Pages

Wednesday, 30 April 2014

कृपया आग्रह करू नये.

"अहो..एक घ्या हो...एकंच आहे.. छोटाच तर आहे..एक जास्त खाल्ल्याने काहीही होत नाही. आग्रहाचा एक...अगदी थोडं देतो/देते..."

हे वाक्य कोणत्याही लग्नाचे जेवण जेवणाऱ्या "आरोपी" च्या कानावर पडले, की "आता गेम ओव्हर झाला राव" हा विचार त्या "आरोपी"च्या मनात येतोच येतो. ते साहजिकच आहे. का ते सांगतो-

दुपारचं रणरणतं ऊन( पु.लंच्या भाषेत- रामराणा जन्माला ती तळतळीत दुपारची वेळ) कार्यक्रम ज्या छोट्या हॉलमध्ये, तिथे माणसांच्या गर्दीमुळे जीवाची जरी नसली, तरी हॉलची नक्की मुंबई झालेली, मागे चांगल्या दर्जाचा सनईवादक(बिस्मिल्लाह खां आणि त्या दर्जाचे) सोडून कोणत्याही सनईवादकाची अत्यंत बेसूर सनई सुरु- त्यात दुपारी १२ वाजता सनईवर बसंत राग, भिंतीवर लावलेले भले मोठे पंखे ख्र्रर ख्र्रर असा काहीतरी विचित्र आवाज काढत असतात.त्यातून एखादा अस्सल पुणेकर असल्यास तो पेंगतच असणार, आणि उत्सावमुर्तींच्या नातेवाईकांमधली चिल्लीपिल्ली आवाज करत हयदोस घालत असणार. अशातच ११.३०-१२ चा मुहूर्ताची घटका भरायला लागणार. गुरुजी माईक घेऊन मस्तपैकी "स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरम् सिद्धिदं..." म्हणायला घेणार, गुरुजींची ३ मिनिटं झाली आणि मुहूर्ताच्या आधी १०-१५ मिनिटं मुलाची आत्या, आजी आणि मावशी योग्य मीटर सोडून सगळ्या मीटरमध्ये "मंग(ला/ना)ष्टकं" म्हणणार (खेकसणार). आणि चुकून मीटर बरोबर असला ना, तर मंगल जाऊद्या, फक्त अमंगलाष्टकं म्हणणार. काही दिवसांपूर्वी असंच एका लग्नाला गेलो होतो, तिथे तर स्मशानी मंगलाष्टकच ऐकलं- "म्हाताsssरी... पडली तळ्यात बुडलीsssssई ईsssई, प्रत्यक्ष म्या पाहिलीsss.... दादाने वर काढुनी नदीतीरीsss नेवोनिया जाळिली!" हे-मंगलाष्टकात! मंगल कसलं हो डोंबलाचं! काहीही लिहितात! एका लग्नात तर मुलीच्या अतिउत्साही भावाने यो यो हनीसिंगच्या गाण्याच्या(भुंकण्याच्या) चालीवर मंगलाष्टक रचलं होतं म्हणे. ताराबलम चंद्रबलमची अपेक्षा ठेऊन गेलेल्यांनी ब्लू आईजची चाल ऐकून अक्षता न वर्षावता (मारता) चपला मारल्या नाहीत, हेच मोठं नशीब! कुठे काय करावं याचं भान ठेवावं नाहीका लोकांनी... गुरुजींचं काम त्यांना करू द्या ना. उगाच कशाला काहीतरी मधे लुडबुड! जाऊदे, काय म्हणणार ना आपण तरी. 

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे लग्नाला हजेरी लावणारा तो "आरोपी" या व्याधी सहन करत अपेक्षेने वाट बघत असतो खरी जेवणाची. त्याला कोणती आजी, मावशी काकू, किती सुरात, किती मात्रांमध्ये गात आहे, हे काहीही पडलेलं नसतं. आधीच उकाड्यामुळे तो वैतागलेला असतो, आणि त्यात हे सगळं. झालं.. त्याचा अणुबॉंब होऊन स्फोट होत नाही, हेच खूप! वधू-वरांनी एकदा(चे) एकमेकांना हार घातले, की याचं सगळं लक्ष खाण्याकडेच असतं. "लेले-नेने शुभविवाह" टाईप लग्न असेल, आणि श्रुती मंगल कार्यालयात असेल, तर अजूनच जास्त! जेवणाच्या ताटात अळूची भाजी, मसाले भात (तोंडली वाला बरका), बिरड्यांची उसळ, बटाटा भाजी, पुरी, खमंग काकडीची कोशिंबीर, आणि हमखास श्रीखंड किंवा गुलाबजाम खायला मिळणार याचा त्याला आनंदच असतो. पोटावरचा पट्टा सैल करून हा हादडायला बसतो. एक एक पदार्थ घेऊन वाढपी बाहेर येतात. या लोकांना हसताना मी कधीच पाहिलं नाहीये. "पार्वतीपते हर हर महादेव"चा गजर झाला, आणि पहिला वरण भात खाऊन झाला, की "मसाले व्हात... मस्साले वहात" असं म्हणत एक वाढपी येतो. त्याला हो म्हणालात तर तो ढीगभर भात तुमच्या पानात टाकतो, आणि काहीच म्हणाला नाहीत, की अशा थाटात "मस्साले व्हात" म्हणतो, की वाटतं हा पुढे उद्धटपणे म्हणणार "हवाय का नको लवकर सांगा".  

असं सुखाचं जेवण सुरु असताना २ वाट्या गोड खाऊन झाल्यावर आधी मुलीचे आई-वडील, मग मुलाचे आई वडील, आणि मग लग्न झालेले जोडपे ओळीने येऊन असे काय तुमच्या ताटात गोडाचा भडीमार करतात की काही विचारू नका. म्हणजे एका पाठोपाठ स्टेन, मलिंगा, आणि मिचेल जॉन्सनला सामोरे जाताना प्रग्यान ओझाला जसं वाटेल, अगदी तसा फील येतो. बर, यांना जेवण संपत आलं कीच यायचं असतं-डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ना हे सगळे. पोटाचा गेम पार ओव्हरच करून टाकतात. आधी आले तर थोड्या तिखट पदार्थांच्या मदतीने ते अति गोड गिळता येतं. पण नाही.आणि आले की केवढा आग्रह! एक गुलाबजाम द्या आग्रहापोटी म्हणलात, तर वाटीत हमखास ५-६ पडतात. ही चीटिंग आहे! (क्रिकेटमध्ये पण एका ओव्हरमध्ये एकंच बाउन्सर तक्ता येतो!- इथे पण तसलाच नियम केला पाहिजे) आश्चर्य म्हणजे आजकाल "लेले वेड्स नेने" लग्नामध्ये पण हे होतं. काय म्हणावं! निदान आडनावाला शोभेल असे वागा! एकतर ते ताटातलं संपवता संपवता नाकीनऊ येते. आणि वर यांचा आग्रह-
"एक घ्या हो- काही होत नाही!" अहो तुम्हाला होत नाही- आमची उद्या सकाळी वाट लागते त्याचं काय! एकदा तर मी श्रीखंडाचा ओव्हरडोस देणाऱ्या एका अतिउत्साही काकूंना तोंडावर म्हणालो होतो- "माझी शुगर वाढली तर इंश्युलीनची इंजेक्शन तुम्ही देणार असाल तर खाईन". असाच अजून एका बटाटे वाड्यांचा आग्रह करणाऱ्यांना मी म्हणालो होतो- "मला बटाटे वडा आवडतो- पण एकच आवडतो". असं काहीतरी गुगली टाकून त्यांची विकेट घ्यायला सॉलिड मजा येते.

पण खरंच वेड्यासारखा आग्रह करतात. आणि जेवणाधी ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवून बसलो असतो, त्यामुळे पानात सोडलेलं पण बरं वाटत नाही. आग्रह अक्षरशः खाणाऱ्याची वाताहत लावणारी गोष्ट आहे! "उदर भरण" डोक्यात ठेऊन पंगतीत बसलेल्याला, वाढणार्याच्या अतिउत्साहामुळे आणि स्वतःच्या "अन्न हे पूर्णब्रह्म" या धोरणामुळे, "उदारे gas भरण" या प्रकाराला सामोरे जावे लागते. बर हे सगळे त्रास सहन करायला  करायला दक्षिणा पण मिळत नाही हो! द्यायला पाहिजे.

खाण्या-पिण्यात बावळटासारखा आग्रह करणं ही प्रथा महाराष्ट्रामध्ये ज्या कुठल्या इसमाने आणली, त्याची अक्षरशः धिंड काढावीशी वाटते. "तुमच्या पुण्या-मुंबईत काय मेली कंजुषी...घ्या चहा घ्या.." असे उद्गार काढणारा एखादा नागपूरकरच याच्या मुळाशी असावा असे मला वाटते. जाउद्या... असते एकेकाची सवय. आपण आपलं, पंगतीत बसताना उत्सवमूर्ती ज्या पंगतीत असतात, त्याच पंगतीत जाऊन बसतो, २ आग्रह कमी होतात! पण निकाल तसाही दुसऱ्या दिवशीच लागतो. चालायचंच. पुढच्यावेळी माझ्या शर्टावर पुणेरी पाटी लावणार आहे-

"कृपया आग्रह करू नये. खाणाऱ्याला पचनाच्या व्याधी आहेत. मंडपात नंतर वास भरल्यास आम्ही जबाबदार नाही."

No comments:

Post a Comment