Pages

Thursday, 30 May 2013

कात्रज ते सिंहगड- मधेच कुठेतरी.

कॉलेजची शेवटची सेमिस्टर होती. वर्गातली पोरं आधी कधी नाहीत, इतकी एकत्र होती. तिसऱ्या वर्षात असताना एका सहलीनंतर वर्ग तसा एकत्र आला होता. या वर्षी मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून कुठे सहल काढली नव्हती. तसं पाहिला गेलो, तर जो तो त्याच्या मित्र-मैत्रिणींबरोबर कुठे ना कुठे जातच असे. आम्ही पुण्याच्या आसपास बाईकवरून सकाळी जाऊन दुपारी परत येता येईल अशा बऱ्याच सहली काढल्या होत्या. म्हणजे मनसुबे तरी आखले होते. पण सामुहिक आळसामुळे स्वारी पुण्याबाहेर जाण्यापेक्षा कोणाच्या घरी, नाहीतर अगदीच कष्ट घ्यायची इच्छा झाल्यास वेताळ टेकडी, पर्वती किंवा फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडीवर वळे. याला अपवाद म्हणजे राजगड, तोरणा, नागफणी, राजमाची(एका दिवसात का केला हा ट्रेक!!), मुळशी, खडकवासला, बनेश्वर या सहली, आणि नंतर महाबळेश्वर, कास, मुंबई वगैरे. वर्गातल्या पोरांबरोबर लोहगड, नीळकंठेश्वर अशा सहली झाल्या होत्या. प्रती व्यक्ती खिशाला जास्तीत जास्त ५०-२०० रुपये खर्च येईल अशाच या सहली असत.

तर  जानेवारी २०११ उगवला होता. अनेक महिन्यात कुठेही गेलो नव्हतो. तसे थोडेफार ट्रेक वगैरे झाले होते इतर मित्रांबरोबर, पण वर्गातल्या पोरांबरोबर बरेच दिवसात adventure म्हणता येईल असे काही केले नव्हते. त्यामुळे प्लान्स शिजत होते. पोरींना कुठे घेऊन जायचं म्हणजे उगाच डोक्याला ताप आणि तो नकोच, म्हणून ट्रेकला जाऊया ठरलं. ट्रेक वगैरे म्हणलं, की हौशी पोरी सोडून बाकी सगळ्या (चालण्याची सवय नसलेल्या आणि आपल्या मित्रांच्या मागे बाईकवर बसून गोल-मटोल झालेल्या) म्हशी आपणहूनच येत नाहीत. त्यातुन पोरी अजिबातच नको, म्हणून आम्ही ओव्हरनाईट/नाईट ट्रेक करायचा ठरवला. बरेच डिस्कशन झाल्यानंतर अखेर ट्रेक ठरला- कात्रज ते सिंहगड,  पौष पौर्णिमेच्या रात्री दिनांक- १९ जानेवारी, २०११, बुधवार.
कात्रज टेकडीवरून घेतलेला चंद्राचा फोटो!

आता तसं पाहिलं तर हा माझा तिसरा कात्रज-सिंहगड ट्रेक होता. या आधी युवाशक्ती बरोबर शाळेत असताना केला होता. त्यामुळे रस्ता तसा माहितीचा होता. सीतामाईच्या खिंडीजवळ तेव्हा भुताटकी अनुभवली असं आम्हाला वाटत होतं, पण दुसऱ्या दिवशी सिंहगडावर पोहोचल्यावर काळालं की आमच्यातलीच काही धटिंगण पोरं सगळ्यांना घाबरवत होती. दुसर्यांदा जेव्हा गेलो होतो, तेव्हा ज्या टेकडीवर आपण वळतो, (८वि का ९वि टेकडी आहे) तिथे गावातले लोक येऊन झाडत लपले होते, आणि आम्ही जाताना torchचा लाईट आमच्यावर मारत होते. तो कुठून येतोय ते समजत नव्हतं, त्यामुळे बेकार टरकली होती. असे आधीचे मनोरंजक किस्से असताना या वेळी बहुतांशी नाव्ख्यांबरोबर जात असल्याने उत्साह जरा जास्तच होता! अखेर निघायचा दिवस उजाडला आणि मावळला. दिवसभर या ट्रेकला आपल्या ताटात काय वाढून ठेवलं आहे, याचाच विचार करण्यातच फुकट गेला.  गळ्यातलं जानवं नीट करून ब्राम्ह्गाठ हृदयाजवळ लाऊन २७वेळा गायत्रीचा जप करून त्या जानव्यात शक्ती घातली- भूतं नसतात, पण आपण आपलं तयार राहावं! चुकून भूतंबितं समोर आलीच, तर ती ब्राम्ह्गाठ दाखवून त्या भुताला विरघळून टाकता येईल याची खात्री झाल्यावर मात्र मी निर्धास्तपणे निघालो.

संध्याकाळी जेवण उरकून सुमेधच्या घरी गेलो, तिथे गाडी लावली, आणि मी, सुमेध आणि वीरेंद्र चालत सातारा रस्त्यावर पोहोचलो. हॉस्टेल मधून निघालेले आमचे काही मित्र  भेटले. हा येतोय, तो येतोय, हा येत नाही, तो येत नाही ही नेहमीची नाटकं संपेपर्यंत ८ वाजता निघणार होतो त्या ८ चे ८.३०-९ शेवटी ९.३० वाजले. अखेर आम्ही सिओईपी इलेक्ट्रोनिक्सचे २ वेडे शिलेदार कात्रज-सिंहगड सर करायला निघालो. सुमेध, वीरेंद्र (पप्पा), अमोल(अमल्या,जोन्स), ऋषिकेश(फायटर), विजयानंद(उळ्या), स्वप्नील(तापडिया), ऋषिकेश(भूम), आकाश(डायनो), राहुल(हुल्या), दीपक(दिप्या), श्रीराम(हाराम्या), योगेश(केंजळे), चव्हाण(विज्या), मनजित, कौस्त्या(सांबडू), अनप्या, रामा, सैलू, सुजित आणि मी, आसे आम्ही आता पी.एम.टी पकडून कात्रज बस डेपो गाठला.(सगळ्यांबद्दल खरं तर सांगायला हरकत नाही, पण ते नंतर कधीतरी सांगू..एक एक नुसते नग आहेत) तिकडून आम्ही २० जण एका टेंपोत स्वतःला कोंबून कात्रज घाट चढू लागलो(पोलीस पकडतील याची भीती होतीच!). अगदी रखडत रखडत तो टेम्पो घाट चढला. एवढं वजन न्यायची त्याला बहुदा सवय नसावी. बोगद्यापाशी पोहोचल्यावर टेम्पोतून उड्या टाकल्या, आणि माणशी किती हे अजूनही न उलगडलेल्या हिशोबानी त्या टेम्पोवाल्याला जी काय रक्कम होती ती मोजली. बोगद्यातून चालत चालत दुसरी बाजू गाठली. साधारण रात्रीचे १०.३० वाजले होते. बाहेर साफ चंद्रप्रकाश पडला होता. समोर ८ तासाचा ट्रेक दिसत होता, आणि तो करताना प्रचंड मजा येणार हे देखील दिसत होतं! ट्रेकला निघालेली मंडळी डोंगर चढण्यात फारशी तयार नव्हती. (आमचे बरेच मित्र विदर्भातले होते- तिथे कसलं ट्रेकिंग वगैरे!) त्यामुळे शेवटपर्यंत जाताना खरंच मजा येणार होती!
टेम्पोत कोंबलेले आम्ही..
तर.. बोगदा ओलांडून चंद्रप्रकाशात पोहोचलो आणि लगेचच एका पंपिंग शेडच्या इथून पुढे डोंगर चढायला लागतो. पहिली टेकडी बोग्द्यावरच आहे. पंपिंग हाउसच्या इथून एक यू-टर्न करून आपण बोग्द्यावर येतो आणि सिंहगड च्या दिशेने जायला लागतो. बोगद्यावर थांबून खालून जाणाऱ्या वाहतुकीकडे पाहायला फार छान वाटतं. २ पिवळे दिवे घाटाच्या नागमोडी रस्त्यावरून येतात बोगद्यात शिरतात, आणि बाहेर पडले की आपले लाल रंगाचे टेल-लाईट्स दाखवत घाट उतरतात! रात्री आजूबाजूला फक्त अंधार असताना तो उजेड हवाहवासा वाटतो! तिथून पुढे जात जात पहिली टेकडी मस्त पैकी पार केली. ही टेकडी उतरल्यावर एक छोटं देऊळ आहे. वाघजाई देवीचं. देवळापर्यंत तसा मोठा रस्ता आहे. देवळापुढे मात्र निमुळती जंगल वाट. अंधारामध्ये देवीपुढे जळणाऱ्या त्या दिव्याने भलता जोश चढला. आड ठिकाणी अशी छोटोशी मंदिरं आपल्याला केवढा धीर देतात! देवीचं दर्शन घेतलं. मंडळींचा उत्साह वाढला होता-आणि वेग देखील वाढला होता. म्हणता म्हणता दुसरी टेकडी पण सर केली. गप्पांच्या नादात वेळ कसा जात होता तेच कळत नव्हतं. दुसरी टेकडी जी आहे, त्याखालून बहुदा नवा कात्रजचा बोगदा काढला असावा. तिथे फार वेळ न घालवता पुढे गेलो. म्हणता म्हणता आता तिसरी टेकडी पण उतरून झाली होती! सतत चढ उतार असल्याने आता थोडा दम लागला होता, म्हणून विश्रांती घ्यायला बसलो. इथेच चूक झाली! रात्री जगायची सवय असली, तरी मंडळींना रात्री चालायची सवय नाही! त्यामुळे एकदा बसल्यावर उठणं अंगाशी येत होतं. काहीतरी करून, आम्ही ४-५ जणांनी लोकांना पुढे घेऊन जायचं ठरवलं, आणि अक्षरशः गुरं हाकतो त्याप्रमाणे पुढे ढकलत होतो.
थंडीमुळे हात स्थिर ठेवता येत नव्हता. पण कात्रज टेकडीवरून पुण्याचा घेतलेला हा फोटो.

म्हणता म्हणता चौथी टेकडी उतरलो. त्यावेळी साधारण रात्रीचे ११.३० वाजले असतील. दीड तासात चारच टेकड्या झाल्या होत्या! वाटत होता त्यापेक्षा आमचा वेग थोडा कमीच पडत होता. पण मजा येत होती. जानेवारी महिन्याची रात्र. थंडी चांगलीच जाणवायला लागली होती आता. तसं चढताना जॅकेट आणि कानटोपी चढवलीच होती. पण चालून अंग गरम व्हायला लागल्यावर ते काढून ठेवलं होतं. पण जसजसशी मध्यरात्र जवळ येत गेली, तशी आता हुडहुडी भरू लागली होती. परत पूर्ण गरम कपडे अंगावर चढवून पुढे निघालो. थंडीच्या दिवसात पुण्यात तसं     गार असतंच, पण पुण्याबाहेर जरा ५-६ किलोमीटर गेलो, की गावातल्यापेक्षा बरंच गार असतं! आम्ही आपलं कात्रज काय इथेच आहे म्हणून तेवढ्यापुरत्याच थंडीची तयारी करून गेलो होतो. पण आता चौथी टेकडी ओलांडल्यावर ही थंडी चांगलीच जाणवायला लागली होती. थंडी चा त्रास एवढा होत नव्हता, पण सुसाट सुटलेला वारा हाडं खिळखिळी करत होता. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल-पण चक्क बुटातून गारवा अंगात शिरत होता! जाड मोजे असून पाय गारठले होते. हात पण गारठले होते. चालल्यामुळे जी उष्णता निर्माण होत होती तीच थोडा दिलासा देत होती, पण आता नाक, डोळे आणि इतर सर्व अवयव जिथून पाणी गळू शकते, ते सगळे वाहायला लागले होते!

Add आमची काही हौशी मंडळी(अनुप, सुमेध,रामा, श्रीराम, योग्या)

उळया, भूम, फायटर
सह्याद्रीच्या या भागामध्ये घोणस हा विषारी साप आढळतोच आढळतो(राजकारणी हा दुसरा!). तो गवतात लपला की दिवसाढवळ्या नीट दिसत नाही, रात्र तर दूरच! त्यावर पाय नको पडायला अशी एक कायम मनी भीती होतीच. समोर लांबवर उंच सिंहगड काळोखात दडून बसला होता. त्याच्या टीव्ही टॅावर वरचे ते लाल दिवे दडा धरून बसलेल्या वाघाचे डोळे वाटत होते. (म्हणा तेच दिवे बघत आम्ही सिंहगडाच्या दिशेनी जात होतो.) पण चंद्रप्रकाश जरी असला, तरी रात्री मनुष्यवस्ती पासून तसं आडवाटेला गेलो, की माणसाची च.पी करायला पुरेशा असतात त्या  गोष्टी आजूबाजूला ठासून भरल्या होत्या! त्यातून वाटेत मधेच बिबटे, कोल्हे, रानडुकराची टोळी, साप, किंवा एकूणच इतर हिंस्र श्वापदं जवळ यायला नको, म्हणून चालता चालता बडबड करत जात होतो. अहो बडबड करणे एक गोष्ट झाली, पण आमच्यातल्या कोणत्या भल्या माणसाला ती साधी गोष्ट भुताची गोष्ट करावीशी वाटली त्याचा लाकडीपुलावर चपलांचा हार घालून जाहीर निषेधार्थी “सत्कार” करावा! आहो ही काय वेळ आणि जागा झाली का भुताच्या गोष्टी सांगायची! आधीच अंधार, त्यात थंडी, अंगाचा काजू झाला होता, त्यातून अफवा की आमच्यातला एक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात मानवी-लांडगा होतो म्हणे, समोर ते सिंहगडाचे भयानक लाल डोळे, पूर्ण चंद्रप्रकाशात चित्रविचित्र आकारात पडणाऱ्या वाळलेल्या गवताच्या सावल्या आणि मधूनच टिटवीचे ओरडणे आणि डोक्यावर फिरणारी घुबडं आणि वटवाघळं ही सगळी विघ्न असताना वरती भुताची गोष्ट! आता वाटेत कोणी दिसलं तर नक्की वेताळ किंवा मुंजा किंवा मानकाप्या असणार. कोणाशीही बोलायच्या आधी त्यांचे पाय सरळ आहेत का उलटे आहेत ते बघायचं असं म्हणून जीव मुठीत धरूनच पुढे चाललो होतो!
                    
अशा काळोखात भुताच्या गोष्टी अंगाशीच येतात
भुताच्या गोष्टी रंगत होत्या. २० जणांची टोळी हळू हळू तुटत होती. २-३ छोटे ग्रुप झाले होते, त्यामुळे वेग चांगलाच मंदावला होता. थोडं दमायला पण झालं होतं. रात्रीचे १२.३०-१ वाजले असतील. आता मात्र सर्वांनाच ब्रेकची गरज होती. थंडीने सगळ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता, आणि शरीरात ज्या ज्या हाडांची वा इतर अवयवांची थंडीमुळे वाट लागू शकते, त्या सर्व हाडांचे आणि अवयवांचे खुळखुळे झाले होते.  आमच्या दुर्दैवाने म्हणा, पण ज्या टेकडीवर थांबलो, तिथे आडोसा घेण्यासारखं काहीच नव्हतं! ना मोठे दगड, झाड, खड्डा, काहीही नाही! अगदी डोंगराच्या माथ्यावर सुद्धा! दोनही बाजूला उंच वाळलेलं गावात. त्यात साप, सरडे, पाली, उंदीर, काय काय असेल माहिती नाही.शेवटी होतो ती टेकडी उतरलो, आणि डोंगराचा एका बाजूनी कव्हर मिळेल अशा ठिकाणी बसलोच. थंडीमुळे पूर्ण वाट लागली होती.
आणि त्यात ही भुताटकी!(भूम,विरू,अमल्या,आकाश)
आता मात्र आमच्यातल्या काही मंडळींनी पुढे येण्याचा शुद्ध नकार दिला. थोडं खाऊन पिऊन, बरंच चालल्यानंतर जी एक सुस्ती येते, ती येत होती. थंडीमुळे जास्तच. त्या थंडीला विशेषणं काय द्यायची तेच कळत नाहीये! इथे कोपऱ्यात लघवीला गेलं की युरियाचे खडे पडतील की काय असं वाटावं इतकी थंडी होती. आधीच पाणी संपत आलं होतं, त्यात भयाण थंडी. काय करावं ते सुचेना. गारठलेले आम्ही आता तिथेच थांबायचं ठरवलं. पण आमच्यात अजून काही हौशी मंडळी. ते आम्ही थोडं पुढे जातो आणि कळवतो असं सांगून निघाले. आमच्या सुदैवाने २ जणांचे फोन सुरु होते, आणि चक्क रेंज पण होती. त्यामुळे आम्ह ७-८ जण मागे थांबलो, आणि उरलेले पुढे गेले. आता ते किती पुढे जाऊ शकणार होते ते माहिती नाही, पण एक टेकडी उतरून तिथे जरा थंडीपासून लांब राहता येणार असेल असे काही सापडले तर ते बाकीच्या तुकडीला कळवणार होते. काही सापडलं, तर आम्ही पण पुढे जाणार होतो. एकूण काय, सिंहगड सर करायचा आमचा प्लान थंडीने चांगलाच चोपून काढला होता.

आता आम्ही जे मागे थांबलो होतो, आजूबाजूला योग्य जागा शोधून गवत बिवत कापून आणले आणि शेकोटी पेटवायचा एक प्रयत्न केला. फक्त वाळलेले गवत असल्यामुळे पेटलं तर पटकन जळत होतं. त्यातून पूर्ण डोंगरावर वाळलेलं गावात! त्यामुळे जरा इकडे तिकडे एखादी ठिणगी उडाली, तर पूर्ण डोंगरावर वणवा पेटणार होता. थोडी दक्षता घेऊन पाऊलवाटेच्या कडेला गावात काढून थोडी जागा केली आणि भरपूर गवत गोळा करून आणले आणि चांगली तास दोन तास चालेल एवढी शेकोटी पेटवली. त्या शेकोटीमुळे जी उष्णता निर्माण झाली काय सांगू! केवळ सुख! हात पाय थोडे गरम झाल्यावर सर्वांनी आपापली बुडं शेकून घेतली आणि सुटकेचा निःश्वास सोडला. त्या शेकोटी भोवती थांबून धमाल केली. शहरापासून दूर अशा आड ठिकाणी सर्व झगमगाटापासून दूर आल्यावर आकाशदर्शनाला काही वेगळीच मजा येते! एक तास या सर्व गोष्टींमध्ये गेला. अजून पुढे गेलेल्या आमच्या मित्रांचा काही पत्ता नाही.

फोन करत होतो, पण तो लागत नव्हता. टेन्शन यायला लागलं होतं. तेवढ्यात समोरच्या दिशेने गावात हलल्याचा आवाज येऊ लागला, आणि आम्ही २-३ जण torch घेऊन थोडं पुढे कोण आहे पाहायला गेलो. भुताच्या गोष्टींमुळे थरकाप उडालाच होता, त्यामुळे भीमरूपी पुटपुटतच गेलो. पण पाहिलं तर आमचीच पुढे गेलेली पोरं पुन्हा मागे आली होती. आहो आणि सगळीच टरकली होती! विचारल्यावर जी कथा सांगितली ती ऐकून "चिल डाऊन दि स्पाईन" ही भावना अनुभवली. आमची मंडळी १-२ टेकड्या पुढे गेले होते. अचानक त्यांना जाणवलं की त्यांना सर्व बाजूनी गाई-म्हशींनी वेढा घातलाय! आता रात्रीच्या अंधारात गाई-म्हशी टरकल्या की परिस्थिती बिकट होते. गाई बर्या, पण म्हशी डांबिस असतात. इथे ही सगळी मंडळी torchच्या उजेडात आजूबाजूला वाट शोधत होते, आणि जिकडे torchचा प्रकाश पडे, तिथे फक्त जनावराचे २ डोळे चमकत होते. बाहेर पडायला वाट सापडे ना, म्हणून तिथेच बसून राहिले. थोडा वेळ गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज येत होता, पण अचानक एक काहीतरी विचित्र आवाज झाला, आणि एकाएकी त्या सर्व गाई म्हशी गायब झाल्या! म्हणजे पळून गेल्या असत्या तर घंटेचा आवाज झाला असता ना! तो पण नाही. अचानक गायब! कुठे गेल्या, कशा गेल्या, कशाचाच पत्ता नाही. आता मात्र पुढच्या पार्टीची सॉलिड टरकली. भूत बीत आहे की काय, म्हणून थोडं मागे गेले, पण नंतर पाहतात तर पुन्हा त्याच ठिकाणी आले! चकवा लागला असा संशय आला, आणि सगळ्यांनी पीछेहाट केली. शेवटी कसाबसा मार्ग काढत आमच्या इथे पोहोचले. 

आता एवढ्या थंडीत एवढे सगळे लोक त्या ठिकाणी बसणं थोडं आवघड होतं, तरी पण आता केवळ भुका लागल्या होत्या म्हणून तिथेच बसून सकाळी खायला आणलेल्या गोष्टींचा पार फडशा पाडला. त्यात आमच्यातल्याच काही अतिउत्साही मंडळींनी टेकडीवरच अपपल्यासाठी आणलेली एक "बैठक" मारली. पुढचा तास भर मग तिथेच! शेवटी आता पुढे जाण्यात अर्थ नाही, असे एकमत झाल्यावर सगळेजण पुन्हा कात्रज टेकडीच्या दिशेने फिरलो. रात्रीचे ३ वाजले असावे. जेवण झालं की बाहेरची हवा जास्त गार वाटते. आता पोटात अन्न गेल्यावर आमची पण तीच अवस्था होती. पण आता जायचंच ठरवून सगळे माघारी फिरलो. त्यात आमच्यात बैठक मांडलेल्यांपैकी एकाला मस्त जोश आला होता. मस्त बडबड सुरु होती! अखेर ती थंडी, वारा आणि बडबड सोसत आम्ही सगळे वाघजाई मातेच्या मंदिरापाशी आलो. तिथे जरा आडोसा घेण्यासाठी चांगली जागा होती, म्हणून पायातले बूट बीट काढून देवीच्या देवळापुढल्या ओटीवर सगळ्यांनी मस्त ताणून दिली. 

सुमारे तासभर तिथे झोपलो, सुमारे ५.३० च्या सुमारास उठलो. आणि पुन्हा कात्रजचा बोगदा गाठला. आडवेळ होती, त्यामुळे खाली उतरताना वाहन मिळणं अवघड! बोगदा ओलांडल्यावर एक टेम्पोवाला भेटला, त्याला कसंतरी पटवून पूर्ण टोळी त्या टेम्पोत चढलो. त्यांनी आम्हाला शहरात नाही, तर घाट सुरु होतो तिथेच उतरवलं. आधीच एवढे कारनामे करून थकलो होतो, त्यात आता घाटातून उतरून कात्रज डेपो गाठायचा! त्यात थंडी! गेलो तसच पुढे. डेपो गाठला. ट्रेक पूर्ण करू शकलो नव्हतो म्हणून बेकार चिडचिड होत होती. पण एवढ्या थंडीत हातापायाचे खुळखुळे आणि इतर इथे सांगता येणार नाहीत अशा गोष्टींचे काजू करून घेण्यापेक्षा पूर्ण न केलेला बरा! डेपोला पोहोचल्या पोहोचल्या आधी एक कप गरम गरम चहा मारला. आहो केवळ सुख! इतक्या अवेळी पोटापाण्यासाठी धंदा करणारे ते चहावाले खरोखर धन्यच!! थंडीमध्ये अमृततुल्यचा तो गोड चहा प्यायल्यावर त्या चहा ला अमृत-तुल्य हे नाव खरंच किती योग्य आहे असा विचार डोक्यात येऊन गेला. देवांना अमृत प्यायल्यावर अमरत्व मिळालं म्हणे, इथे चहा प्यायल्यावर तीच भावना आली होती. (बहुदा देवांनी टपरीवरचा चहाच प्यायला असावा!) आलं घातलेल्या त्या चहाचा एक एक घोट जसजसा घशातून खाली उतरत होता, तसतसा आमचं स्पिरीट वाढवत होता. ट्रेक पूर्ण नाही झाला, पण अशी मजा पुन्हा न येणे, अशी गुरांची भुताटकी पुन्हा न बघणे, अशा भुताच्या गोष्टी पुन्हा कुठे न ऐकणे! बस बस बस! धमाल होता हा ट्रेक खरंच! शेवटी ६.३० च्या आसपास डेपो मध्ये झोपलेल्या बसेस जाग्या झाल्या, आणि आम्ही पुन्हा आपापल्या घरी निघालो! (पुढचा आठवडाभर सर्दी, खोकला, ताप आणि थंडीमुळे होणारे सर्व आजार होऊन गेले!)

आमची पूर्ण Gang

No comments:

Post a Comment