राचा श्रीगणेशा याच ठिकाणी झाला होता. दुर्गभ्रमंतीचा धूळ खात पडलेला माझा छंद पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी माझ्या नशिबी हाच प्रचंडगड होता! त्यामुळे गडावर पोहोचायला अतिउत्सुकच होतो! त्या जोशातच शेवटच्या टप्प्यातलं अवघड चढण अगदी सहज पार केलं! अडीच तीन फुटी दगडांवर अगदी सहजपणे चढत पायथ्यापासून फक्त दीड तासात वर पोहोचलो होतो. वाटेतले धबधबे, ढगांमध्ये ला[लपलेला बिनीचा दरवाजा आणि हनुमंत दरवाजा एक वेगळीच झिंग चढवत होता. आतापर्यंत पावसात नखशिखांत भिजलो होतो- पण चुकूनही याची खंत नव्हती!
 |
उत्तुंग चढण! |
 |
बिनी दरवाजा |
 |
हनुमंत दरवाजा |
गडावरचा वारा आणि पाऊस चित्तथरारक होता! इंग्रजांनी तोरण्याचं वर्णन करताना म्हणलेलं आहे की "सिंहगड ही वाघाची गुहा असली, तर तोरणा हे गरुडाचं घरटं आहे!" त्या पलीकडे औरंगजेबाचा एक सरदार- किल्लेदारखान याने एका पत्रात लिहिलंय "शिवाजीचा तोरणा नावाचा किल्ला अति भयानक आहे. इथे वाहणारा वारा तरुणाची दांडी गुल करतो तिथे माझ्यासारख्या म्हाताऱ्याचं काय! हा किल्ला नाही- सैतानाची गुहा आहे! इथे फक्त भुतं प्रेतं आणि मराठेच राहू शकतात!" या सगळ्या विधानांची प्रचीती हा किल्ला चढताना आली. त्या पलीकडे शिवरायांनी स्वराज्याचं तोरण लाऊन याचं नाव प्रचंडगड का ठेवलं असावं, हे कळून चुकलं! हा दुर्ग खरच प्रचण्ड तांडवः शिवम्! आहे!
प्रचंड प्रमाणात ढग आणि पाऊस असल्याने आजुबाजूचं काहीच दिसत नव्हतं- त्यामुळे वर भटकण्यात काही अर्थ नव्हता. मेंगाईदेवीच्या मंदिरात त्या अष्टायुध भवानीचं दर्शन घेऊन तिच्या प्रसादाचा गरमागरम चहा आणि राजगिरा लाडू खाऊन गड उतरायला सुरवात केली. परतीच्या वाटेवर पोटाची पोती घेऊन हार पत्करलेले अनेक सह्यमंत्रहीन तरुण दिसले आणि त्यांची दया आली. बेडेकरांनी कधीतरी सांगितलं होतं- सह्याद्रीला योग्य तो आदर दिला नाही तर तो तुम्हाला धडाधडा खाली ढकलतो- इथे उद्धट पोटसुट्यांचा ईगो कोसळताना दिसला.
सह्याद्रीने आत्तापर्यंत खूप काही दिले आहे. परवा देखील फार आनंद दिला. जिद्द दिली. मनावर जमलेला गंज, आणि ढेर्यांवर चढलेली चरबी उडवून लावण्याची ताकद दिली. एका परीने त्या धो धो पावसाच्या रुपात चैतन्यामृतच शिंपडलं! अनेक वर्षांनी माझ्यासाठी सार्थ झाली साद सह्याद्रीची...भटकंती नव्यानी!!